थंडीऽऽऽऽऽ! - भाग ६

पहिले एक दोन दिवस तर गटागटाने ये जा करत असल्याने टॅक्सी करून आलो. पण मग बसने जाणे होते. त्यामुळे एक दिवस निघण्याआधी कोणती बस, वेळ वगैरे विचारून संध्याकाळी निघालो . आम्हाला वाटले आता बस येईल, आता येईल. पण आमची वेळ चुकली होती. आम्ही बस गेल्याच्या पाच मिनिटानंतर बस थांब्यावर पोहोचलो होतो.  त्या थंडगार हवेत हाल होत आहेत असे वाटले.  शेवटी अर्धा पाऊण तास वाट पाहून आम्ही विचार केला की टॅक्सी ने जाऊ. तेवढ्यात बस आली. मिल्वॉकीला मी १३ दिवस असेन पण फक्त दोनच दिवस बिना-बर्फाचे गेले. इतर दिवस तर बर्फच बर्फ चोहीकडे.  शनिवारी सकाळी परत निघायचे विमान पकडायचे होते. म्हणून रात्री सामान भरत होतो. रात्री पुन्हा जोरदार हिमवर्षाव चालू झाला. सकाळपर्यंत भरपूर बर्फ जमा झाला होता. इतर दिवस काही वाटले नव्हते एवढा बर्फ पडत होता तरी. पण आता वाटले की असाच बर्फ पडत राहिला तर परत जाण्याची अडचण. रस्ते बंद झाले तर काय. पण सकाळी बर्फ हटविणारी गाडी आली. तिने गाड्यांचा रस्ता मोकळा करून ठेवला. हुश्श.

हे सर्व झाले माझे अनुभव. पण जे ऐकून आहे त्याप्रमाणे तर बहुतेक शहरांत तापमानाचा फरक खूपच असतो. नागपूर, दिल्ली येथील थंडीतील ५ अंश तापमान ते उन्हाळ्यात ४०/४५ अंशापर्यंत तापमान जाते. म्हणजे त्या शहराच्या तापमानात ३५/४० अंशांचा फरक पडतो. ह्याउलट मुंबई मध्ये १८ ते ३८ म्हणजे २० चा. पण माझ्या माहितीतले नुकतेच ऐकलेले म्हणजे सायबेरिया देशात तापमान हिवाळ्यात -३८ पर्यंत जाते तर उन्हाळ्यात +४० पर्यंत जाते म्हणजे तापमानाचा फरक ७८ अंशाचा?


आपल्या सवयीप्रमाणे २० अंशांचा फरक परवडला. त्याचीच मजा घेत राहू :)







लेखक: देवदत्त गाणार






थंडीऽऽऽऽऽ! - भाग ५

आम्ही दुपारी साधारण ४ ४:१५ ला मिलवॉकी ला पोहोचलो. विमानतळावर सामानाच्या पट्ट्यावर आमचे सामान येण्याची वाट पाहू लागलो. सर्व बॅगा, सामान संपले, पट्टाही थांबला. पण आमचे सामान आले नव्हते. माझ्या सहकार्‍याची शंका खरी ठरली. आम्ही चौकशी केल्यावर आम्हाला सांगितले की, "तुमचे सामान आले नसेल तर पुढील विमानाने येईल. ते आम्ही तुमच्या घरी/हॉटेल मध्ये पोहोचवून देऊ. टॅक्सी ने आम्ही हॉटेल मध्ये पोहोचलो.  टॅक्सीमध्ये बसतानाच थंडीचा अंदाज आला होता. रस्त्यात पाहिले सगळीकडे नुसता बर्फ साचलेला. हॉटेलमधून आम्ही ताजेतवाने होऊन मग जेवणाकरिता बाहेर निघालो. सामान तर नव्हतेच. स्वागत कक्षातील मुलीला खाण्याच्या जागेबद्दल विचारले तर तिने सांगितले की ह्या भागातील मॉल/दुकाने वगैरे ७ वाजताच बंद होतात. आम्ही घड्याळात पाहिले तर पावणे सात वाजत होते. म्हटले पण आता जावे तर लागेलच.

माझ्या मित्राने आधीच सांगून ठेवले होते की सामान उशिरा येणे वगैरे होऊ शकते, तेव्हा स्वत:सोबतच्या बॅग मध्ये काही कपडे व महत्त्वाचे सामान घेऊन ठेव. त्यामुळे मी कार्यालयात घालण्याच्या कपड्यांची एक जोडी, कॉट्सवूल वगैरे स्वत:सोबत घेऊन ठेवले होते. हॉटेल मधून बाहेर निघताना कॉट्सवूल घालूनच होतो. पण माझ्या सहकार्‍याने त्याच्याकडे जास्त सामान ठेवले नव्हते. त्याला एका स्वेटर वरच भागवावे लागले. त्या थंडीत बाहेर हॉटेल शोधताना नाकी नऊ आले होते. सगळे काही बंद. साधारण एक किलोमीटर च्या अंतरावर एक हॉटेल दिसले. हुश्श. आता जाऊन बसलो. थंडी पासून थोडा आराम.

