सांचीचा स्तूप

पाच रुपयांच्या नोटेवर एक चित्र नेहमी असायचं, ते पाहिलं की त्या बद्दल एक वेगळंच आकर्षण वाटायचं, आणि मग हे चित्र कशाचे आहे? म्हणून आईला विचारल्याचे आठवते. हल्ली ती नोट चलनाच्या बाहेर गेलेली आहे, पण एखादी जुनी मिळेल तर बघू शकता. ते चित्र होतं ’सांची स्तूप’. बौद्ध धर्मीयांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले हे ठिकाण आज वर्ल्ड हेरीटेजच्या नकाश्यावर अग्रस्थानी आहे.

कामानिमित्य भोपाळहून विदीशा मार्गे बीनाला जायला निघालो. जातांना अल्पोपाहारासाठी म्हणून विदीशाला थांबलो. विदीशाला प्रसिद्ध असलेली कचोरी आणि जिलबीचा नाश्ता करून पुढे निघणार, तेवढ्यात एक प्रवासी गट समोरून आला, आणि नुकतेच पाहून आलेल्या स्तूपाच्या जवळ साधे पाणी पण मिळू शकले नाही म्हणून त्यातले लोक वैताग व्यक्त करीत होते. त्यांचं बोलणं ऐकून उत्सुकता चाळवली आणि ते कुठल्या स्तूपाबद्दल बोलताहेत आणि तो कुठे आहे याची चौकशी केली, तर समजलं की फक्त ९ किमी अंतरावर हे सांचीचे स्तूप आहे.जातांना थोडी वाकडी वाट करून स्तूप पाहून मग पुढे बीनाला जायचे ठरवले.

आम्ही जेव्हा त्या ठिकाणी पोहोचलो, तेव्हा तिथे मप्रचा कडक उन्हाळा सुरू होता. कारच्या वातानुकुलीत सौख्यामधून बाहेर आल्यावर उन्हाचे चटके बसत होते अंगाला.पायातल्या बुटांच्या तळव्याखाली पण उष्णता जाणवत होती. सध्या या स्तूपाशेजारी खूप सुंदर बाग केलेली आहे. आम्ही जवळपास कुठे गाईड वगैरे दिसतो का म्हणून चौकशी केली, पण अर्थात तिथे कोणीच नव्हते. फक्त काकडी विकणारा एक माणूस मात्र झाडाखाली बसला होता, तो म्हणाला कोणी व्हिआयपी येणार असेल तर काही साहेब लोकं येतात इथे.

तसं म्हटलं तर सांचीचा संबंध कधीच बुद्धाशी आला नाही. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्याला एक जागा हवी होती की जी शहरापासून फार दूर पण असू नये आणि फार जवळ पण असू नये - जेणेकरून बौद्ध भिक्खूंना भिक्षा मागण्यासाठी फार दूर जावे लागू नये. याच उद्देशाने विदिशापासून साधारण ८-९ किमी वर असलेली ही सांचीच्या स्तूपाची जागा निवडण्यात आली. या स्तूपाचे पौराणिक वास्तू संशोधनाच्या दृष्टीने म्हणून महत्त्व खूप जास्त आहे याचे पहिले कारण म्हणजे ह्या स्तूपाच्या निर्मितीचे काम सम्राट अशोकाने इ.स. पूर्व २७३ साली सुरू केले होते आणि दुसरे कारण म्हणजे ख्रिस्त पूर्व काळात निर्मिलेल्या फार कमी वास्तू आज अस्तित्वात आहेत, त्या पैकी ही एक! या दोन्ही कारणांमुळे या स्तूपाचे महत्त्व खूप वाढते.


प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.