हिवाळ्यात वातावरण कसं असतं
मस्त गाऽऽर ,अगदी थंड
वाटतं त्या दिवसात कधी
करूच नये निद्रादेवीशी बंड ॥
सूर्यदेवही जांभया देत
जरा उशिराच उठतो गारठून
गुलाबी थंडीत आपल्या
सोनेरी किरणांची नक्षी पसरून ॥
थंडीचं माहात्म्य पहाटे
जरा जास्तच कळते
एका छोट्याश्या फटीतूनही
रात्री थंडी किती छळते ॥
रात्री झोपताना अंगावर मी
घेत नाही माझीच चादर
सकाळी माझ्याच अंगावर
असते भावाचीही चादर ॥
कसंबसं उठल्यावर मग
शेकोटीच्या उबेची हवी-हवीशी साथ
अन ते वाफाळलेल्या चहाचे घुटके
त्या स्वर्गीय आनंदाची काय बात ॥
मध्येच हसणारा दवबिंदू
मनाला प्रसन्न करतो
धुक्यांचा गालिचाही मग
त्यात आपले रंग भरतो ॥
पोटापाण्यासाठी कामावर गेल्यावर
कामाचा ढीग जरी दिसतो मोठा
तरी एक मानसिक आधार असतो
थंडीचा दिवस आहे हा छोटा ॥
रात्री जेवायच्या आधी जर
प्यायला मिळाले गरमागरम सूप
तर मग त्या गुलाबी थंडीत
जेवणाचीही लज्जत वाढते खूप ॥
कधी उग्र रूप धारण करून
जरी आणते अंगावर शहारे
तरी ऊन-पावसाची दगदग नसते
अन् सृष्टीचेही रंगरूप असते न्यारे ॥
ऊन डोक्यावर आलं तरी
हवेत सुखद गारवा असतो
कोणी काहीही म्हटलं तरी
हाच ऋतू सर्वांना हवा असतो ॥
हाच ऋतू सर्वांना हवा असतो ॥
५ टिप्पण्या:
छान अंक आहे.. कविता सुंदर.....
सुरेख कविता. आवडली.
वाह देवा..मस्तच
प्राची,गंगाधरजी,सुहास.....आभार्स.
khup khup sunder ahi
Sunder chay palikaday kahi nahi ahi mhanun
khup khup chan sunder nice & soo & soo
टिप्पणी पोस्ट करा