संपादकीय

शब्दगाऽऽरवा २०१०चा हा अंक आपल्या हाती देतांना मला खूपच आनंद होत आहे. ह्या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे हा अंक विविधतेने नटलेला आहे.  विविधता आणि वेगळेपण देखील.  आता हेच पाहा ना... परदेश म्हटला की आपल्या डोळ्यांपुढे काही ठराविक पाश्चात्य देशच येतात आणि पाळीव प्राणी म्हटले की कुत्रा, मांजर, ससा असे टिपीकल केसाळ, गुबगुबीत प्राणीच आपल्याला आठवतात.  या अंकात मात्र चीनसारख्या सर्वाहारी देशात काही काळ वास्तव्य केलेल्या भारतीय जोडप्याने तिथे पाळलेल्या चक्क सरीसृप वर्गातील प्राण्याच्या गमतीजमती वाचायला आणि पाहायलाही मिळतात त्या मीनल गद्रे यांच्या आमचे कासव - बंडू या लेखात. 

मुलीच्या लग्नानंतर घरात एकटेपणा जाणवू नये म्हणून सोबतीला एक कंम्पॅनियन ठेवणारी महिला पुढे तिची आईच बनते हा सुखद अनुभव मांडलाय जयबाला परूळेकर यांनी आम्ही दोघी या लेखात.  भक्तिरसाने ओथंबलेली गुरुदत्ताची आरती रचलीय पाषाणभेद उर्फ दगडफोड्या यांनी.  मंदार जोशी व विद्याधर भिसे यांनी केलेलं अनुक्रमे इनटॉलरेबल क्रुएल्टी आणि  गर्बावित्सा  ह्या परकीय चित्रपटांचं रसग्रहण एवढं परिणाम कारक आहे की जणू तुम्ही चित्रपट तुमच्या डोळ्यांनी पाहतच आहात असा भास होईल. 

शास्त्रीय संगीतप्रेमींना सुखावून जाणारी बाब म्हणजे या अंकात उस्ताद अमीरखॉं साहेबांचा जयंत कुलकर्णी यांनी उलगडलेला जीवनपट, क्रांती साडेकर यांनी साकारलेली एका बंदिशीची गोष्ट, तर प्रभाकर फडणीसांच्या सौजन्याने स्मृतीरंजनात सादर झालेले पं. फिरोज दस्तुर यांचं गोपाला मेरी करुना क्यौं न आवे? आणि माणिक वर्मांचं घननीळा लडिवाळा ... हे गायन यांनी अक्षरश: चार चांद लावलेत. 

भूगोल आणि इतिहास ह्या विषयांशी शालेय जीवनानंतर आपला संबंध जवळपास संपल्यातच जमा असतो पण याच इतिहास आणि भूगोलावर एकत्रित रित्या प्रकाश टाकलाय अमेरिकेतल्या एरी कॅनॉलची माहिती देणार्‍या प्रभाकर फडणीसांनी, वेरूळच्या शिल्पाची शिल्पकथा सांगणार्‍या प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी आणि सांचीच्या स्तूपाचे माहात्म्य सांगणार्‍या महेंद्र कुलकर्णी यांनी. 

पाच वर्षांपूर्वी मुंबईत आलेला जलप्रलय अनुभवणार्‍या आनंद काळे यांनी परिणामकारक शब्दात निसर्गाने घडविलेल्या तांडवाचं अंगावर शहारे आणणारं वर्णन केलंय काळरात्रमध्ये. काहीतरी हरवल्यासारखं वाटतं या कवितेत मनाची गोंधळलेली अवस्था मांडलीय जीवनिका कोष्टी यांनी तर विविध प्रसंगांमध्ये बदलणार्‍या मानसिक स्थितीचा आलेख उतरवलाय राहुल पाटणकर उर्फ राघव यांनी त्यांच्या मन या कवितेत.  मनातल्या अंतरंगात साकारणारे विश्व नेमके कसे आहे हे कोडे पडले आहे ही कुठली दुनिया असली? ही कविता लिहीणार्‍या कामिनी फडणीस-केंभावी उर्फ श्यामली यांना.

