दैव - भाग २

प्रिय चेत्या,
मला काय धाड भरलीय रे, तूच सांग कसा आहेस तू ? साल्या गेलास तो परत फोन नाही, पत्र नाही. काय हे, जणू काही अंटार्क्टिकावरच राहायला गेलाहेस. पण तुझं पत्र आलं आणि पुन्हा एकदा बालपणीच्या रम्य आठवणी जाग्या झाल्या.
चेत्या,  ९ वी ला असतानाची ती ' सामान्य ज्ञानाची' स्पर्धा आठवते. ती क्विझ रे "आंतरभारती शाळेत गेलो होतो आपण? ऐन वेळेला मला एका प्रश्नाचे उत्तर आठवेना आणि तू समोर बसून मला खुणा करून ते सांगायचा प्रयत्न करत होतास. आणि मग तुला तिथून हाकलण्यात आलं..., कसला संतापला होतास तू...! मला तुझा तो चिडलेला चेहरा आठवून प्रचंड हसू येतंय आज.

काय रे चेत्या, आई कशी आहे रे?

तिला शेवटचं भेटलो तेव्हा खूपच खंगली होती रे ती. तुम्ही लोकांनी छळ केलात त्या माउलीचा. सुख नावाची गोष्ट कधी तिच्या वाटेला येऊच दिली नाहीत. तेवढ्या एकाच कारणासाठी तुझा प्रचंड राग यायचा बघ मला. ती कुठे असते आता? का कुणास ठाऊक पण मला खात्री आहे, तिच्याबद्दल मनात कितीही आकस असला तरी तू तिला तिच्या शेवटच्या दिवसात अंतर देणार नाहीस. माझा नमस्कार सांग रे आईला आणि आधी पत्ता कळव, मी येतो लगेच भेटायला. आता कलकत्ता काही फार लांब राहिलेले नाही. विमानाने २-३ तासाचे अंतर मुंबईहून.

मला खूप आठवण येते रे आईची. बाबांचं अचानक जाणं फार मनाला लावून घेतलं होतं तिने. तिच्या हातची कारल्याची भाजी आठवली की अजूनही तोंडाला पाणी सुटतं माझ्या. तू लेका कर्म दरिद्री, तिचा स्वयंपाक कधी आवडलाच नाही तुला? आणि नेहा, ती कुठे असते आता? ती पण लग्नाची झाली असेल ना आता? तुला आठवतं माझ्या कुरळ्या केसांमधून हळुवार हात फिरवून ती म्हणायची, आमच्या चेतुचे पण केस असेच असते तर किती छान झाले असते. ते ऐकले की तू चिडायचास, त्यानंतर तर मुद्दाम तिला आकडे लावायचे म्हणून तू केस मानेवर रुळतील एवढे वाढवलेस आणि मग तुझ्या बाबांनी शिव्या घातल्यावर पुन्हा आईवरच चिडलास. तुझा राग समजायचा रे मला. पण सावत्र असली तरी ते सावत्रपण पण तुझ्या वागण्यातून जाणवायचं. तिने ते कधीच जाणवू दिलं नव्हतं.
असो, काय रे रेश्माची काही खबर, काही फोन............?

रेश्मावरुन आठवलं बघ. गधड्या लग्न केलंस की नाही? वहिनी कशी आहे....? की रेश्माशीच केलंस.........? काही मुलं वगैरे....?

असो, पण चेत्या निदान पत्रं लिहीत जा रे अधून मधून. तू परत येशील ना तेव्हा खूप मजा करू. आपल्या त्या नेहमीच्या हॉटेलमध्ये जाऊ जेवायला आणि मग तुझ्या स्टाईलने त्याला अंडे भाजायला लावू. काय भंजाळला होता ना तो कुक तेव्हा? तू लवकर ये बे परत ! आणि नालायका, पोस्ट बॉक्स चा पत्ता काय देतोयस..? का माझ्यापासून देखील लपवतोयस, कुठे राहतोयस ते?

तुझाच
निख्या.
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.