उस्ताद आमीरखॉ - भाग ५

उस्ताद अब्दूल वहीद हे झुमरा तालात गायचे. हा ताल डोलायला लावणारा असल्यामुळे त्यांना फार आवडायचा. अमीर अलीनेही याच तालात गायला सुरवात केली. अमीर अलीला एका खाजगी मेहफिलीत गायची संधी मिळाली ज्यात उस्ताद अब्दूल वहीदही हजर होते. त्यांनी अमीर अलीच्या गाण्याचे खूप कौतुक केले.

अशाप्रकारे संगीत शिक्षणाबरोबर इंदोर  विद्यापिठामध्ये अभ्यासही चालू होताच. थोड्याच काळात प्रो. अमीर अली म्हणून ते ओळखले जाऊ लागले. त्याच सुमारास त्यांनी फेटा आणि मिशांचा त्याग केला असावा. हे मोठे क्रांतीकारक पाऊल होते कारण त्या काळात सर्व गायक फेटा घालूनच गाण्याच्या मेहफिलीत यायचे. अमीर अलीच्या गाण्यात आता वर लिहिलेल्या तीनही गायकींचा सुरेख आणि सुरेल संगम झाला होता आणि त्यातूनच मला वाटते इंदोर घराण्याचा जन्म झाला असावा. अर्थात या सगळ्या गायनाचा पाया होता “मेरुखंड गायकी”

हळूहळू ते उस्ताद अमीरखॉंसाहेब या नावाने ओळखले जाऊ लागले. सर्व प्रकारच्या रसिकांना त्यांच्या गायनात काही ना काहीतरी आवडीचे मिळायचेच त्यामुळे त्यांच्या मेहफिलीत रंग भरू लागला. शांत, गंभीर स्वर, शुद्ध मुद्रा, शुद्ध वाणी, अतीविलंबित लय, लयदार गाण्यात मधेच अर्थपूर्ण विरामाच्या जागा, अवघड सरगम, वेगवान पण गमकयुक्त ताना, सुरेल, तीन सप्तकातून फिरणार्‍या दमदार, दाणेदार ताना ही त्यांच्या गायनाची वैशिष्ठ्ये मानली जाऊ लागली. त्यांच्या गायनात फारसी रचनांचा बराच वापर असायचा. साथीला सहा तारांचा तंबोरा आणि मधे मधे न कडमडणार्‍या तबल्याची साथ. ( हे फार अवघड आहे. आजही आपण जर त्यांचे गाणे ऐकलेत तर तबल्याची साथ कशी असावी हे ऐकायला मिळेल.).

सहा फूट उंचीचा हा गायक गाण्यासाठी रंगमंचावर अवतरला की एखादा योगी पुरूष आला असे वाटायचे. त्यांच्या गाण्यातही अध्यात्म पुरेपूर उतरलेले वाटायचे. गाताना डोळे मिटलेले आणि सगळ्या बंदिशी अध्यात्म्याचा पाया असलेल्या, त्यामुळे मैफिलीला एक प्रकारचा वेगळाच माहौल असायचा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक राग संपल्यानंतर ते लगेचच दुसरा राग सुरू करायचे, त्यामुळे मेहफिल एकसंध वाटायची. मेहफिलीत साहेबांनी कधीच ठुमरी आणि भैरवी म्हटली नाही. त्याबद्दल विचारल्यावर ते हसून म्हणायचे, “अरे माझे गाणे अजून संपलेले नाही”

ज्यांच्यामुळे आज खॉंसाहेबांचे गायन आपल्याला तबकडीवर उपलब्ध आहे ते एच्‌ एम्‌ व्हीचे श्री. जोशी त्यांच्या आठवणीत लिहितात –
अमीरखॉसाहेबांचे गाण्याच्या रेकॉर्ड काढण्यासाठी त्यांची परवानगी घेण्यासाठी त्यांच्या घरी जाणे आवश्यक होते. ते ज्या वस्तीत रहात होते त्या वस्तीत जायचे माझ्या जिवावर आले होते. कोणी मला तेथे पाहिले तर काय होईल या एकाच शंकेने मला घेरले होते.
 
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.