अमेरिकेतल्या शासकीय कार्यालयात मिळणारी वागणूक आणि त्याची भारतातील शासकीय कार्यालयाशी केलेली तुलना हा सोमेश बारटक्के यांचा अनुभव देव काकांच्या आवाजात आपण ऐकू शकाल गांधी,फ्रॅंकलिन आणि एसएसएन(ssn) ! या खुसखुशीत लेखात. 

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपल्या देशात आजवर अनेक प्रयत्न झालेत पण त्यांना म्हणावे तसे यश काही मिळू शकले नाही.  मुख्यत्वेकरून ग्रामीण भागात तर ही समस्या फारच खोलवर रुजलीय.  या आपल्या ग्रामीण बांधवांना समजेल अशा प्रकारे त्यांच्याच भाषेत आणि मोजक्या शब्दात पण अतिशय परिणामकारकरीत्या हा प्रयत्न या अंकात केलाय जयंत खानझोडे यांनी त्यांच्या गेले आडवे मांजर या कवितेत.

चिडवितो गोपिकांना या गवळणीत गंगाधर मुटे यांनी समाजमनाला नेहमीच सुखावणार्‍या कृष्णाच्या बाळलीलांचं वर्णन केलंय.  आजच्या जमान्यातली बालकंही कृष्णापेक्षा कुठे कमी नाहीत याची प्रचीती आणून दिलीय तात्पर्य या अभिवाचनातून हेरंब ओक यांनी त्यांच्या खट्याळ चिरंजीवांचे मधुर बोल ऐकवून तर अगदी बालवयातच निसर्गानं लादलेलं दुखण्याचं ओझं आपल्या पाठीवर आनंदाने वागवणार्‍या अमेरिकेतल्या बालकाची कथा सांगतायत अपर्णा संखे पालवे त्याची बॅकपॅक या अभिवाचनातून.

थंडी चांगलीच जाणवतेय आणि त्यातून हा आपला हिवाळी अंक; तेव्हा हा शब्दगारवा शब्दश: आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी थंडी कविता लिहिलीय देवेंद्र चुरी यांनी, तर वेगवेगळ्या शहरांमधील थंडीचा अनुभव थंडीऽऽऽ लेखाद्वारे मांडलाय देवदत्त गाणार यांनी.  या थंडीमुळे वाढलेली पोटाची भूक शमविण्याचे पुण्यकर्म केलेय जयबाला परूळेकर यांनी खास थंडीसाठीच्या पदार्थांची मेजवानी आपल्यापुढे मांडून.  

कुटुंबप्रमुखच जर स्वैराचारी असेल तर आपल्या निष्पाप, निरागस संसारफुलांची तो कशी वाताहत करून टाकतो हे अतिशय समर्पकपणे लिहिलंय विशाल कुलकर्णी यांनी आपल्या दैव या कथेत.  संपूर्णत: केवळ दोन मित्रांनी एकमेकांना पाठविलेल्या पत्ररूपातूनच उलगडत जाणारी ही शोकांतिका एक वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकृती आहे.  नशीब या लेखात भ्रमणध्वनी सेवा पुरविणार्‍या नामांकित कंपनीकडून आलेला दु:खदायक अनुभव आणि सोबतच इलेक्ट्रॉनिक टपाल पत्त्यावर फसवणूक करणारे निरोप पाठविणार्‍या मंडळींचा अनुभव मांडलाय विनायक रानडे यांनी.  अतिशय रोखठोक शब्दात भारतीय लोकशाहीचा लेखाजोखा मांडलाय नरेंद्र गोळे यांनी त्यांच्या भारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले ? या लेखात. 

