मी एका थोर गायकाला भेटायला जातोय हे माहीत नसेल तर लोक काहीही अर्थ काढू शकतात. मी जर त्यावेळी समाज काय म्हणेल हा विचार करून तेथे त्या वस्तीत गेलो नसतो तर आज आपण एका स्वर्गीय गाण्याला कायमचे मुकलो असतो. पण माझ्यातील कर्तव्य भावनेने माझ्या भीतीवर मात केली आणि मी खाली मान घालून त्यांच्या घरी गेलो. घरात शिरल्यावर मात्र मी त्या तणावातून मुक्त झालो आणि त्यांच्याशी चांगले दोन तास संगीतावर गप्पा मारल्या. त्यानंतर मी बर्याच वेळा त्यांच्याकडे गेलो. संगीतावरची आमची मते एकामेकांना ऐकवू लागलो. या भेटींमुळे मला एक फायदा झाला आणि तो म्हणजे त्यांच्या आवडी निवडीचा मला अंदाज आला आणि त्यांचाही माझ्यावरचा विश्वास वाढला. अशा काही मुलाखतींनंतर त्यानी एक दिवस मला त्यांचे गाणे रेकॉर्ड करायला परवानगी दिली. मी आनंदाने घरी परतलो. पण पुढे झाले भलतेच. आज करू, उद्या करू असे म्हणत त्यांनी बरीच टाळाटाळ केली शेवटी मी एक दिवस वैतागून त्यांना म्हटले “ एवढा काळ मी परमेश्वराची प्रार्थना केली असती तर कदाचित तो ही प्रसन्न झाला असता” हे ऐकल्यावर मात्र ते म्हणाले “ माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी, सांगाल त्या वेळेला मी रेकॉर्डिंगसाठी हजर राहीन”. पुढे मानधनाचाही प्रश्न निघाला पण त्याचाही एवढा त्रास झाला नाही. आणि खरोखरच ठरलेल्या दिवशी आणि वेळेला ते रेकॉर्डींगसाठी आले. तीच ती मारव्याची जगप्रसिध्द तबकडी. खॉंसाहेबांचाही मारवा फार लाडका होता. आता त्यांचा पहिल्या रेकॉर्डच्या वेळेचा वाईट अनुभव मागे पडून त्यांना या माध्यमाविषयी खात्री वाटू लागली होती, त्यामुळेच पुढे त्यांच्या गायनाच्या अनेक तबकड्या निघाल्या.
या मारव्याची एक आठवण मी माझ्या उराशी जपली आहे.एकदा तरूणपणी मी एकटाच हरिश्चंद्र गडावर कोकणकड्यावर बसलो होतो. त्या कोकण कड्याची खोली छातीत धडकी भरवत होती. समोर सूर्य अस्ताला जात होता. त्याची उबदार किरणे अंगावर घेत मी माझा टेप लावला आणि हा मारवा ऐकला. जसा जसा अंधार पडायला लागला तशा त्या दरीतल्या डोंगराच्या सावल्या अजूनच गडद होऊ लागल्या. त्या सगळ्या निसर्गाची खोली त्या अंधाराबरोबर वाढता वाढता एवढी वाढली की मारव्याची खोली जास्त की या निसर्गाची, हे मला समजेना. शेवटी डोळ्यातून पाणी आले नी मी माझ्या तंबूत शिरलो. हा अनुभव नंतर मी अनेक वेळा घेतला आहे.
