थंडीऽऽऽऽऽ!

गेले काही दिवस कडाक्याची थंडी पडली आहे. आता मुंबई-ठाण्यात २० च्या खाली तापमान म्हणजे ती कडाक्याचीच थंडी असते. :) पुन्हा कपाटातील स्वेटर/जॅकेट बाहेर आलेत. ह्या थंड हवेत सकाळी लवकर उठायचा कंटाळा तर येतोच, पण नंतर दुचाकी हाकत कार्यालयात जाणेही आलेच. ऊन असेल तर थोडे बरे असते. नाही तर मग थंडी ची हुडहुडी :)

कार्यालयातही वातानुकूलन यंत्राची येणारी हवा माझ्या डोक्यावरच. त्यामुळे तिथेही आराम नाही. मग दिवसभर स्वेटर/जॅकेट घालून बसावे लागते. तरी यावेळी बहुधा त्यांनी त्या यंत्राची हवा कमी थंड ठेवली आहे. गेल्या वर्षी तर काश्मीर मध्ये गेल्यासारखे वाटत होते. आणि वातानुकूलनाचे यंत्र बंद करायला सांगू शकत नाही. कारण तो मध्यवर्ती वातानुकूलनाचा भाग असल्याने इतरांना त्रास होऊ शकतो. एकंदरीत घरी/बाहेर नुसती थंडी.

आता तुम्हाला वाटेल मी एवढा बाऊ करत आहे का थंडीचा. नाही, तसे नाही. बाऊ नाही. आणि ही थंडी सहन करण्यापलीकडची आहे असेही नाही. ह्यापेक्षा जास्त थंडीचा अनुभव घेतला आहे. मजा घेतली आहे. तो आनंद वेगळा. पण बहुधा त्या त्या भागातील सरासरीपेक्षा तापमान खाली गेले की मला थंडी वाजायला लागते ;) आणि थंडी वाढली म्हटले की वेगवेगळ्या शहरातील थंडी अनुभवली ते आठवते.

लहानपणी, मुंबईत राहत होतो तेव्हा म्हणजे ९१/९२ मधील असेल. तापमान १८ अंश. से पर्यंत गेले होते. त्या काळी तर ती थंडी खूपच होती. थंडीत शरीराला हलकासा मार ही फार जोरात जाणवतो. त्या दिवशी संध्याकाळी क्रिकेट खेळताना मांडीवर बॉल लागल्यावर त्वचेची भरपूर आग होत तर होतीच पण जे वळ उठले होते ते आताही आठवतात. मग अंधार पडल्यावर आम्ही २/३ मित्र गप्पा मारत मारत काटक्या/लाकडे गोळा करून ठेवायचो. त्यानंतर मग मस्त शेकोटी करायची. घरून बटाटे आणून त्या शेकोटीत टाकायचे. जेवणाच्या आधीपर्यंत ते बटाटे मग तिखट-मीठ लावून खायचे. धुराचा वास असलेले, भाजलेले बटाटे मस्तच लागायचे. गंमत म्हणून एक दिवस आम्ही त्यात कांदा भाजण्याकरिता टाकला. लिबलिबीत झालेला तो कांदा काढून चव घेतली. नंतर कधी त्याला हात लावला नाही. :)

त्याच काळात मी आई वडिलांसोबत कलकत्त्याला गेलो होतो. डिसेंबरच्या महिन्यात. त्यातच मग २ दिवस दार्जिलिंगची सहल. एवढ्या थंडीचा अनुभव पहिल्यांदाच घेत होतो. पलंगावरील जाडी जाडी दुलई/रजई ही एवढी थंड होती की असे वाटायचे ओली आहे की काय. छतावर पाहिले तर पंखाच नाही. आता मला काय पंखा नको होता.


प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.