माझा (वि)चित्रकलेचा प्रवास !

असेच एकदा मी सहजच आठवत बसलो होतो की माझी आजची चित्रकलेची आवड माझ्यात कधी पासून निर्माण झाली असावी ? पण असा एखादा नेमका क्षण काही मला आठवेना. मात्र ही आवड अगदी लहानपणापासूनची, म्हणजे माझी स्मरणशक्ती जितकी मागे पोहोचते तिथपावेतो असावी एव्हढेच समजत होते. काही दिवसांपूर्वी मी माझ्या गावी म्हणजे नाशिकला गेलो होतो. कापड बाजारात आमचा वाडा होता / आहे. म्हणजे वाडा आहे पण तो आता आमचा नाही. माझे पूर्ण बालपणच नव्हे तर संपूर्ण शालेय शिक्षण ह्या वाड्यात राहात असताना झाले. आता तेथे कोण आहे बघायला म्हणून मी तेथे गेलो तर तिथे इंदू अजूनही राहते हे कळल्यावर मी तिला भेटायला गेलो होतो. ती आज ९० + वर्षांची आहे पण अजूनही तिची स्मरण शक्ती चांगली आहे. थोड्याश्या बोलण्यातून तिने मला आवाजावरून बरोबर ओळखले व आमच्या जुन्या गप्पा सुरू झाल्या. त्या गप्पांच्या ओघात तिने मला सांगितले की मी जेमतेम दोन वर्षाचा असेन नसेन तेव्हा मी खडूने आमच्या भल्या मोठ्या ओसरी व मधल्या घरभर चित्रे काढायचो व इंदूला धरून आणून दाखवायचो व तिने कौतुक केले की खूश व्हायचो ! अर्थात त्यावेळी काय काय काढायचो तिलाच अधिक माहिती पण गाय ( माझी सर्वात आवडती, आमच्या घरची गाय माझ्या वडिलांनी नागनारंबळीच्या वेळी ब्राह्मणाला दान केली तेव्हा मी दोन दिवस रडत होतो ! नंतर मला एक बर्‍यापैकी मोठी चिनी मातीची गाय मोरवीहून आणून दिली होती व चिऊ काऊ च्या आधी तिला घास भरवल्याशिवाय मी घास घेत नसे ! ) आणि तिचे घरभर काढलेले ’पो’ अजूनही चांगले आठवतात.

   त्या नंतर प्राथमिक शिक्षण म्युनसिपालिटिच्या शाळेत झाले. पाटी पूजनाच्या दिवशी  मी माझ्या पाटीवर सरस्वतीचे चित्र काढून न्यायचो पण १-१ कीवा ४-४ आणि त्यावर रफार, तसली नाही तर तिने हातात वीणा घेतलेली असायची. शाळेत शिक्षकांकडून त्यासाठी कौतुक व्हायचे तेवढेच आठवते.( आमच्या घरात चांगल्या मोठ्या आकारातल्या रविवर्माने काढलेल्या लक्ष्मी व सरस्वतीच्या तसबिरी होत्या )

   मध्यंतरी मी कुठलेसे चित्र पाहून मोराच्या जोडीचे चित्र काढले होते. सगळ्यांना ते आवडले होते. माझ्या वडिलांनी मला ते चित्र घेऊन नाशकातील सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेवराव कुळकर्णी ह्यांच्याकडे नेले होते. ते चित्र त्यावेळेच्या ’ शंकर्स विकली ’ ह्या बाल चित्रकारांच्या मासिकासाठी पाठविण्यासंबंधी बोलणेही केले होते. पण अशी कॉपी केलेली चित्रे स्पर्धेत चालत नाहीत म्हणून मी मनाने चित्र काढावे असा सल्ला दिला गेला होता आणि ते प्रकरण तेव्हढ्यावरच थांबले !

प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.