दैव - भाग ६

प्रिय निख्या,

तुझं पत्र मिळालं, खूप समाधान वाटलं रे....

रेश्मा....

तुझ्यानंतर माझ्या आयुष्यातला एकमेव सुखाचा किरण. ते दिवस आठवले की आजही वाटतं की कुणीतरी टाइम मशीन बनवावं आणि ते वापरून आपण पुन्हा भूतकाळात शिरावं. शक्य झाल्यास हे सगळं बदलण्याचा प्रयत्न करावा. हातात हात घालून आम्ही समुद्रकिनारी बसलेलो असायचो आणि तू पहार्‍यावर असल्यासारखा इकडून तिकडे फेर्‍या मारत राहायचास.

बाय द वे निख्या, माझं सोड...! तू केलंस की नाही लग्न? नक्कीच केलं असशील. मला माहितीये ती गोडबोल्यांची सुशी आवडायची तुला.

असो, बरंच विषयांतर झालं. आता थोडंसं तुझ्या तक्रारींबद्दल मित्रा....

तुझ्या सगळ्या तक्रारी मान्य....पण माफ कर मित्रा आता आपली भेट होईल असं वाटत नाही. खरंतर होऊ नये असंच वाटतंय मला. कारण चैतन्याने भरलेल्या ज्या चेतनला तू पाहिलं आहेस, ओळखतोस ....तो चेतन सहा वर्षांपूर्वी जेव्हा घर सोडलं तेव्हाच वारला.

धक्का बसला ना ऐकल्यावर...

मलाही बसला होता, जेव्हा मला कळलं की माझ्या मोठ्या आईचा मृत्यू (आईला मोठी आई म्हणताना, दुसर्‍या आईलाही माझ्या आईचा दर्जा देतोय..! मला माझी चूक आणि तिचा मोठेपणा आता कळतोय..पण खूप उशीर झालाय रे)

तर काय सांगत होतो जेव्हा मला कळलं की माझ्या मोठ्या आईचा मृत्यू कॅन्सरने नाही तर एड्सने झाला होता. तिला एड्स कसा झाला, हे तुला माझ्यापेक्षा बाबा जास्त चांगलं सांगू शकले असते, पण मुळात तिला एड्स झाला होता हिच गोष्ट त्यांनी दडवली, मग त्यामागची कारणे सांगण्याचा प्रश्नच नव्हता.

पण मी सांगतो, हा एड्स तिच्याकडे बाबांपासून आला होता.

माझ्या बापाच्या एकेक सवयी तर तुलाही माहीत होत्याच. मला जेव्हा हे कळलं ना तेव्हा प्रचंड संतापलो होतो बाबांवर मी. खरे सांगायचे तर तेव्हा आई एड्सने गेली याचा फार राग नव्हता आला मला.

राग आला होता, तो आपल्याला एड्स झाला आहे हे लपवून केवळ आपल्या वासनेसाठी दुसरे लग्न करणार्‍या, आणखी एका स्त्रीच्या स्वप्नांची राखरांगोळी करणार्‍या माझ्या बापाचा....

आपल्याला एड्स झाला आहे हे माहीत असताना आणखी एका गोड मुलीला या जगात आणून तिचं आयुष्य जन्माला येण्याआधीच उध्वस्त करणार्‍या एका वासनांध नराधमाचा....
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.