उस्ताद अमीरखॉंसाहेब - भाग २


या गायकीला अजूनही बर्‍याच नावाने ओळखले जात होते. उदा. मेरखंड, खंडमेरू, सुमेरखंड किंवा मिरखंड इ. इ. हा शब्द दोन शब्दांचा बनलेला आहे हे काही वेगळे सांगायला नको. मेरू + खंड. मेरूचा संस्कृतमधला अर्थ होतो अत्यंत स्थिर किंवा अचल. खंड म्हणजे “भाग” जसे सुपारीची खांड. या स्वरांच्या बाबतीत याचा अर्थ घ्यायचा असेल तर आपण असा घेऊ शकतो - मेरू म्हणजे रागातील एखादा अचल/स्थिर स्वर. आता या रागातील दोन स्वरांच्या अनेक रचना होऊ शकतात. उदा. द्यायचे झाले तर सा आणि रे हे दोन स्वर घेतले तर सा रे आणि रे सा या दोन रचना होऊ शकतात. तीन स्वर असतील तर जागांची अदलाबदल करून सहा वेगवेगळ्या प्रकारच्या रचना होऊ शकतात. सातही स्वर जर स्थिर असतील तर उदा. भैरवीमधे स्वरांच्या जागांची अदलाबदल करून ५०२४ प्रकारच्या रचना होऊ शकतात. ज्या गायकाला मेरूखंड गायकी आत्मसात करायची असते त्याला या सगळ्या रचनांचा अभ्यास करून, पाठ करून आपल्या मेंदूत साठवून ठेवाव्या लागतात. त्या गायकाला हे ही शिकवले जाते की एखाद्या मेहफिलीत अशा काही रचनांचा संच करून, एखाद्या रागात रंग भरून त्या रागाची रंगत कशी वाढवायची. हे सगळे डोक्यात ठेवणे आणि त्याचा योग्य उपयोग रागात करणे ही एक कर्मकठीण गोष्ट आहे. अमीर अलीच्या वडिलांनी वरील अपमानास्पद प्रसंगानंतर ही कला, कला कसली, विद्याच म्हणायला पाहिजे त्याला, त्याच्या त्या कोवळ्या वयात शिकवायला सुरवात केली. त्याचे वय लक्षात घेता त्याला फक्त एकच तासाची तालीम दिली जात असे. त्यानंतर त्याला खेळायला सोडण्यात येत असे. जसे वय वाढले तसे त्याचा हे शिकण्याचा आणि तालमीचा काळ वाढवण्यात आला. काहीच वर्षात तो तीन,चार स्वरांचा मेरूखंड रचनेत वापरायला लागला. स्वरांची ओळख नीट व्हावी म्हणून तालमीचा भर सरगम, अलंकार आणि पलटे यांच्यावर देण्यात आला. नंतर त्याची तालीम ख्याल गायकीकडे वळली. तो काळ अमीर अलीचा आवाज फुटण्याचा होता त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याची गाण्याची तालीम तात्पुरती थांबवली आणि ते त्याला सारंगी शिकवू लागले. याचा त्यांना आयुष्यभर फायदा झाला. शुक्रवारच्या नमाज़ानंतर त्यांच्या घरी बरेच बुज़ुर्ग गायक वादक जमायचे आणि मग त्या खाजगी मेहफिलीत रंग भरायचा. जे येत होते त्यांची नावे बघितली तर थक्क व्हायला होते. उस्ताद रज़ब अली खान, उस्ताद नसिरुद्दीन डागर, बीनकार उस्ताद वाहीद खान, उस्ताद अलाह बंदे, उस्ताद ज़फ्रुद्दीन खान, बिनकार उस्ताद मुराद खान, सारंगी नवाज़ उस्ताद बूंदू खान.


प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.