थंडीऽऽऽऽऽ! - भाग २

पण मुंबईत राहणार्‍या मुलाला एखाद्या घरात/हॉटेलमध्ये पंखा दिसला नाही तर नवल वाटणारच. पण तेव्हाच लक्षात आले की येथे पंख्याची गरजच नाही. त्यानंतर एका पहाटे टायगर हिल नावाच्या ठिकाणावर सूर्योदय पाहण्यास गेलो होतो. इतर वेळी थंडी जास्त होती. पण त्या उंच ठिकाणावर तर माझ्याकरिता आतापर्यंतचा उच्चांक होता. बोटांचे टोक थंडीने एवढे दुखायला लागले की माझ्या डोळ्यातून पाणीच आले होते. पण नंतर मग लालबुंद सूर्याचा गोळा पाहिल्यावर सर्व काही ठीक झाले आणि मग सूर्याच्या तापाने थंडीही कमी वाटायला लागली. पुन्हा मुंबईला आल्यावर नेहमीचे तापमान.

त्यानंतर मग थंडी पाहिली (पाहिली म्हणजे अनुभवली. थंडी डोळ्यांनीही पाहिली नाही कधी आणि कानांनी ऐकलीही नाही ;) ) ती नगर जिल्ह्याची. अभियांत्रिकी महाविद्यालयात होतो तेव्हा. पहिल्या वर्षाच्या पहिल्या सत्राची परीक्षा चालू होती, तेव्हाच तापमान कमी झाल्याचे जाणवत होते. पण मग दुसर्‍या सत्राकरीता सुट्टीनंतर परत गेलो तेव्हा तिकडचा खरा हिवाळा जाणवला.

मग डिसें २००१ मध्ये गेलो होतो दिल्ली-हरिद्वार-सिमला-मनालीच्या सहलीला. तिकडचे तापमान तर नेहमीच कमी असते हे ऐकूनच होतो. पण मग स्वत: फिरायला जाणार म्हणून मग दररोज त्या शहरांचे तापमान वृत्तवाहिन्यांवर नीट पाहणे सुरू झाले. गंमत आहे ना. एखादी गोष्ट आपण नेहमी पाहतो पण लक्षात येत नाही किंवा लक्ष देत नाही. पण त्या गोष्टीशी काही संबंध आला की मग नेहमी ती जाणवायला लागते. आधी कधी ते तापमान एवढे कमी असल्याचे लक्षात ठेवले नाही पण आता ५/६/७ अंशही खूप कमी वाटायला लागले. त्याच दिवसांत अजून एक गोष्ट पाहिली. दिल्ली आणि पुणे दोन दूरची शहरे, पण त्यांचे तापमान नेहमी एकमेकांच्या जवळचे. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातही.

दिल्लीला ५/६ अंश.से तापमानात फिरणे झाले. एखाद्या भागात नवीन असताना थंडी/गरमी जास्तच वाटते. पण मग त्याची सवय होऊन जाते. तिथेही तेच झाले. हरिद्वारला त्या थंडीत रात्री जेवणानंतर हॉटेलमध्ये परत येताना एका ठिकाणी लहानश्या मडक्यामध्ये गरम जाड सायीचे दूध पिण्यास खूप मस्त वाटले होते. आजही ते आठवून थंडीत गरम गरम दूध प्यायची इच्छा होत असते. शिमल्याला त्यापेक्षा जास्त थंडी आणि मनालीला आणखी जास्त थंडी. आमचे स्वेटर, मग हातमोजे, मग कानटोपी अशा एक एक गोष्टी वाढतच होत्या. पण आमचा सहल मार्गदर्शक तर स्वेटरशिवाय, आपण नेहमी घालतो तेवढ्याच कपड्यांत फिरत होता. तो म्हणाल्याप्रमाणे त्याला आता त्याचीही सवय झाली होती.

तिथे असताना मधल्या एका दिवशी जवळील कुलुजवळील मनीकर्ण म्हणून एका ठिकाणी गेलो होतो. तिकडे गरम पाण्याचे कुंड आहेत असे सांगण्यात आले होते. आम्ही ७-८ जण जीप भाड्याने घेऊन तिकडे गेलो. बाजूला बर्फाचे पाणी झालेली थंड नदी वाहत होती आणि आत गुहेतील कुंडात ९६ अंश से. पर्यंत तापमानाचे गरम पाणी. वेगळाच चमत्कार का? शास्त्रीय दृष्ट्या नाही. पण असो. ते नंतर कधीतरी पाहू. ह्याच गरम पाण्यात ते लोक भात शिजवायला ठेवायचे. इंधनाचा खर्च कमी झाला. :)

प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.