आम्ही बसल्यावर एक मुलगी तरातरा चालत आली. तिने काय खाणार असे विचारले. तिला आधी पाणी मागितले (छ्या.. ह्या लोकांत आदरातिथ्यच नाही.) तर ती दोन ग्लास भरून बर्फ घातलेले पाणी घेऊन आली. मनात म्हटले," बाई, बाहेरची थंडी कमी आहे का आता त्यात हे थंडगार पाणी प्यायचे?"

तिला माझ्या सहकार्‍याने सांगितले की, "थंड नाही गरम पाणी दे". ती थोड्या वेळाने खरोखरचे गरम पाणी घेऊन आली. दुसरा प्रकार मी उटीला पाहिला होता. कोणत्याही हॉटेलमध्ये गेले तरी कोमट पाणी प्यायला देणार. मग त्यांना सांगावे लागते की साधे पाणी द्या. पण पहिला प्रकार बहुधा अमेरिकेतच पाहायला मिळेल. एवढ्या थंडीत बर्फ घालून थंड पाणी? तिला मी सांगितले की, " हे नाही, साधे पाणी दे" मग ती साधे पाणी घेऊन आली. अर्थात ते ही त्या तापमानामुळे थंडच होते पण चालण्यासारखे होते. बाकी मग आम्ही जे उपलब्ध होते त्यात समजण्यासारखे पदार्थ मागवून खाल्ले व परत आलो. रात्री स्वागत कक्षामध्ये सांगून ठेवले की आमचे सामान येणार आहे. ते म्हणाले की आम्ही ते आमच्याकडे ठेवून तुम्ही सकाळी घ्या. आमच्या सुदैवाने रात्रीच ते सामान आले होते व आम्हाला ते दुसर्‍या दिवशी सकाळी मिळाले.

प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.

थंडीऽऽऽऽऽ! - भाग ४

पण अमरनाथच्या गुहेपर्यंत जाण्यास दीड दिवस, परत येण्यास दीड दिवस आणि थंडी तर वाढणारच. त्यानुसार आम्ही आपले नेहमीप्रमाणे दररोजचे कपडे अदलून बदलून जरी घालायचे म्हटले तरी ३ जोड कपड्यांचे घेऊन ठेवले. वर जायचे म्हटले तर एवढे सामान घेऊन चढता येणार नव्हते. मग पिट्ठू ला घेतले. सामान उचलण्याकरिता जे लोक आपल्यासोबत येतात त्यांना ते पिट्ठू म्हणतात. ग्लेशियर म्हणजेच गोठलेली नदी वगैरे वरून जाताना वेगळा अनुभव तर येत होताच पण थंडीचाही. संध्याकाळी सरकारने ठरवून ठेवलेल्या ठिकाणांवर खाण्याची आणि तंबूमध्ये झोपण्याची सोय केली होती. त्या थंडीत घरात झोपणेही कठीण पण आम्ही तंबूत झोपलो होतो. आणि जिथे खाताना हातमोजे काढण्यास जीवावर येत होते, तिकडे कपडे बदलणे तर विसराच. पूर्ण ३ दिवस त्याच कपड्यांवर काढले होते. पण मला एक जाणवले. तिकडे हवा विरळ असून, थंडी असून नाकाला झोंबणे एवढेच अनुभवले. पण इतर काही त्रास वाटला नाही. त्यामुळे मग ह्या तापमानाला आपण स्थिरावू शकतो असे वाटले.


त्यानंतर मग अनुभव आला बँगलोर किंवा मग बंगलुरू. आता मनालीचा बर्फ आणि अमरनाथचे कमी तापमान पाहिल्यावर बँगलोरला काही त्रास नाही व्हायला पाहिजे. ते तर होतेच. त्रास नाही वाटला. पण आपण मुंबईच्या तापमानाला स्थिरावलेले. त्यापेक्षा कमी तापमान हे थंड वाटणारच. बँगलोर नंतर मग पुण्याचीही थंडी अनुभवली. पण ते काही आता एवढे लिहिण्यासारखे खास वाटत नाही.

पुण्याला असताना पहिल्यांदा अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. तीही थेट शिकागो जवळील मिलवॉकी शहरात नेमक्या थंडीच्या मोसमात. तिकडे जाण्याच्या आधी अर्थातच हवामानाबद्दल चौकशी करून घेतली होती. सहकार्‍याने तापमान सांगितले -१७ अंश. से. छान. उणे तापमान आधी अनुभवले होते पण -५ वगैरे. आता -१७ म्हणजे नवीन परीक्षा? परीक्षा म्हणण्यापेक्षा अनुभवच म्हणू :)

आमच्याकरिता अमेरिकेचे प्रवेश ठिकाण होते मिनियापोलीस (याचे लिखाण/उच्चार चुकले असल्यास तुम्ही स्वत:च दुरुस्त करून घ्यावे ;) )  तिथे आमची व सर्व सामानाची तपासणी/चौकशी झाल्यावर देशांतर्गतगत विमानात सामान पाठवण्याकरिता एका विमानतळ सुंदरीला (हवाई सुंदरीच्या धर्तीवर)  विचारून हलत्या पट्ट्यावर सामान ठेवले. माझ्या सहकार्‍याने शंका उपस्थित केली की, "आपले सामान बरोबर येईल ना? कारण बहुधा तिला आपण काय विचारले ते कळले नाही". पण तोपर्यंत सामान आत निघून गेले होते, म्हणून काही करता येणे शक्य नव्हते.

