उस्ताद अमीरखॉंसाहेब ! भाग ३

हे आजच्या सारखे नुसते नावाने उस्ताद किंवा पंडीत नव्हते. आणि त्या काळी अहो रुपम अहो ध्वनी असाही प्रकार नसायचा. गाणारे थोर होते तसेच थोर, गाणे समजणारेही होते. चांगल्या गायकाला लोकमान्यता मिळाल्यावरच अशा पदव्या मिळायच्या. जे स्वत:ला थोर (?) समजायचे त्यांची टर उडवायला समाज कमी करत नसे. ही नावे नीट लक्षात ठेवा. यातील प्रत्येकाने आपले आयुष्य़ संगीतासाठी कुर्बान केले आहे. आपले बाळपण, तारूण्य, संसाराचे वय हे सगळे त्यांनी पणाला लावून ते गाण्याची तालीम करत राहिले. एवढेच नव्हे तर ते आयुष्यभर शिकतच राहिले. तर, अशा थोरामोठ्यांचे गाणे ऐकायला मिळणे हे मोठे भाग्यच अमीर अलीच्या नशिबात होते. या नित्याच्या मेहफिलीतच त्याचे खरे शिक्षण झाले असे म्हणायला हरकत नाही. त्यातच मेरूखंड गायकीचाही त्याचा अभ्यास चालू होताच. वयाच्या बाविसाव्या वर्षी तरूण अमीर अली मुंबईला आला. तो काळ होता साधारणत: १९३४ सालचा. काही खाजगी मेहफिलीत गायल्यानंतर त्याने काही राग ग्रामोफोन कंपनीसाठी म्हटले आणि त्याच्या रेकॉर्डही काढण्यात आल्या. त्या रेकॉर्डस्‌वर “अमीर अली, इंदोर असे लिहिलेले आढळते.
या तबकड्यांवर त्यांचे फेटा घातलेला आणि तलवार कट मिशा ठेवलेल्या असा फोटो दिसतो. काही काळानंतर हे दोन्हीही गायब झाले. केव्हा हे बरोबर सांगता येणार नाही. त्या काळाच्या ओघात गेल्या का त्यांनी त्या मुद्दाम काही कारणाने काढल्या हे समजत नाही. या तबकड्यांवर त्यांचा उल्लेख “संगीत शिरोमणी” संगीत रत्न” असा केलेला आढळतो. हे अर्थात त्या तबकड्यांचा खप वाढावा म्हणून लिहिलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याचे गाणे त्या वेळीही चांगलेच होते. या रेकॉर्डस्‌बद्दल सिंगबंधूतले पंडित तेजपाल सिंग यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे “ या तबकडीवरचे गाणे आगळे वेगळे आहे. या गाण्यावर अमन अली, इंदोर यांची छाप आहे. पांढर्‍या तीनमधे हा राग आळवला आहे. स्थायी आणि अंतरा सुरवातीला दोनदा म्हटला आहे. जोरदार ताना उस्ताद रज़ब अली खॉंसाहेबांसारख्या वाटतात.” ज्यांचे गाणे त्यांनी ऐकले त्याचा हा परिणाम असावा.

१९३५ साल हा गायकांच्या व रसिकांच्या दृष्टीने सुवर्णकाळच होता असे म्हणायला हरकत नाही. पाच सहा कंपन्यांनी मोठमोठ्या गायकांच्या गाण्याच्या तबकड्या काढण्याचा सपाटा लावला होता. यावर श्री. केशवराव भोळे शुध्द सारंग या नावाने बर्‍याच मासिकातून लिहायचे. पण आश्चर्य म्हणजे यात कुठेही अमन अली या गायकाचे नाव नव्हते. का बरं झाले असावे असे ? त्यांच्या रेकॉर्डस्‌ खपत नव्हत्या का त्यांच्या पुरेशा मैफिली झाल्या नव्हत्या ? कदाचित मेरूखंड गायकी ही समजायला फार क्लिष्ट असावी व सामान्य माणसाला त्यात तांत्रिक बाबी जास्त दिसत असाव्यात. कारण काहीही असो त्या खपल्या नाहीत हे मात्र खरं.

प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.