थंडी!

हिवाळ्यात वातावरण कसं असतं
मस्त  गाऽऽर ,अगदी थंड
वाटतं त्या दिवसात कधी
करूच नये निद्रादेवीशी बंड ॥

सूर्यदेवही जांभया देत
जरा उशिराच उठतो  गारठून
गुलाबी थंडीत आपल्या
सोनेरी किरणांची नक्षी पसरून ॥

थंडीचं माहात्म्य पहाटे
जरा जास्तच  कळते
एका छोट्याश्या फटीतूनही  
रात्री थंडी  किती छळते ॥

रात्री झोपताना अंगावर मी
घेत नाही माझीच चादर
सकाळी माझ्याच अंगावर
असते भावाचीही चादर  ॥

कसंबसं उठल्यावर मग
शेकोटीच्या उबेची हवी-हवीशी साथ
अन ते वाफाळलेल्या चहाचे घुटके
त्या स्वर्गीय आनंदाची काय बात ॥

मध्येच हसणारा दवबिंदू
मनाला प्रसन्न करतो
धुक्यांचा गालिचाही मग
त्यात आपले रंग भरतो ॥

पोटापाण्यासाठी कामावर गेल्यावर
कामाचा ढीग जरी दिसतो मोठा
तरी एक मानसिक आधार असतो
थंडीचा दिवस आहे हा  छोटा ॥

रात्री जेवायच्या आधी जर 
प्यायला मिळाले गरमागरम सूप
तर मग त्या गुलाबी थंडीत 
जेवणाचीही लज्जत वाढते खूप ॥

कधी उग्र रूप धारण करून
जरी आणते अंगावर शहारे
तरी ऊन-पावसाची दगदग नसते
अन्‌ सृष्टीचेही रंगरूप असते न्यारे ॥

ऊन डोक्यावर आलं तरी
हवेत सुखद गारवा असतो
कोणी काहीही म्हटलं तरी
हाच ऋतू सर्वांना हवा असतो ॥


कवी: देवेंद्र चुरी(दवबिंदु)

५ टिप्पण्या:

इंद्रधनु म्हणाले...

छान अंक आहे.. कविता सुंदर.....

Gangadhar Mute म्हणाले...

सुरेख कविता. आवडली.

Suhas Diwakar Zele म्हणाले...

वाह देवा..मस्तच

अनामित म्हणाले...

प्राची,गंगाधरजी,सुहास.....आभार्स.

Geeta म्हणाले...

khup khup sunder ahi
Sunder chay palikaday kahi nahi ahi mhanun
khup khup chan sunder nice & soo & soo