एका बंदिशीची गोष्ट

आपलं शास्त्रीय संगीत हा एक विशाल असा महासागर आहे. यातला एखादा थेंब जरी लाभला, तरी आयुष्याचं सार्थक होईल! वर्षानुवर्षंच नाही, तर तपानुतपं गुणीजन या अनमोल खजिन्यात आपल्या योगदानानं मोलाची भर घालत आहेत.

या विषयावर मी काही लिहावं, इतका माझा अधिकार नाही. पण शास्त्रीय संगीताची एक विद्यार्थिनी म्हणून धाडस करतेय या महासागरात उतरण्याचं! सर्वसाधारणपणे असं समजलं जातं, की शास्त्रीय संगीतात स्वर, ताल आणि लय यांचं महत्त्व शब्दांपेक्षा अधिक आहे, सुगम संगीतात शब्द, त्यांचे अर्थ, भाव या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. याचा अर्थ असा मुळीच नाही, की शास्त्रीय संगीतात भाव किंवा शब्द फारसे विचारात घेतले जात नाहीत. त्याशिवाय का राग आणि रस यांचं अतूट नातं आहे? अर्थात सगळ्याच विषयांप्रमाणे याही विषयात भिन्न भिन्न मतप्रवाह आहेतच, असोत!
शास्त्रीय बंदिशींचे विषय वेगवेगळे असतात. भक्ती हा त्यातला मुख्य विषय. हीच भक्ती जेव्हा कृष्णलीला वर्णिते, तेव्हा त्या बंदिशी आपोआपच शृंगाररसाचा आविष्कार करतात. भगवान कृष्ण आणि त्याच्या लीला हा तर नुसतं संगीतच काय, पण अगदी ६४ कलांच्या असंख्य कलाकारांचा युगानुयुगे जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याशिवाय पूर्वी शास्त्रीय संगीत गाणारे गायक ज्या राजदरबारात आपली कला सादर करत, त्या राजाचं गुणवर्णन, संगीताची महती, सृष्टी, जगरहाटी असे कितीतरी विषय या बंदिशींमधून मांडले गेले आहेत आणि जात आहेत. हिंदी बंदिशींमधला आणखी एक अनादी-अनंत विषय म्हणजे नाती. त्यातल्या त्यात पिया आणि सास-ननदिया हे तर अगदी खास!

तर मी ज्या बंदिशीची गोष्ट सांगतेय, ती याच विषयावरची. या बंदिशीची नायिका म्हणजे खटल्याच्या घरातली मधली सून, जिला सासू, नणंद यांच्या सोबतच जावा [मोठ्या आणि धाकट्या पण!] आहेत त्रास द्यायला. आणि अशा रगाड्यातून पिया भेटणं हे किती जिकिरीचं आणि कठीण आहे, ते तिचं तिलाच ठाऊक! तरीही ती पियाला भेटण्याचं धाडस म्हणा की साहस म्हणा, करते आणि आपल्या सखीला त्या घटनेचा इतिवृत्तांत सांगते, ही या बंदिशीची मध्यवर्ती कल्पना! आता हे तर काही विशेष नाही ना, ज्यावर एवढं घडाभर तेल ओतायला हवंय नमनालाच! पण तरीही मी ते काम करतेय, कारण या बंदिशीतला एकेक भाव, एकेक शब्द तिच्या स्वरावलीनं पेलून धरलाय!
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.