उस्ताद अमीरखॉंसाहेब !

 १७ फेब्रुवारीला या घटनेला बरोबर सदतीस वर्षे पूर्ण होतील. याच दिवशी इंदोर आकाशवाणीवर एक वक्ता म्हणाला होता “ तिसर्‍या सप्तकाला पोहोचलेली तान आज तिथेच थांबली आहे”. ज्यांनी अमीरखॉंसाहेबांचे गाणे ऐकलेले आहे त्यांना हे शब्द लगेचच पटतील. याच दिवशी खॉसाहेबांचा कलकत्याला एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. १५ ऑगस्ट १९१२ साली जरी महाराष्ट्रातील अकोला गावी त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांचे बालपण मध्यप्रदेशात, इंदोरमधेच गेले. उण्यापुर्‍या साठ वर्षाच्या आयुष्यातील चाळीस वर्षे त्यांनी शास्त्रीय संगीतात घालवली आणि एका गायकीला जन्म दिला. त्या घराण्याचे नाव झाले “इंदोर घराणे“.

अमीर अलीचे पूर्वज हरियानातील कालनौर नावाच्या गावचे. ते तेथून इंदोरला येऊन स्थायिक झाले होते. साहजिकच अमीरअलीचे वडील लहानग्या अमीरला घेऊन अकोल्याहून इंदोरला गेले. इंदोरला त्याकाळी कलाकारांना राजाश्रय होता आणि शहा अमीर हे चांगले बीन व सारंगी वाजवायचे. अमीरखॉंसाहेबांचे आपल्या वडिलांवर इतके आदरयुक्त प्रेम होते की त्यांनी पुढील आयुष्यात मुंबईला एक इमारत बांधली आणि त्याला नाव दिले होते “शामीर मंझील”. अमीर अली नऊ वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली आणि शामीरखॉंना त्यांच्या दोन्ही मुलांची आईही व्हायला लागले. अर्थात तीही जबाबदारी त्यांनी चांगली पेलली. त्या काळच्या कलाकारांच्या घरी जसे वातावरण असायचे तसे यांच्याही घरी होते. शामीरखॉ यांनी अमीर अली आणि त्यांचा भाऊ बशीर या दोघांनाही संगीताचे धडे द्यायला सुरवात केली होती. तसेच त्यांच्या बिरादरीतील इतर श्रेष्ठ कलाकारांकडेही ते त्यांना नियमितपणे गाणे ऐकायला घेऊन जात होते. असेच एकदा ते त्यांच्या एका नातेवाईकाकडे गेले असता एक प्रसंग घडला. लहानग्या अमीरला आणि बशीरला घेऊन ते त्या घरापाशी आले तेव्हा घरातून संगीताचे स्वर ऐकू येते होते. “आत्ता तालीम चालू असणार” ते मनाशी म्हणाले आणि त्यांनी त्या घरात प्रवेश केला. त्याच क्षणी तेथे एकदम शांतता पसरली आणि सगळ्या शिष्यांनी ताबडतोब आपापल्या वह्या मिटल्या. शामीरखॉंसाहेबांनी बळेबळेच एका वहीचे पान उघडले त्यात मेरूखंड गायकीची बरीच नोटेशन्स लिहिलेली त्यांना दिसली. तेवढ्यात एका नातेवाईकाने त्यांच्या हातातील ती वही हिसकावून घेतली.
“हे सारंगियांसाठी नाही. मग वाचून काय उपयोग ?”
हे ऐकून अपमानित होऊन शामीरखॉं त्या घराबाहेर पडले ते ठरवूनच की मी माझ्या एका मुलाला मेरूखंड गायकीत तयार करेन. हे बोलण्याइतके सोपे नव्हते कारण ही गायकी फार म्हणजे फार अवघड आहे. काय आहे ही गायकी आणि ती एवढी अवघड का आहे ?.....

मेरूखंड गायकी.
या गायकीचा उल्लेख १४व्या शतकातील सारंगदेवाने लिहिलेल्या संगीतरत्नाकर या ग्रंथात पहिल्यांदा केलेला आढळतो.प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.