उस्ताद आमीरखॉ - भाग ७

त्यांचा हंसध्वनी रागातला तराणा ते त्याच भावनेने म्हणत. त्याचे बोल होते इत्तिहादेस्ता मियाने मानो तो, मानो तो निस्ता मियान ने मानो तो.

इत्तिहाद म्हणजे एक होणे. थोडक्यात याचा अर्थ असा सांगता येईल. “तू (परमेश्वर ) आणि मी असे एकात्म पावलो आहोत की आता मी आणि तू असे वेगळे काही राहिलेच नाही.”


सरोदवादक अमज़दअलीखॉ यांनी त्यांची एक आठवण सांगितली आहे ती त्याच्याच शब्दात –
ते साल होते १९७१. कलकत्यात तानसेन समारोह नावाचा एक संगीत समारोह भरायचा. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या समारोहात मला आमंत्रण होते. एक बुजुर्ग गायक श्री. शैलेनबाबू याचे आयोजन करायचे. हा समारोह संध्याकाळी चालू होऊन रात्रभर चालायचा आणि दुसर्‍यादिवशी सकाळी संपायचा, आपल्या सवाई गंधर्व महोत्सवाप्रमाणेच. परंपरेने बुजुर्ग कलाकाराच्या गायनाने याचा समारोप व्हायचा. त्या दिवशी माझी फ्लाईट उशिरा पोहोचली आणि मी त्या हॉलमधे पोहोचेपर्यंत उस्ताद अमीरखॉसाहेबांचे गाणे सुरू झाले होते. शैलेनबाबू या प्रकाराने अतिशय अस्वस्थ झाले होते. मी जेव्हा त्यांना सांगितले की मी खॉसाहेबांनंतर वाजवू शकणार नाही तेव्हा ते थोडेसे चिडलेच. बरोबर आहे. प्रेक्षकांनी तिकिटे अगोदरच काढलेली होती. त्यांनी माझी बरीच समजूत काढायचा प्रयत्न केला, पण मी ठामपणे नकारच दिल्यामुळे त्यांचे काही चालेना. हे सगळे चालले असतानाच खॉसाहेबांचे गायन संपले आणि ते निघाले होते. शैलेनबाबूंनी त्यांना गाठले आणि त्यांना माझ्या नकाराबद्दल सांगितले. ते ऐकल्यावर त्यांनी माझ्याकडे बघून मला जवळ जवळ आज्ञाच केली. म्हणाले “ माझ्यानंतर तू नाहीतर कोण वाजवणार ? जा. वाजव !”

पहाटेचे पाच वाजले होते. मी तसाच स्टेजवर गेलो आणि सुरवात करणार तर काय पुढच्याच रांगेत खॉसाहेब बसले होते. मी नम्रपणे त्यांना म्हटले “ खॉसाहेब आपण गायल्यानंतर आता मला काय वाजवायचे हेच सुचत नाही आहे. कृपया आपण शांतपणे घरी जा आणि आराम करा.”

त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि मला सुरवात करायला सांगितले. मला अजून आठवतंय मी कोमल रिषभ असावरीने ती पहाटेची मेहफिल चालू केली. परमेश्वराच्या कृपेने ती माझ्या अनेक मेहफिलीत सगळ्यात अविस्मरणीय ठरली. त्या पहाटे मला खॉसाहेबांनी जगातील सगळ्यात मोठे बक्षीस दिले होते.”

अमीरखॉसाहेब हे एक कलकत्यातील बडे प्रस्थ होते. एक काळ असा होता की त्या शहरातील एकही मेहफिल त्यांच्याशिवाय व्हायची नाही. एवढेच काय त्यांना भारत सरकारचे पद्मभूषण, राष्ट्रपती पारितोषिक, स्वरविलास असे अनेक मानसन्मान मिळाले पण या अत्यंत साध्या माणसाचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. कोणीही कधीही त्यांच्याकडे जाऊ शकत असे. खर्‍या अर्थाने ते सुशिक्षित व सुफी संत होते. त्यांनी अमेरीकेत न्युयॉर्क विद्यापीठातही काही काळ संगीत शिकवले.
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.