दैव - भाग ५

चेत्या,

"आई" गेली.................

मला कळवलं देखील नाहीस? कधी गेली? कशाने गेली? तू....., काय म्हणू यार तुला आता. अशा प्रसंगीदेखील तुला माझ्याशी बोलावे वाटले नाही, निदान पत्र तरी. एवढे दुरावलो का रे आपण एकमेकांना ?

आणि "जोपर्यंत होती तो पर्यंत माझं सगळं केलं रे तिने." म्हणजे...., मला नीटसं काही कळलं नाही रे?

तू काय म्हणतोयस...? काहीच टोटल लागत नाहीये बघ मला....., आजारी होतास का तू खूप? जरा स्पष्टपणे बोल मित्रा, उगाच माझी घालमेल वाढवू नकोस प्लीज........!

असं बघ, तू बाबांशी भांडून कलकत्त्याला निघून गेलास. का भांडलास ते मलाही सांगितलं नाहीस..........! मलासुद्धा ?
असं काय कारण होतं बाबा? तसंही मोठ्या आईच्या मृत्यूनंतर तुझं आणि त्यांचं कधी जमलंच नाही...

पण असं अचानक निघून जाण्यासारखं काय झालं होतं? आणि नंतर तुझे बाबा गेल्यानंतर काही दिवसांनी आईनेदेखील नेहाला घेऊन मुंबई सोडलं. मग नंतर तुमच्यापैकी कुणाचीच भेट झाली नाही.

परवा तुझं पत्र मिळालं आणि पुन्हा बालपण परत मिळाल्यासारखा आनंद झाला बघ चेत्या.

नेहा, आता तुझ्याकडेच आहे हे वाचून खूप बरे वाटले. काय झाले रे ती खूप आजारी वगैरे आहे का ? काय झालंय तिला. तिला घेऊन इकडे मुंबईत का येत नाहीस. इथे आता खूप चांगल्या डॉक्टर्सबरोबर घसट आहे माझी. इथे दाखवू आपण तिला, तू येच !

बाय द वे, या पत्रातला तुझा सूर खूप उदास वाटला. आणि चार ओळी लिहून तुझी बोटं कधीपासून दुखायला लागली रे ? जेमतेम पस्तिशी ओलांडली आहेस लेका....! माझ्यापेक्षा अवघा दोन वर्षांनी तर लहान आहेस तू.

तुला आठवतं, अकरावीत असताना तो संतकाव्यावरचा आठ पानी निबंध तू एका रात्रीतून लिहून दिला होतास मला........! आणि आता चार ओळी लिहिल्या की तुझी बोटं दुखायला लागली....? साल्या, काळजी करू नकोस काय म्हणतो? तुझं हे सगळं वागणं काळजी करण्यासारखंच आहे. खरा पत्ता अजून देत नाहीयेस.

खूप मोठा माणूस झालायस का रे बाबा? मित्राला पत्र लिहायचा देखिल कंटाळा? तू ये एकदा, मग सांगतो तुला .........

ये रे एकदा, खूप दिवस झाले भेटून..... खूप आठवणी आहेत त्या सोनेरी दिवसांच्या...

नक्की ये वाट पाहतोय...

तुझा,
निख्या..

ता. क. : आय. पी. एस. अधिकारी देखील माणूसच असतो आणि मित्रापेक्षा मोठा तर मुळीच नसतो.

तुझाच,
निख्या.
.....
.......
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.