मावशीचें घर !

मावशीचें घर आजोबांच्या घरावरच. तळमजल्याला आजोबांचें घर तर पहिल्या मजल्यावर मावशीचें. जिन्यावरून उजवीकडे वळलें कीं गॅलरीतून सरळ गेल्यावर मावशीच्या घराचे दार. दिवाणखान्यांत उघडणारें. मावशीच्या दिवाणखान्यांतहि तस्सेंच चौकोनी टेबल. दिवाणखान्याला सज्जे मात्र दोन. दरवाजांतून आंत आल्यावर डावीकडच्या बाजूला छोटा सज्जा. खालून वर आलेल्या पारिजातकाला या सज्जातून पारिजातकाला हात लावतां येई. मनगटाएवढें बारीक पण दणकट आणि लवचिक खोड, लालसर नारिंगी देठांची छोटी नाजूक, शुभ्र, सुवासिक फुलें, करवती कांठांचीं काळसर हिरवी घाटदार पानें आणि बदामाच्या आकाराची अंगठ्याएवढीं चपट हिरवीं फळें. या झाडावर चढतां येत नाहीं इतकें लवचिक खोड. पण अख्खें झाड गदागदां हलवलें कीं टपटप फुले पडतात. ती वेंचायचीं. फुलें वेचायला माझ्या आणि अरूणाबरोबर कधीं कधीं हेमाहि असायची. तर कधीं विदू. बालपणापासूनच मला पारिजातकानें मोहून टाकलें आहे. त्याचा गंध अख्ख्या घराला प्रसन्न, मंगलमय करून टाकतो. उगाच नाहीं खांडेकरांना पारिजातकाचीं फुलें हा लघुनिबंध सुचला. फुलें शेजारीं रुक्मिणीच्या दारांत पडतात म्हणून सत्यभामा कां रुसली कोण जाणें. घराला लागून पारिजातक असण्याची ऐटच वेगळी. असो. दरवाजाच्या समोरच्या बाजूला थोडा उजवीकडे दुसरा सज्जा. आतां मला इतक्या वर्षांनीं आठवतात त्या दोन गोष्टी. उजव्या कोपर्‍यांतला पुस्तकांच्या कपाटावर ठेवलेला मस्त हिरवा मॅजिक आय हिरवा डोळा असलेला आणि रंगीबेरंगी डायलमध्यें दोन छोटे दिवे लागलेला ऍमझेल कंपनीचा रेडिओ आणि नेहमीं दरवळणारा क्युटीक्युरा पावडरचा मस्त सुगंध. जोडीला उदबत्त्यांचा, फुलांचा आणि धूपाचा गंध. आजोळीं असल्यावर सकाळचें खेळून झालें कीं स्नान करून मावशीकडे एक फेरी टाकणें ही आजोळी असतांनाची रोजची संवय होती.

मावशीच्या घराच्या पहिल्या आठवणीत चौकोनी टेबलाशीं बाळादादा बसलेला आहे. अतिशय देखणें आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व. धारदार पण हवाहवासा वाटणारा पुरुषी आवाज, पांढरीफेक सुरवार, पांढराफेक लखनवी झब्बा, तलवारकट मिशी, केसांना सुवासिक तेल आणि केसांची ठेवण ज्वेल थीफमधल्या देव आनंद सारखी; त्याला मस्त शोभून दिसत असे. मामा आणि बाळादादा हे माझे दोन आदर्श, ज्याला अलीकडे रोल मॉडेल म्हणतात ते होते. हा सिनेमांत गेला असता तर नक्की नायक झाला असता. मी लहान असतांना दुसरीत वगैरे हा मला सुधाताई म्हणायचा व पप्पी घ्यायचा. मला पप्पी घेतलेली मुळ्ळींच आवडत नसे. मोठा झालों होतों ना मी! यानें पप्पी घेतल्यावर मी गाल पुसत असे. तें याला मुळींच आवडायचें नाहीं मग तो पुन्हां पप्पी घेई आणि पुसायची नाहीं नाहींतर पुन्हां घेईन म्हणून सांगत असे. मग त्याच्यासमक्ष मीं कद्धींच गाल पुसत नसे. पण याचें व्यक्तिमत्त्वच इतकें आकर्षक कीं मला कधींच याचा राग आला नाहीं. आणि त्याचा स्वभावहि तसा ऋजुच. कोणाला वाईट वाटेल वा कोण रागवेल अशी कोणाचीहि चेष्टामस्करी त्यानें कधीं केली नाहीं. कोणाशीं कज्जेखटलेहि नाहींत, त्यामुळें अजातशत्रु. हिंदी गाणीं ऐकणें व जिव्हाळ्यानें गप्पा मारणें या त्याच्या आवडीच्या गोष्टी.

प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.