थंडीऽऽऽऽऽ! - भाग ३

नंतर मग मनालीजवळील रोहतांग येथे बर्फ असलेल्या ठिकाणी गेलो होतो. आयुष्यात मी पहिल्यांदा बर्फात जाणार होतो. जाताना वाटले होते की बर्फात आपला निभाव लागेल का? :)  पण तिकडे गेल्यावर पाहिले की बर्फ आधीच पडून गेला होता. वर आकाशात सूर्य तळपत होता. त्यामुळे खाली बर्फात उभे असूनही आम्हाला एवढी थंडी वाटत नव्हती. तो होता गुरुवार. शनिवारी दुपारी आम्हाला परत निघायचे होते. मध्ये वाटले की बर्फ पाहिला, आता बर्फ पडताना, म्हणजे खूप ऐकलेला 'स्नो-फॉल', पाहायला मिळाला तर किती मजा येईल. आमची ती इच्छाही पूर्ण झाली. शनिवारी सकाळी. हॉटेलमधून सकाळी बाहेर पडलो खरेदी करण्याकरिता. तेव्हा ढगाळ वातावरण होते. थेंब थेंब पाऊसही पडायला लागला होता. आमच्या मार्गदर्शकाने सांगितले की असाच पाऊस पडत राहिला तर मग ह्या थेंबांचेच बर्फ होऊन पडायला लागेल. दुकानात गोष्टींची खरेदी केली. बाहेर येऊन पाहिले तर रस्त्यावर सगळीकडे नुसता बर्फ साचला आहे आणि वरून बर्फाचा पाऊस पडत आहे. पहिल्यांदा पाहिलेला हिमवर्षाव. बर्फाचा आनंद घेऊ म्हणत सर्व बाहेरच उभे होते. तेथे थोडी गंमत केल्यावर मग परत जाणे भाग होते, कारण दिल्लीकरिता निघायचे होते. आता त्या बर्फात आमच्या हॉटेलपर्यंतच्या चढ्या रस्त्यावर बस वर जाणे कठीण होते. मग लहान जिप्सी कार मागवण्यात आल्या. वर जाता जाता पाहिले, बर्फात गाडी चालवणेही कठीण काम आहे. एक मारुती ८०० बहुधा, वर चढत तर नव्हतीच पण ब्रेक दाबून ठेवूनही बर्फावरून हळूहळू घसरत खाली येत होती. कशीतरी त्यांनी ती बाजूला नेली. जेवण झाल्यावर पुन्हा हॉटेलसमोरील जागेत एकमेकांवर बर्फ फेकण्याचा कार्यक्रम साजरा केला. मग हॉटेलमधून सामान लहान गाड्यांमध्ये चढविले. आणि खाली असलेल्या बसमध्ये आणून ठेवले. ह्या सगळ्या प्रकारात आमचा मार्गदर्शक नेहमीच्या साध्या कपड्यांतच होता आणि त्यातल्या त्यात त्याला गाडीत जागा न मिळाल्याने तो एवढ्या बर्फात गाडीच्या टपावर बसून आला होता. धन्य तो माणूस.


तिकडून परतताना पाहिले सगळीकडे नुसता बर्फ होता, जमिनीवर, झाडांवर, आणि वरून खाली पडणारा. सगळीकडे नुसते पांढरे पांढरे दृश्य. वाहतुकीला अडथळा येतच होता. तेव्हा वाटले की आपल्याला बर्फाचा पाऊस पाहण्याचा अनुभव एकदम योग्य वेळी मिळाला आहे, कारण आम्ही जर शुक्रवारी परत निघालो असतो तर बर्फ पडताना पाहायला मिळाला नसता आणि जर रविवारी परत निघायचे असते तर ह्या एवढ्या हिमवर्षावानंतर आम्हाला परत जायला मिळणे कठीण होते.


२००३ मध्ये आम्ही गेलो होतो अमरनाथ यात्रेला. तिकडे पुन्हा तेच १३००० फूट उंचावर थंडी तर असणारच, वर हवाही विरळ. त्यामुळे तिकडे जाण्याआधी पूर्ण वैद्यकीय तपासणी करून मगच जाता येते. जम्मू, पहलगाम वगैरे ठिकाणची थंडी आता काही जास्त वाटत नव्हती. 

प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.