परिस्थितीने गांजलेली व्यक्ती देवालाच सुटकेसाठी विनंती करते अशी कल्पना केलीय अलका काटदरे यांनी त्यांच्या मसुदा या कवितेत.  निवृत्तीनंतर आपला छंद जोपासण्याचे स्वप्न पूर्ण होतानाचा अनुभव सादर केलाय सुरेश पेठे यांनी त्यांच्या माझा (वि)चित्रकलेचा प्रवास! या लेखाद्वारे.  निसर्गाशी जवळीक साधणार्‍या आपल्या घराचं वर्णन करतायत समीर नाईक त्यांच्या माझीया अंगणी या कवितेतून.  बालवय सरत गेल्याची हुरहुर मांडलीय अपर्णा लळिंगकर यांनी त्यांच्या लहानपण देगा देवा आठवणींमधून.  तर लहानपणच्या आठवणींचा मागोवा घेत थेट आजच्या काळापर्यंतचा हिशेब लावलाय सुधीर कांदळकर यांनी त्यांच्या मावशीचे घर या लेखात. 

लांबचा प्रवास म्हटला की ओघानेच आगाऊ आरक्षण करणं आलं, पण ज्यांच्या करवी आपण हे आरक्षण करतो ते कर्मचारी प्रवाशांशीच कसं आगाऊ वर्तन करतात हे शाहीर व सोंगाड्या यांच्या संवादातून आपल्यासमोर उलगडलंय लेखक व अभिवाचक विनायक पंडित यांनी.  प्रेमात पडणार्‍या व्यक्तीला आपल्या जोडीदाराची वाट बघण्याचा अनुभव नेहमीच येतो.  अशा वेळी न चिडता काय करायचं हे सांगताहेत लेखक व अभिवाचक विनायक पंडित त्यांच्या वाटबघ्याचे दिवास्वप्न या मुक्तछंद कवितेत तर जोडीदारासोबत व्यतीत केलेल्या क्षणांचा अनुभव आपल्या सोबत वाटून घेताहेत विशाल कुलकर्णी त्यांच्या सहवास या कवितेमधून. 

साहित्यकृती पाठविणार्‍या सर्व मान्यवरांचे आणि पडद्यामागचे संयोजन करणार्‍या तांत्रिक सल्लागार श्रेया रत्नपारखी व प्रमोद देव काकांचे मन:पूर्वक आभार आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

धन्यवाद.

आपला,
चेतन सुभाष गुगळे

१८ टिप्पण्या:

विनायक पंडित म्हणाले...

चेतन, तुमचं अभिनंदन! संपादकीय जसे पाहिजे तसं झालंय.थोडक्यात आणि समर्पक शब्दात तुम्ही संपूर्ण अंकाचा धांडोळा घेतलाय.श्रेया, तुमचंही अभिनंदन! पहिल्याच फटक्यात गारवा अगदी चांगलाच जाणवतोय.तो निश्चित सुखावह वाटतोय! छानच!

Meenal Gadre. म्हणाले...

चेतन, छोट्याश्या संपादकिय लेखातून संपूर्ण अंकाचा आढावा घेऊन अंकाचे आकर्षण अधिक वाढवले आहे.

Jayashree Ambaskar म्हणाले...

व्वा.......एकदम झकास झालंय संपादकीय :)
अंकही अगदी देखणा दिसतोय.

सगळ्यांचं मनापासून अभिनंदन !!

Gangadhar Mute म्हणाले...

व्वा. मस्त लिहिलेय संपादकीय.
अख्खा अंकच डोळ्यासमोर उभा झालाय. :)

Unknown म्हणाले...

अंक फार सुट्सुटीत झाला आहे. पण. . . संपादकीयातील ठळक अक्षरांना जर मूळ लेखाचा दुवा चिकटवला असता तर सोनेपे सुहागा झाले असते, अजूनही तसे करणे शक्य आहे. प्रयत्न करा.

अनामित म्हणाले...

चेतन, अंक आणि संपादकीय दोन्ही मस्त झाले आहेत ...हळूहळू पूर्ण आस्वाद घेइनाच अंकाचा ...बाकी विनायक रानडे म्हणतात त्याप्रमाणे ठळक अक्षरांना जर मूळ लेखाचा दुवा चिकटवला असता तर सोनेपे सुहागा झाले असते....ह्या अंकासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या सर्वांचेच मनापासून अभिनंदन ....!!!

प्रमोद देव म्हणाले...

