आमचे कासव- बंडू - भाग ५ (शेवटचा)

एकदा आम्ही त्याला त्याच्या ढालीसारख्या पाठीवर ठेवले.  बंडू  चारी पाय आक्रसून काही वेळ पहुडून राहिला. मग मात्र  आक्रस्ताळेपणा करून  चारी पाय  झाडू लागला. प्रयत्न करून तो एकदाचा सुलट झालेला पाहून  आम्ही टाळ्या वाजवल्या. तेव्हा बंडू मात्र एखाद्या परफॉर्मन्स नंतर फोटोला पोझ द्यावी  तसा स्तब्ध राहिला.  आम्हाला  त्याच्या ’उलट- सुलट’ चा चाळाच लागला  आणि  काही काळातच  बंडू त्या कसरतीतही तरबेज झाला.
 
आम्ही चीन सोडले तेव्हा त्याला आमच्या बरोबर  नेणे  अशक्य नसले तरी कठिण होते. त्याची कागद पत्रे, परवाने करायला वेळ नव्हता. मी, बंडू आमच्या  मोलकरणीला देऊ केला. अशा गमत्या बंडूला ती नाकारू शकलीच नाही. आम्ही निघायच्या आधी दोन-चार दिवस ती त्याला आपल्या घरी घेऊन गेली. बंडूची अनुपस्थिती  आमच्या अतिप्रचंड कामकाजातही जाणवत होती. “तो बरा आहे का? खाल्लं का? की निजून आहे?” अशी मी मोलकरणीकडे चौकशी केली.
“कासवाला काय कळतंय? ते  बरे आहे.”  हे तिचे तुटक उत्तर ऐकून मला  तिचा खूप राग आला.

“आमच्या चुणचुणीत बंडूला काय कळत नाही?” असा जळजळीत प्रश्न माझ्या ओठावर आला होता.  पण  मी स्वत:हून बंडूला तिच्या हवाली केले होते. तिच्यावर रागावून चालणारच नव्हते. “त्याला नीट सांभाळ, त्याची काळजी घे.” असे बजावून आम्ही चीन सोडले.

आम्ही चीन सोडून आता तीन/चार वर्ष  झाली आहेत. पण अजून ही बंडूची आठवण येते. त्याचे ते लुकलुकते डोळे, इवलेसे हिरवे शरीर,  टणक पाठ, त्यावरची आकर्षक नक्षी, त्याची आत- बाहेर होणारी  छोट्टीशी मुंडी आणि त्याची तल्लख बुद्धिमत्ता... सारं सारं आठवतं.

“आपला बंडू कसा असेल ?” असे मी एकदा यजमानांना विचारल्यावर ते म्हणाले, “चीनमध्ये किडा-मुंगी पासून गाय/बैलापर्यंत काहीही खातात. एखादे दिवस मोलकरणीच्या घरी भाजीत घालायला  इतर मांस/मासे नसतील तर  बंडूचा खिमा करून भाजीबरोबर तिने खाऊन ही टाकले असेल.”

मला गलबलून आलं. मन बेचैन झालं.

आज ही  तसंच होतंय.

पण इथे बसून  बंडूवर लेख  लिहिण्याव्यतिरिक्त मी करू तरी  काय शकते आहे?



लेखिका:मीनल गद्रे.

९ टिप्पण्या:

Somesh म्हणाले...

Zakkas lekh !
Bandu .. naav mast hot tyach !

Shreya's Shop म्हणाले...

कुमार बंडू गद्रे हुश्शारच निघाले. त्याच्या पोटावरची नक्षी कित्ती मस्त आहे, खास काढून घेतल्यासारखी

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

मस्त प्रसन्न, मनोरंजक वगैरे वगैरे.
पण बंडू तुम्हांला हाक काय मारायचा हो? ताई, काकू की मावशी?

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis म्हणाले...

लेख फारच छान जमला आहे. अभिनंदन. माझ्या मित्राकडे असेच एक कासव होते मात्र ते जमिनीवरच फिरायचे. आमची व मुलांची करमणूक व्हायची, त्याची आठवण आली.

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

मस्त झालाय लेख. पाळीव प्राणी घरात असले की घरातीलच एक मेंबर होऊन जातात. पण जेव्हा त्यांना सोडून जायची वेळ येते तेव्हा मनाची फार वाईट अवस्था होते. शेवटी वाचताना माझे डोळे पाणावले. पुढच्या अंकात मी आमच्या टॉम्याच्या करामती लिहेन.

Suhas Diwakar Zele म्हणाले...

मस्तच आहे हा बंडू..माझ्या ओळखीत पण आहे असाच एक शिंचन :) तू दिलेल्या करमती आणि त्या प्रत्यक्ष पाहाताना फार छान वाटला. खरच खूप जीव लावतात असे पाळीव प्राणी... :)


>> त्याच्या पोटावरची नक्षी कित्ती मस्त आहे, खास काढून घेतल्यासारखी + 1

रोहन... म्हणाले...

धन्य आहेस... बंडूने धमालच केली आहे एकदम... :)

बाकी मी ह्या फंदात कधी पडताच नाही... एक जर्मन शेफर्ड घ्यावा असा कधीतरी मनात विचार येतो... :D

अवांतर: >>> मीनल.. तू दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये वेलास येथे होणाऱ्या कासव महोत्सवात का जात नाहीस.. अनेक बंडू पुन्हा पहिल्याचा आनंद तुला मिळेल.. :)

ही साईट bagh.. http://www.snmcpn.in/

क्रांति म्हणाले...

सुंदर आठवणी आहेत मीनल. खरंच या मुक्या मित्रांमध्ये खूप गुंतून जातो आपण, इतके की कधी कधी त्यांच्याशिवाय आपण ही कल्पनादेखील नाही करू शकत! त्यांनाही आपला खूप लळा लागलेला असतो, फक्त बोलता येत नाही त्यांना, एवढंच!

Unknown म्हणाले...

वर्णन छान जमले आहे. पण कासवाचे फ्लॅश उघडलेच नाही कदाचीत प्रायव्हसी सेटींग ला पासवर्ड दिला गेला असावा. माझ्या कडे नुसताच एक आडवा बॉक्स व त्यात एक गोल बटन दिसते. पण प्रमोदजींनी स्काइप वर शेअर करून व्हीडीओ असल्याचे दाखवले आहे. कदाचीत ते त्यांच्या कॅच मधून दिसत असावे. नोंद घ्यावी.