अमीर अली परत इंदोरला आला. १९३७ साली त्याचे वडील वारले आणि घराला आता त्यांच्या आधारची अत्यंत गरज होतीच. त्याने एक नवा प्रयोग करायचा ठरवला. गाण्याची पध्दत बदलली पण मेरूखंडच्या भोवती. मेहफिलीत साधारणत: राग पहिल्यांदा अतीविलंबित, नंतर मध्यलयीत व शेवटी द्रुतलयीत ताना घेत म्हटला जातो. तरूण अमीर अलीने या तिन्हीसाठी गुरू शोधण्याचे ठरवले. त्यांना ते मिळाले पण उलट्या क्रमाने.
उस्ताद रज़ब अली खान तर अमीरला लहानपणापासून ओळखत होते. त्याला ते “बेटा अमीर” या नावानेच हाक मारायचे. रज़ब अलींचे गुरूही मोठ्या तोलामोलाचे होते. खुद्द त्यांचे वडील मुगल खान. त्यानंतर त्यांनी बंदे अली खान यांच्याकडून बीन शिकली. सारंगी तर त्यांच्या रक्तातच होती. शेवटी त्यांनी जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखॉं यांच्याकडे तालीम घेतली. या सगळ्यांचा संस्कार त्याच्या गायकीवर झाला. रज़ब अलीखॉ ज्यांना लोक “रज़ब गाते गज़हब” असे म्हणायचे, सांगायचे, मी तरूणपणी कसा गात असेन हे जर तुम्हाला ऐकायचे असेल तर अमीरचे गाणे ऐका.
त्यांचे पुढचे गुरू होते उस्ताद अमन अली खान. हे होते भेंडी घराण्याचे. हे मध्यलय आणि मेरूखंड गायकीसाठी भारतात प्रसिध्द होते. हे जरी इंदोरचे होते, तरी रहायचे मुंबईच्या भेंडीबज़ार या भागात. ब्रिटीशांच्या काळात या भागात ब्रिटीश अधिकार्यांचे हवेशीर बंगले होते. तेथे एक मोठा बाजार होता. त्याच्या मागच्या भागाला म्हणायचे “Behind Bazar”. त्याचे झाले भेंडीबाजार. या भागात पुढे जी गायकी निर्माण झाली तेच भेंडीबाजार घराणे. अमन अली कधीच अतीविलंबित किंवा द्रुत लयीत गात नसत. त्यांची आवडीची लय होती मध्यम. त्यांना कर्नाटकी संगीताची पण आवड होती. राग हंसध्वनी हा त्यांचा अत्यंत आवडता राग. अमीर अलीला त्यांनी बरीच वर्षे तालीम दिली. पुढे स्वत: अमीरखॉंसाहेब मेहफिलीत त्यांची आठवण म्हणून हा राग गायचे. याच रागात त्यांनी एक फारसी भाषेत असलेला तराणा गायला त्याने त्यांना जगभर प्रसिध्दी मिळवून दिली. त्याचे शब्द होते – इत्तिहादेस्ता मियान ने मानो तो...
विलंबित / अतीविलंबितसाठी त्यांनी उस्ताद अब्दूल वाहीद खान यांची तालीम घेतली. हे उस्ताद अब्दूल करीम खान यांचे चुलत भाऊ आणि श्रीमती हिराबाई बडोदेकर यांचे गुरू होते. त्यांना “बहीरे वाहीद खान असेही म्हणायचे कारण त्यांना फार कमी ऐकू यायचे. ते एक पोचलेले बीनकार पण होते. राग सजवणे आणि त्याची हळूवार, प्रत्येक स्वराची काळजी घेत त्या रागाचे सादरीकरण करणारे हे एकमेव होते. गंमत म्हणजे जरी अमीर अली या उस्तादांना क्वचितच भेटत असे तरी तो अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडेच शिकत असे. त्यांचे रेडिओवरचे गाणे ऐकून. रेडिओचे त्या वेळचे महत्व यातून कळते. असो.
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
---|
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.