गेले आडवे मांजर !

आपल्या समाजातील आंधळ्या समजुतींचा,रूढींचा अंध:कार दूर व्हावा ह्या सदिच्छेसह !

गेले आडवे मांजर,
चुके ठोका काळजाचा,
मांजर बी हळू बोले,
गेला उंदीर हातचा!-१

आज हाये अमावस्या,
वाटे धाक-धुक फार,
झाला पोरगा वकील,
आली दारावर तार !-२

कसंनुसं वाटे मले,
लेक दारात शिंकली,
परं माह्या येड्या मना,
तिले सर्दी भाय झाली !-३

पडे हातातून खाली ,
कुंकवाचा गं करंडा,
पर धनी आने घरी,
भरलेला बैलगाडा!-४

जाता तिघे जन संगे,
म्हने कामे बिघडती,
पर लेकरू आजारी,
संगे माय-बाप जाती !-५

जीव वरती खालती,
विझे देवाचा ह्यो दिवा,
कर थोडा तरी ईचार,
आली जोरात ही हवा !-६

भारी लवे डावा डोळा,
काय वाईट आनखी?
पर आली दारावर,
बगा साईची पालखी !-७

                                                                कवी: जयंत खानझोडे(मानस६)                                          

५ टिप्पण्या:

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

सदिच्छा आवडली.

सुधीर कांदळकर

उर्मी म्हणाले...

‘ मन चिंती, ते वैरी न चिंती‘
आपलेच मन सतत वाईट विचार आधी करते. पण तसेच होतेच असे नाही.
दोलायमान मन छानसे उलगडून दाखवले आहे.
शब्दातून त्या स्त्रीचे वर्णन ही आहे. तिचे राहण्याचे स्थान, राहणीमान, कुटूंब, विचार पध्दती, समजुती, श्रध्दा...
"परं माह्या येड्या मना, तिले सर्दी भाय झाली !-३" इथे ती स्वत:लाच समजावून सांगते आहे हे स्पष्ट झाले आहे.
तिचे मन दोन्ही बाजूंनी विचार करते आहे. पण नंतरचे विचार तिच्या आधिच्या अंधश्रध्दा पूसून काढत आहे.
संदेशात्मक कविता खूप खूप आवडली.

सुहास झेले म्हणाले...

जयंतजी, खूप छान..अतिशय सुंदर वर्णन

Gangadhar Mute म्हणाले...

वैदर्भी बोलीतील सुरेख कविता.

क्रांति म्हणाले...

सदिच्छा खूप खूप आवडली.