अमीरखॉसाहेबांनी चित्रपटांसाठीसुध्दा काही गाणी म्हटली.पहिला सिनेमा होता क्षुधित पाषाण. हा एक बंगाली सिनेमा होता. बैजू बावरामधील शेवटच्या जुगलबंदीसाठी तानसेनसाठी अमीरखॉंसाहेबांचा आवाज तर ठरला पण बैजूसाठी कोणाचा हे काही ठरेना. कोणी म्हणाले पं. ओंकारनाथ ठाकूरांचा आवाज घ्या. पण अमीरखॉसाहेबांनी डि. व्हि. पलूसकरांचा आवाज त्या आवाजाच्या निर्मळतेमुळे सुचवला आणि ते अजरामर गाणे ’आज गावत मन मेरो झुमके” निर्माण झाले. आज परिस्थिती अशी आहे की मिया तानसेनचे काम कोणी केले होते हे कोणी सांगू शकत नाही पण अमीरखॉसाहेबांनी ते गाणे गायले होते हे कोणीही विसरू शकत नाही. मित्रहो गाण्याची ताकद ही अशी आहे. या चित्रपटाचे टायटल सॉंग पण अमीरखॉसाहेबांनीच म्हटले होते. अजून दोन चित्रपटातील गाणी रसिकांच्या मनातून जाऊच शकत नाहीत. एक म्हणजे झनक झनक पायल बाजे आणि दुसरा गुंज उठी शहनाई.
अमीरखॉंसाहेबांचे अजून एक महत्वाचे काम म्हणजे त्यांनी तराणा या गायन प्रकाराबद्दल केलेले संशोधन. बिहार संगीत विद्यालयाने त्यांना या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती दिली होती. त्यांचा हा प्रबंध त्या विद्यालयाकडे आहे का नाही हे माहीत नाही. बहुदा नसेलच. पण या अभ्यासानंतर ते बर्याच मेहफिलीत तराणा न चुकता गायचे हे मात्र खरं.
असे म्हणतात की १३व्या शतकात अमीर खुस्रो नावाचा जो कवी, संगीतकार होऊन गेला तो हज़रत निज़ामुद्दीन अवलियाचा परमशिष्य होता. निज़ामुद्दीन स्वर्गवासी झाल्यावर अमीर खुस्रो गुरूच्या कबरीच्या सेवेत रहायला गेले आणि त्यांनी उरलेले आयुष्य तेथेच व्यतीत केले. त्या वास्तव्याच्या काळात त्यांनी तराणा या प्रकाराला जन्म दिला आणि अनेक तराणे रचले. तेथेच त्यांनी आपली जीवनयात्राही संपवली. तराण्यामधे खुस्रोंनी थोड्याच शब्दांची योजना केली, पण हे शब्द जलद गतीने आलटून पालटून म्हणावे लागत. या शब्दांना अर्थ होता आणि ते फारसीमधून आले होते. ते शब्द आणि त्यांचा अर्थ होता –
दर : आतील. आतले, आत.दारा :दर-आ : आत या.दर्तन : दर-तन : शरीराच्या आत.तननदारा : तन – आ- दारा: शरीराच्या आत या/येतोम : त्वं-अहं- मी म्हणजे तूच आहे.नादिरदानी – नादिर-दानि (दानाई) : नादिर म्हणजे सर्वात श्रेष्ठ. दानाई म्हणजे सगळं समजणारा (परमेश्वर)तनदारदानी – तन-दार-दानि – शरीरात प्रवेश करणारा ज्ञानी.
तराण्याची सगळ्यात प्राथमिक रचना ही आहे – दारा दारा दर्तन दारात दर्तन दर्तन ( ये ! ये माझ्या शरीरात प्रवेश कर) अल्लासाठी अनेक शब्दांचे प्रयोजन करण्यात आलेले आहे. उदा. या ला ला ला लोम किंवा ये याली, येल याला, यलाले इ.इ. हे शब्द वापरून सुफी संत स्वरात त्यांच्या प्रार्थना करतात. हा तराणा मनाच्या समाधी अवस्थेत म्हणतात. त्यावेळी बहुतेक ते स्वत:भोवती गिरक्या घेत फिरत असतात. त्या अवस्थेलाच महत्व असल्यामुळे या शब्दांकडे कोणीच लक्ष दिले नाही व त्याचा अर्थही काळाच्या ओघात नष्ट झाला. नंतरच्या काळात अमीरखॉसाहेब म्हणतात की तराण्याला करमणुकीचे साधन म्हणून वापरायला सुरवात झाली तेव्हा गायकांनी त्यात तबला, पखवाज, मृदुंगाचे बोल टाकायला सुरवात केली पण तराण्यातला भक्तिभाव पूर्णपणे नष्ट झाला.
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
---|
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.