भारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले?

भारतीय जनतेला लोकशाहीनेच तर समृद्ध केले. सर्व लोक एकसारखेच असतात हे शिकवले. स्पृश्यास्पृश्य, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, उच्च-नीच, सवर्ण-दलित, हिंदू-मुसलमान, स्त्री-पुरूष, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, साक्षर-निरक्षर सगळ्यांना एकाच पातळीवर आणून सोडले...मतदारपदाच्या. इतर भेदाभेद मिटलेत हे तर चांगलेच झाले. मात्र साक्षर आणि निरक्षर सगळे, सारख्याच हक्कांचे अधिकारी झाले हे मात्र चांगले झाले नाही. त्यामुळे साक्षर होणार्‍यास समाजात असावा तसा मान राहू शकला नाही. अंगठेबहाद्दर नेते झाले आणि साक्षर होऊन विद्यार्जन करणार्‍यांवर आडमुठी हुकुमत गाजवू लागले. खरे तर लोकशाहीतही गुणांना मान असावा. विद्याविभुषितांना सन्मान मिळावा. जाणत्यांना अजाणत्यांपेक्षा निर्णयाचा अधिकार जास्त असावा. ही अपेक्षा काही वावगी नाही. मात्र ते साधले नाही. जाणत्यांना अजाणत्यांपेक्षा निर्णयाचा जास्त अधिकार मिळू शकला नाही.

भारतीय जनतेला लोकशाहीने स्वातंत्र्य दिले. मूलभूत हक्क दिले. कर्तव्यांची जाणीव दिली. आपापली मते आणि श्रद्धा राखण्याचे, आणि त्यानुसार वागण्याचे स्वातंत्र्य दिले. देशांतर्गत फिरण्याचे स्वातंत्र्य दिले. सन्मानाने संपत्तीसाधनेचा हक्क दिला. समानतेची संधी दिली. मात्र ३७० कलमासारख्या गोष्टींनी समानतेला छेद दिला. आज काश्मिरातील माणूस महाराष्ट्रात राजरोस जमीन खरेदू शकतो, पण मराठी माणसास काश्मिरात जमीन खरिदता येत नाही. खरे तर समान नागरी कायदा असावा. हिंदू आणि मुसलमानांकरता कायदा वेगळा नसावा. कुठल्याही भारतीय माणसास सारखेच अधिकार असावेत. पुरूषाला मिळते तेवढीच संधी स्त्रीलाही मिळावी. केवळ ३३% टक्क्यांच्या आरक्षणाकरताच त्यांचा जीव मेटाकुटीस येऊ नये. ही अपेक्षा काही वावगी नाही. मात्र ते साधले नाही. जॉर्ज ऑर्वेलने "ऍनिमल फार्म" मधे म्हटल्याप्रमाणे "ऑल आर इक्वल, बट सम आर मोअर इक्वल" असाच व्यवहार सुरू राहिला. खरीखुरी समानता लाभू शकली नाही.

राजेशाहीत मनमानी चाले. राजा बोले आणि दळ हाले. पारतंत्र्यातील संस्थानांत संस्थानिक, जनतेचे हक्क ब्रिटिशांना विकून मोकळे होत. मात्र ज्या जनतेने शक्ती दिली तिच्या स्वातंत्र्यासाठी लढणे सरसकट सर्वच संस्थानिकांना साधले नाही. जनतेच्या स्वातंत्र्यांचा आणि अधिकारांचा कायमच संकोच होत राहिला. मग स्वातंत्र्य मिळाले. लोकशाही आली. लोकशाहीने परकीय आक्रमणांपासून संरक्षणाची हमी दिली. देशांतर्गत रणधुमाळीतून कायद्याचे राज्य निर्माण केले. सुव्यवस्था प्रस्थापित केली. आंतरराष्ट्रीय समाजात भारतास उन्नत स्थान मिळवून दिले. दुसर्‍या महायुद्धानंतर जगाचे, अमेरिका-रशिया यांच्यात धृवीकरण झाले. त्यामुळे तिसर्‍या महायुद्धाची नांदीच ठरावी असे शीतयुद्ध, त्यांच्यात सुरू झाले. भारताने तटस्थता स्वीकारली. एवढेच नव्हे तिसर्‍या जगाचे नेतृत्वही केले. मात्र, चीनी-हिंदी भाई-भाईच्या पंचशीलांमधे तल्लीन झालेल्या भारतीय लोकशाहीस, चीनी हुकुमशाहीच्या दुर्गम वाटा उमगल्याच नाहीत. १९६२ साली चीनने भारताविरुद्ध युद्ध पुकारले. भारतास स्वतःचे संरक्षण करता आले नाही. चीनने तिबेट जिंकून घेतला. भारताचा आकाशी-चीन हा हिस्साही बळकावला.





प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.