प्रिय निखिल,
कसा आहेस रे ?
खूप दिवस झाले, तुला लिहीन , लिहीन म्हणतोय पण सालं लक्षातच राहत नाही ! आताशा फार विसरायला होतं मला. माफ कर मित्रा.किती दिवस झाले नाही, आपल्याला भेटून.....! मला वाटतं ८-९ वर्षे तरी नक्कीच. मी मुंबई सोडली अन कलकत्त्याला निघून गेलो. तुला एकट्यालाच माहीत होतं मी कलकत्त्याला जातोय म्हणून. तुझ्याशिवाय दुसर्या कुणावर विश्वासच नव्हता रे. तशी नेहा होती म्हणा, पण ती खूपच लहान होती रे.
जवळचा असा फक्त तूच. एकुलता एक जीवाभावाचा मित्र.
आठवतं का रे तुला...?
आपली पहिली भेट झाली होती ती शाळेतल्या "स्मरणशक्ती" च्या परीक्षेच्या वेळी?
नेहमी सहजपणे जिंकणारा तू, यावेळी मात्र बाजी मी मारली होती. पण तू ते स्पोर्टिंगली घेतलंस आणि आपली ओळख झाली. पुढे या ओळखीचं हळू हळू मैत्रीत रुपांतर होत गेलं. आणि मग ते दररोज मिळून शाळेत जाणं. रोज सकाळी तू तुझ्या बाबांबरोबर त्यांच्या स्कूटरवर बसून शाळेत जाताना हट्टाने मलाही स्कूटरवर बसवून नेणं. रोज ते एका डब्ब्यात जेवणं. मागच्या बेंचवर बसून गोंधळ मी करायचा आणि सरांची बोलणी तू खायचास. पण त्याचा आपल्या मैत्रीवर कधीच परिणाम नाही झाला.
तो देव नावाचा प्राणी खरेच ग्रेट असतो यार. एक गोष्ट हिरावून घेतली की लगेच दुसरी देऊन तडजोड करून टाकतो. आमच्या घरात धाकटी नेहा सोडली तर आनंदाच्या नावाने सगळा आनंदच होता. पण तू भेटलास आणि सुख, आनंद या संकल्पना मला नव्याने समजल्या.
ते दिवस कसे सुरेख होते ना ? शाळेत कुठलीही स्पर्धा असली की आपल्या दोघांत चुरस सुरू व्हायची. मग तू जिंकतो का मी याचे अंदाज इतरांकडून ऐकायला खूप मजा यायची. आपली बाजू घेऊन एकमेकात भांडणारे दोन मित्र बघितले की मग आपण दोघे पोट दुखेपर्यंत हसायचो.......
आता बर्याच गोष्टी विसरायला होताहेत. या इथे आलो आणि हळू हळू .........................!
इतक्या दिवसानंतर तुला पत्र लिहितोय, ते इतके दिवस संपर्क न साधूनही तू रागावणार नाहीस याची खात्री आहे म्हणून......
तुझाच,
चेतन.....
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
---|
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.