प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.

थंडीऽऽऽऽऽ! - भाग ३

नंतर मग मनालीजवळील रोहतांग येथे बर्फ असलेल्या ठिकाणी गेलो होतो. आयुष्यात मी पहिल्यांदा बर्फात जाणार होतो. जाताना वाटले होते की बर्फात आपला निभाव लागेल का? :)  पण तिकडे गेल्यावर पाहिले की बर्फ आधीच पडून गेला होता. वर आकाशात सूर्य तळपत होता. त्यामुळे खाली बर्फात उभे असूनही आम्हाला एवढी थंडी वाटत नव्हती. तो होता गुरुवार. शनिवारी दुपारी आम्हाला परत निघायचे होते. मध्ये वाटले की बर्फ पाहिला, आता बर्फ पडताना, म्हणजे खूप ऐकलेला 'स्नो-फॉल', पाहायला मिळाला तर किती मजा येईल. आमची ती इच्छाही पूर्ण झाली. शनिवारी सकाळी. हॉटेलमधून सकाळी बाहेर पडलो खरेदी करण्याकरिता. तेव्हा ढगाळ वातावरण होते. थेंब थेंब पाऊसही पडायला लागला होता. आमच्या मार्गदर्शकाने सांगितले की असाच पाऊस पडत राहिला तर मग ह्या थेंबांचेच बर्फ होऊन पडायला लागेल. दुकानात गोष्टींची खरेदी केली. बाहेर येऊन पाहिले तर रस्त्यावर सगळीकडे नुसता बर्फ साचला आहे आणि वरून बर्फाचा पाऊस पडत आहे. पहिल्यांदा पाहिलेला हिमवर्षाव. बर्फाचा आनंद घेऊ म्हणत सर्व बाहेरच उभे होते. तेथे थोडी गंमत केल्यावर मग परत जाणे भाग होते, कारण दिल्लीकरिता निघायचे होते. आता त्या बर्फात आमच्या हॉटेलपर्यंतच्या चढ्या रस्त्यावर बस वर जाणे कठीण होते. मग लहान जिप्सी कार मागवण्यात आल्या. वर जाता जाता पाहिले, बर्फात गाडी चालवणेही कठीण काम आहे. एक मारुती ८०० बहुधा, वर चढत तर नव्हतीच पण ब्रेक दाबून ठेवूनही बर्फावरून हळूहळू घसरत खाली येत होती. कशीतरी त्यांनी ती बाजूला नेली. जेवण झाल्यावर पुन्हा हॉटेलसमोरील जागेत एकमेकांवर बर्फ फेकण्याचा कार्यक्रम साजरा केला. मग हॉटेलमधून सामान लहान गाड्यांमध्ये चढविले. आणि खाली असलेल्या बसमध्ये आणून ठेवले. ह्या सगळ्या प्रकारात आमचा मार्गदर्शक नेहमीच्या साध्या कपड्यांतच होता आणि त्यातल्या त्यात त्याला गाडीत जागा न मिळाल्याने तो एवढ्या बर्फात गाडीच्या टपावर बसून आला होता. धन्य तो माणूस.


तिकडून परतताना पाहिले सगळीकडे नुसता बर्फ होता, जमिनीवर, झाडांवर, आणि वरून खाली पडणारा. सगळीकडे नुसते पांढरे पांढरे दृश्य. वाहतुकीला अडथळा येतच होता. तेव्हा वाटले की आपल्याला बर्फाचा पाऊस पाहण्याचा अनुभव एकदम योग्य वेळी मिळाला आहे, कारण आम्ही जर शुक्रवारी परत निघालो असतो तर बर्फ पडताना पाहायला मिळाला नसता आणि जर रविवारी परत निघायचे असते तर ह्या एवढ्या हिमवर्षावानंतर आम्हाला परत जायला मिळणे कठीण होते.


२००३ मध्ये आम्ही गेलो होतो अमरनाथ यात्रेला. तिकडे पुन्हा तेच १३००० फूट उंचावर थंडी तर असणारच, वर हवाही विरळ. त्यामुळे तिकडे जाण्याआधी पूर्ण वैद्यकीय तपासणी करून मगच जाता येते. जम्मू, पहलगाम वगैरे ठिकाणची थंडी आता काही जास्त वाटत नव्हती. 

प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.