माझा (वि)चित्रकलेचा प्रवास ! - भाग ३

 त्या काळातील म्हणजे १९६० ते १९७५ काही चित्रे मी इथे दाखवणार आहे. त्या पुढे मात्र इतर व्यापांपुढे त्यालाही रामराम घडला. तेव्हा काही जमा केलेले साहित्य जे बासनात गुंडाळून ट्रंकेच्या कोपर्‍यात जपून ठेवले गेले त्यावरील धूळ माझ्या सेवानिवृत्तीनंतर झटकली गेली !

  आता सेवानिवृत्त झालो पुढे काय ? तेव्हा ते बासनात गुंडाळून ठेवलेले साहित्य मला खुणावू लागले. पण एखादा समाईक आवडीचा ग्रुप मिळाला तर काय बहार होईल असे विचार मनात घोळू लागले.
  
माझ्या मनात एखादी गोष्ट तीव्रतेने आली की मग त्यामागे विचार चालू होऊन ती घडूनही येते हा माझा अनुभव. घडूनही तसेच आले. मी राहतो त्याचे समोर श्री हडप नावाचे चित्रकार राहायचे. अभिनवमध्ये ते लेक्चरर होते. त्यांना माझ्या मनातील विचार सांगितला आणि त्यांनी तत्काळ मला संस्कार भारतीतच आणून ठेवले !
 खरं तर संस्कार भारतीत कोणीही कोणाला शिकवत नाहीत ! पण उत्तम, चांगले , बरे, साधारण. 
लहान वा मोठे स्त्री वा पुरुष सगळेच एकत्र येऊन चित्रे काढणार म्हटल्यावर आपोआपच तसे संस्कार आपल्यावर होत राहतात व  जसजशी वर्षे पुढे सरकतात तसतशी आपल्याही नकळत आपल्यात सुधारणा घडत जाते. माझेही  तसेच काहीसे झाले.  २००३ सालचा तो ऑक्टोबर महिना होता. अगदी प्रथम मी कृषी विद्यापीठात लॅंडस्केपिंगला गेलो होतो. जवळ जवळ  १९७५ नंतर मी प्रथम माझी रंग पेटी व ब्रश हाती घेतले होते. पहिलेच चित्र मी काढले खरे पण माझा माझ्यावरील विश्वासच उडाल्या सारखा झाला. अरे बाप रे मी तर सर्व काही विसरूनच गेलो होतो.  मग मला इतर सहकार्‍यानी हळू हळू टिप्स द्यायला सुरुवात केली. आणि पुन्हा एकदा मी श्रीगणेशा केला ! डोंगरेसरांनी तेव्हा सांगितलेल्या गोष्टी आता एकेक ध्यानी येऊ लागल्या. आज ह्या गोष्टीलाही अर्ध्या तपाहून अधिक वर्षे झालीत. आजही म्हणावी इतकी परिपक्वता माझ्यात आलेली नाही पण आता मनातील भिती दूर झाली आहे. मोकळ्या मनाने कुठेही जाऊ शकतो, कुठेही बसू शकतो, सहाध्यायी असेल तर ठीकच पण नसेल तरीही आता अडत नाही !




प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.