रानडेसाहेब आणि देवेन, संपादकीयात दुवे न देण्याचे कारण हे की मग संपादकीय पूर्ण वाचलंच गेलं नसतं....दिसला दुवा ,दिली टिचकी आणि गेले त्या लेखावर..असं झालं असतं....दुसरी गोष्ट अशी की अनुक्रमणिका आणि पानाच्या उजव्या बाजूला अशा दोन्ही ठिकाणी लेखांचे दुवे दिलेलेच आहेत...त्यामुळे संपादकीयाचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं.

पेठेसाहेब, आपल्या पिकासात मला त्यावेळी प्रवेश मिळाला नव्हता...आणि मला वाटले की थोपुवर /पिकासावर तीच चित्र असणार..म्हणून मी तुम्हाला पुन्हा छेडलं नाही...पण तुम्ही संबंधित चित्र लेखावरोबर जोडून अथवा पुरवणी म्हणून पाठवली असती तर हा प्रश्नच निर्माण नसता झाला...असो. तुमची इच्छा असेल तर अजूनही आपण ती चित्र बदलू शकतो.

eksakhee म्हणाले...

ank aavadalaa. dhanyavaad.

ब्लॉगवाले डॉट इन्फो म्हणाले...

अंक वाचायला इतक्यात सवड होणार नाही कारण गळ्यापर्यंत बुडावे इतपत इतर उपक्रमांमधे व्यग्र आहे. अंक प्रथमदर्शनी बेहद्द आवडला आहे. श्रेयाताई, अभिनंदन! जसा अंक असायला हवा आहे, तसं सेटींग तंतोतंत जमलं आहे याबद्दल तुझं कौतुक करायलाच हवं. अंक वाचला की लेखांवरही प्रतिक्रिया देईनच. या अंकासाठी सहभाग देणार्‍या प्रत्येकाचं अभिनंदन व शुभेच्छा!

Shreya's Shop म्हणाले...

धन्यवाद कांचन.

चेतन सगळ्या अंकाचा आढावा मस्तच घेतला आहे. संपादकीयात दुवे न देण्याचे कारण म्हणजे काही विशिष्ट लेखाकांचंच / प्रकारचं लिखाण वाचल जातं. इतर साहित्यप्रकारांवर आणि साहित्यावर अन्याय होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला होता.

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

चेतनभाऊ, संपादकीय छानच ! अंक नक्कीच बहारदार झाला असणार याची खात्री आहे. वाचुन काढायच्या मागे लागतो आता.

Suhas Diwakar Zele म्हणाले...

चेतन, अभिनंदन खूपच छान आणि समर्पक अशी ओळख करून दिलीत आपण. तसेच देवकाका, श्रेयाताई आणि कांचनचे पण अभिनंदन. अंक जवळजवळ झालाय वाचून. मस्त गारेगार अंक आहे.

खूप खूप धन्यवाद तुमचे :)

chetansubhashgugale म्हणाले...

विनायक पंडित, मीनल गद्रे, जयश्री अंबासकर, गंगाधर मुटे, विनायक रानडे, देवेंद्र चुरी, श्रेया रत्नपारखी, विशाल कुलकर्णी आणि सुहास झेले आपणा सर्वांचे आभार.

क्रांति म्हणाले...

संपादकीय आणि अंक दोन्ही मस्त!

chetansubhashgugale म्हणाले...

धन्यवाद क्रांतिजी.

jivanika म्हणाले...

संपादकीय आणि अंक दोन्हीही खूप छान आहे नेहमीप्रमाणे.रानडे काका म्हणाले त्याप्रमाणे मीपण विचार केले होता पण देव काका म्हणतात ते पण बरोबर आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

सर्व लेखनाचा धांडोळा घेऊन केलेली संपादकीयची मांडणी विशेष आवडली. अंक नेहमीप्रमाणेच बहारदार. अंकासाठी मेहनत घेणार्‍या सर्व कारागिरांचे अभिनंदन.

chetansubhashgugale म्हणाले...

धन्यवाद दिलीप बिरूटे आणि जीवनिका कोष्टी