भारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले ? - भाग २

चीनने स्वतःहूनच युद्धबंदी केली म्हणून बरे, नाहीतर हिमालय पर्वत आपले संरक्षण करेल हा समज, गोड गैरसमजच ठरला असता. त्यानंतर भारतातील लोकशाहीच्या सर्वोच्च सभेने -संसदेने- घोर प्रतिज्ञा केली की आम्ही चीनने बळकावलेली भूमी सन्मानाने परत मिळवू. मात्र तेही आजवर साधले नाही. आपल्याला कणखर परराष्ट्रीय धोरण असावे, परदेशांतील गैर-लोकशाही सरकारांची कटकारस्थाने आपल्याला आधीच समजावीत, त्यांपासून आपण आपल्या मायभूमीच्या सर्व हितांचे समर्थपणे संरक्षण करावे, ही अपेक्षाही काही वावगी नव्हती, मात्र ते साधले नाही. कौटिल्याच्या मायभूमीतील लोकशाहीस मुत्सद्दीपण साधले नाही.

ब्रिटिशांनी निघून जातांना देशाची फाळणी केली. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. तसेच पाकीस्तानही स्वतंत्र झाले. जम्मू आणि काश्मिरही स्वतंत्र झाले. याशिवाय भारतीय भूमीतील असंख्य संस्थानिकही स्वतंत्र झाले. खरे तर ब्रिटिश निघूनच जात होते ना? मग हे सारे परस्परांपासून स्वतंत्र का झाले? मुळात भारतीय उपखंडातील आम्ही सारे एकच तर होतो ना? मग ब्रिटिश पारतंत्र्य संपल्यावर आपण सारे एकसंध का राहिलो नाही? याचे उत्तर, अनेक नेत्यांच्या व्यक्तीगत महत्वाकांक्षांच फाळणीस कारणीभूत झाल्या, असेच आहे. पुढे भारताचे लोहपुरूष वल्लभभाई पटेलांनी यांनी भारतीय भूमीतील संस्थानिकांपासून भरतभूस मुक्त केले. मग इंदिराजींनी तर संस्थानिकांचे तनखेही बंद करून समानतेचा नवा पाया घातला. मात्र, इथे आपण विशेष लक्ष देणार आहोत, ते जम्मू आणि काश्मिर या नव्यानेच स्वतंत्र झालेल्या देशाकडे. त्या देशाचे त्याकाळचे महाराज हरिसिंह, हिंदू-मुसलमान ऐक्याचे चाहते होते. ते न भारतात सामील होऊ चाहत होते, न पाकीस्तानात. मुसलमान असण्याच्या निकषावर फाळणी करण्यास त्यांचा विरोध होता. तो समजण्यासारखाही होता. पण त्यांचा भारतातील लोकशाहीसही विरोध होता. कारण ते स्वतःच एक राजे होते. तो त्यांचा विरोध समजण्यासारखा नव्हता. पाकीस्तान मात्र काश्मिरला स्वतःचाच हिस्सा मानत असे. ते साधण्याकरता पाकीस्तानने काश्मिरवर आक्रमण केले. तेव्हा काश्मिर खूपच दुर्गम होते. त्याचे स्वतःचे सैन्यबळ अतिशय तुटपुंजे आणि स्वसंरक्षणास असमर्थ होते. पाक नवनव्या भूभागांवर ताबा मिळवत पुढे पुढेच सरकत होता. निकडीच्या कुमकेची गरज होती. हरिसिंहांनी भारतास मदतीची विनंती केली. भारताने हरिसिंहांना काश्मिर भारतात विलीन करत असल्यास, मदत करण्याची तयारी दर्शवली. हरिसिंहांनी निर्णय घेण्यास खूप उशीर केला. तोवर एक तृतियांश काश्मिरवर पाकने कब्जा केला. मग हरिसिंहांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. करार झाला. त्याच कराराचा भाग म्हणून ३७१ कलम आपल्या घटनेत समाविष्ट करण्याचे मान्य करून भारताने आपल्या लोकशाहीच्या गाभ्यासच चूड लावली. समानतेला सोडचिट्ठी दिली. मात्र भारताने लगेचच विमानाने सैन्य पाठवून उर्वरित काश्मिरचे रक्षण करण्यात यश मिळवले. आता पाकिस्तानने, आपल्या जम्मू आणि काश्मिर राज्याचा जो एक तृतियांश भूभाग यापूर्वीच बळकावलेला होता तो परत मिळवण्याचे काम राहिले होते.
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.