थंडीऽऽऽऽऽ! - भाग ५

आम्ही दुपारी साधारण ४ ४:१५ ला मिलवॉकी ला पोहोचलो. विमानतळावर सामानाच्या पट्ट्यावर आमचे सामान येण्याची वाट पाहू लागलो. सर्व बॅगा, सामान संपले, पट्टाही थांबला. पण आमचे सामान आले नव्हते. माझ्या सहकार्‍याची शंका खरी ठरली. आम्ही चौकशी केल्यावर आम्हाला सांगितले की, "तुमचे सामान आले नसेल तर पुढील विमानाने येईल. ते आम्ही तुमच्या घरी/हॉटेल मध्ये पोहोचवून देऊ. टॅक्सी ने आम्ही हॉटेल मध्ये पोहोचलो.  टॅक्सीमध्ये बसतानाच थंडीचा अंदाज आला होता. रस्त्यात पाहिले सगळीकडे नुसता बर्फ साचलेला. हॉटेलमधून आम्ही ताजेतवाने होऊन मग जेवणाकरिता बाहेर निघालो. सामान तर नव्हतेच. स्वागत कक्षातील मुलीला खाण्याच्या जागेबद्दल विचारले तर तिने सांगितले की ह्या भागातील मॉल/दुकाने वगैरे ७ वाजताच बंद होतात. आम्ही घड्याळात पाहिले तर पावणे सात वाजत होते. म्हटले पण आता जावे तर लागेलच.

माझ्या मित्राने आधीच सांगून ठेवले होते की सामान उशिरा येणे वगैरे होऊ शकते, तेव्हा स्वत:सोबतच्या बॅग मध्ये काही कपडे व महत्त्वाचे सामान घेऊन ठेव. त्यामुळे मी कार्यालयात घालण्याच्या कपड्यांची एक जोडी, कॉट्सवूल वगैरे स्वत:सोबत घेऊन ठेवले होते. हॉटेल मधून बाहेर निघताना कॉट्सवूल घालूनच होतो. पण माझ्या सहकार्‍याने त्याच्याकडे जास्त सामान ठेवले नव्हते. त्याला एका स्वेटर वरच भागवावे लागले. त्या थंडीत बाहेर हॉटेल शोधताना नाकी नऊ आले होते. सगळे काही बंद. साधारण एक किलोमीटर च्या अंतरावर एक हॉटेल दिसले. हुश्श. आता जाऊन बसलो. थंडी पासून थोडा आराम.

आम्ही बसल्यावर एक मुलगी तरातरा चालत आली. तिने काय खाणार असे विचारले. तिला आधी पाणी मागितले (छ्या.. ह्या लोकांत आदरातिथ्यच नाही.) तर ती दोन ग्लास भरून बर्फ घातलेले पाणी घेऊन आली. मनात म्हटले," बाई, बाहेरची थंडी कमी आहे का आता त्यात हे थंडगार पाणी प्यायचे?"

तिला माझ्या सहकार्‍याने सांगितले की, "थंड नाही गरम पाणी दे". ती थोड्या वेळाने खरोखरचे गरम पाणी घेऊन आली. दुसरा प्रकार मी उटीला पाहिला होता. कोणत्याही हॉटेलमध्ये गेले तरी कोमट पाणी प्यायला देणार. मग त्यांना सांगावे लागते की साधे पाणी द्या. पण पहिला प्रकार बहुधा अमेरिकेतच पाहायला मिळेल. एवढ्या थंडीत बर्फ घालून थंड पाणी? तिला मी सांगितले की, " हे नाही, साधे पाणी दे" मग ती साधे पाणी घेऊन आली. अर्थात ते ही त्या तापमानामुळे थंडच होते पण चालण्यासारखे होते. बाकी मग आम्ही जे उपलब्ध होते त्यात समजण्यासारखे पदार्थ मागवून खाल्ले व परत आलो. रात्री स्वागत कक्षामध्ये सांगून ठेवले की आमचे सामान येणार आहे. ते म्हणाले की आम्ही ते आमच्याकडे ठेवून तुम्ही सकाळी घ्या. आमच्या सुदैवाने रात्रीच ते सामान आले होते व आम्हाला ते दुसर्‍या दिवशी सकाळी मिळाले.

प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.