थंडीऽऽऽऽऽ! - भाग ४

पण अमरनाथच्या गुहेपर्यंत जाण्यास दीड दिवस, परत येण्यास दीड दिवस आणि थंडी तर वाढणारच. त्यानुसार आम्ही आपले नेहमीप्रमाणे दररोजचे कपडे अदलून बदलून जरी घालायचे म्हटले तरी ३ जोड कपड्यांचे घेऊन ठेवले. वर जायचे म्हटले तर एवढे सामान घेऊन चढता येणार नव्हते. मग पिट्ठू ला घेतले. सामान उचलण्याकरिता जे लोक आपल्यासोबत येतात त्यांना ते पिट्ठू म्हणतात. ग्लेशियर म्हणजेच गोठलेली नदी वगैरे वरून जाताना वेगळा अनुभव तर येत होताच पण थंडीचाही. संध्याकाळी सरकारने ठरवून ठेवलेल्या ठिकाणांवर खाण्याची आणि तंबूमध्ये झोपण्याची सोय केली होती. त्या थंडीत घरात झोपणेही कठीण पण आम्ही तंबूत झोपलो होतो. आणि जिथे खाताना हातमोजे काढण्यास जीवावर येत होते, तिकडे कपडे बदलणे तर विसराच. पूर्ण ३ दिवस त्याच कपड्यांवर काढले होते. पण मला एक जाणवले. तिकडे हवा विरळ असून, थंडी असून नाकाला झोंबणे एवढेच अनुभवले. पण इतर काही त्रास वाटला नाही. त्यामुळे मग ह्या तापमानाला आपण स्थिरावू शकतो असे वाटले.


त्यानंतर मग अनुभव आला बँगलोर किंवा मग बंगलुरू. आता मनालीचा बर्फ आणि अमरनाथचे कमी तापमान पाहिल्यावर बँगलोरला काही त्रास नाही व्हायला पाहिजे. ते तर होतेच. त्रास नाही वाटला. पण आपण मुंबईच्या तापमानाला स्थिरावलेले. त्यापेक्षा कमी तापमान हे थंड वाटणारच. बँगलोर नंतर मग पुण्याचीही थंडी अनुभवली. पण ते काही आता एवढे लिहिण्यासारखे खास वाटत नाही.

पुण्याला असताना पहिल्यांदा अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. तीही थेट शिकागो जवळील मिलवॉकी शहरात नेमक्या थंडीच्या मोसमात. तिकडे जाण्याच्या आधी अर्थातच हवामानाबद्दल चौकशी करून घेतली होती. सहकार्‍याने तापमान सांगितले -१७ अंश. से. छान. उणे तापमान आधी अनुभवले होते पण -५ वगैरे. आता -१७ म्हणजे नवीन परीक्षा? परीक्षा म्हणण्यापेक्षा अनुभवच म्हणू :)

आमच्याकरिता अमेरिकेचे प्रवेश ठिकाण होते मिनियापोलीस (याचे लिखाण/उच्चार चुकले असल्यास तुम्ही स्वत:च दुरुस्त करून घ्यावे ;) )  तिथे आमची व सर्व सामानाची तपासणी/चौकशी झाल्यावर देशांतर्गतगत विमानात सामान पाठवण्याकरिता एका विमानतळ सुंदरीला (हवाई सुंदरीच्या धर्तीवर)  विचारून हलत्या पट्ट्यावर सामान ठेवले. माझ्या सहकार्‍याने शंका उपस्थित केली की, "आपले सामान बरोबर येईल ना? कारण बहुधा तिला आपण काय विचारले ते कळले नाही". पण तोपर्यंत सामान आत निघून गेले होते, म्हणून काही करता येणे शक्य नव्हते.

प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.