उस्ताद आमिरखॉ - भाग ८

त्यांची गायकी आता अमरनाथ, कानन, श्रीकांत बाकरे, सिंग बंधू, कंकणा बॅनर्जी पूर्बी मुखर्जी अशा त्यांच्या शागिर्दांमुळे अस्तित्वात आहे.
आमीरखॉसाहेबांचे आयुष्य तसे खडतरच गेले. पण त्यांच्या गायकीमधील प्रामाणिक भाव, वेदना, उत्कटता या त्यांच्या आयुष्याच्याच देणग्या होत्या, त्यामुळे त्यातही थोडे डोकवायला लागेल. ज्या काळात ते गायक म्हणून स्वत:ला प्रस्थापित करायची धडपड करत होते त्या काळात कलाकारांचा राजाश्रय निसटून चालला होता. सामान्य माणसाची ऐपत फुकट संगिताच्या मेहफिलींना हजेरी लावून संगीताची मजा लुटणे एवढीच होती. त्यामुळे पैशाची वानवाच होती. काही काळ तर त्यांनी एखाद्या फकीरासारखा काढला. मुंबईमधे असताना ते त्यांच्या मामाकडे मोहम्मद खान यांच्याकडे अरबलेनमधे रहायचे. इथे त्यांची गाठ पडली रज़बअलींचे पुतणे अमानत अली यांच्याशी. अमानत अलींनी त्यांची गाठ प्रो. देवधरांशी घालून दिली. प्रो. देवधरांसाठी त्यांनी बर्‍याच मैफिली केल्या. १९३६ साली त्यांच्या वडिलांनी त्यांना मध्यप्रदेशातील रायगड संस्थानच्या महाराज चक्रधरसिंग यांच्या कडे रुजू व्हायला सांगितले. हे महाराज त्यांच्या पदरी असलेल्या कलाकारांना वेगवेगळ्या गावात भरणार्‍या मेहफिलींना स्वखर्चाने पाठवायचे. त्या प्रथेप्रमाणे या वर्षी त्यांनी अमीरखॉसाहेबांना मिर्झापूर संस्थानाला पाठवले. त्या संगीताच्या संमेलनात मोठमोठ्या गायकांनी/ वादकांनी हजेरी लावली होती. फैयाज़खॉसाहेब, इनायतखॉसाहेब (विलायतखॉंचे वडील), पं, ओंकारनाथ ठाकूर, केसरबाई केरकर ही त्यातली काही नावे. अमीरखॉसाहेबांनी त्या मेहफिलीत मेरूखंड पध्दतीने गायला सुरवात केली मात्र, प्रेक्षकांनी त्यांची हुर्यो उडवली. नियोजकांनी त्यांना ठुमरी गाण्याची विनंती केली पण त्यांनी ती धुडकावली आणि ते त्या स्टेजवरून खाली उतरले. त्यांनी लगेचच ते संस्थान सोडले आणि ते इंदोरला गेले. १९३७ साली त्यांचे अब्बाजान गेले. १९४१ पर्यंत ते मुंबईत होते आणि मग दिल्लीला गेले. दिल्लीला त्यांना उस्ताद अब्दूल वहीदखॉं यांची एक शिष्या मुन्नीबाई हिला शिकवायचे होते. दिल्लीला ते सादिक बिल्डींग, जी. बी रोड येथे रहात होते. त्यानंतर ते कलकत्याला काही कोठेवालींच्या वस्तीत रहात होते. स्वातंत्र्य मिळायच्या जरा अगोदर त्यांनी लाहोरला एक मेहफिल केली व त्यानंतर ते परत मुंबईला परतले. मुंबईला ते वल्लभभाई रोड्वर पिला हाऊस या भागात रहात होते. ही वस्ती नाचणार्‍या, मुजरा करणार्‍या बायकांची होती. पण इथे बरेच मोठमोठे गायक रहात असायचे, उदा. बडे गुलाम अली, थिरकवॉ इ.इ. कारण येथे त्यांना या मुलींच्या भरपूर शिकवण्या मिळायच्या. नंतर थोडेफार पैसे मिळायला लागल्यावर ते पेडर रोड वर वसंत बिल्डिंगमधे रहायला गेले.
खॉंसाहेबांचे पहिले लग्न झाले ते उस्ताद विलायत खॉसाहेबांच्या बहिणीशी. हिचे नाव होते झीनत. ते तिला “शरिफन” या नावाने हाक मारायचे. आर्थिक अडचणींमुळे हे लग्न काही फार टिकले नाही. हिच्यापासून त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव आहे फाहमिदा. ही मंबईमधली प्रसिध्द होमिओपाथीची डॉक्टर होती.
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.