सांचीचा स्तूप - भाग २

स्तूपाचे काम जरी इ.स. पूर्व २७३ साली सुरू झाले असले, तरीही त्या नंतरच्या ५०० वर्षाच्या काळात मुख्य स्तूपाच्या आसपास अशा अनेक स्तूपाचे आणि मठांचे काम १२व्या शतकापर्यंत सुरू राहिले. या मठांमध्ये बौद्ध भिक्खू राहून अर्चना करीत, आणि भिक्षा मागण्यासाठी जवळपासच्या गावात जात असत . ही जागा इतकी अद्वितीय आहे, की त्या काळात ( म्हणजे इस पूर्व) जगात कुठेही अशा प्रकारचे बांधकाम तयार झालेले नाही. मात्र ह्या सांचीच्या स्तूपाची जागा म्हणजे एक असेच दुर्लक्षित वर्ल्ड हेरीटेज ठिकाण आहे . भारतीय लोकं भोपाळला गेल्यावर सरळ पचमढीला निघून जातात, पण केवळ ६८ किमी वर असलेल्या ह्या जागेला कोणीच फारशी भेट देत नाहीत.


या स्तूपांनी बौद्ध धर्माचा सुवर्णकाळ पाहिलेला आहे. १८१८ पर्यंत ह्या स्तूपाचे अवशेष पुर्णपणे दुर्लक्षित होते, म्हणजे या स्तूपाचे अस्तित्व पण पुर्णपणे दुर्लक्षिले होते. पण १८८१ मध्ये काही ब्रिटिश अधिकार्‍यांच्या नजरेत हा स्तूप आल्यावर मात्र या जागेवर बरंच उत्खनन करण्यात आले , आणि बाहेर निघालेल्या या स्तूपाची दुरुस्ती पण करण्यात आली. हे दुरुस्तीचे काम १९१२ ते १९१५ या काळात झाले .

स्तूप म्हणजे काय?? तर, गौतम बुद्धाच्या परीनिर्वाणाची खूण म्हणजे स्तूप असे म्हटले जाते.

मुख्य स्तूपाच्या समोर असलेले ते सुंदर कोरीव काम असलेले पूर्व, पश्चिम , उत्तर आणि दक्षिण दिशेला असलेले द्वार पाहिले, आणि नकळतच मनातल्या मनात त्या कारागिरांना हात जोडले गेले. अतिशय सुंदर असे कोरीव काम केलेले आहे. त्या कोरीव कामामध्ये बौद्ध धर्माच्या काही प्रतीकांचा वापर, करण्यात आलेला आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशी चार दारं (कमानी) आहेत, एका कमानीवर जातक कथा, तर दुसर्‍या एका कमानीवर गौतम बुद्धाच्या चरित्रातले काही प्रसंग पण कोरून दाखवण्यात आलेले आहेत. त्यावरची सगळी चित्र काही वाचता आली नाहीत, आणि त्यामुळे गाईडची कमतरता प्रकर्षाने जाणवली.

या स्तूपामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घुमटाचा आकार..घुमटाचा आकार बनवणे हे इंजिनीअरिंगच्या दृष्ट्या फार कठीण समजले जाते. पूर्वीच्या काळी केवळ दगड व्यवस्थितरित्या चौरस आकारात कापून आणि माती वापरून एकत्र बसवून बनवलेला घुमटाचा आकार केला आहे तो शंभर टक्के अचूक आहे. त्यात तसूभरही चूक नाही! . ख्रिस्त पूर्व काळात , कुठलीही औजारं नसताना इतकी सुंदर कलाकृती कशी काय निर्माण केली गेली असावी ? हा प्रश्न राहून राहून मनात उठत होता. या स्तूपाचा अक्ष पण पृथ्वीच्या अक्षाशी समांतर आहे. पूर्वीच्या काळी हे साध्य करायला काय केले असावे? हा प्रश्न मनात उठत होता. या मुख्य स्तूपाच्या शेजारीच अर्धवट तुटलेले वगैरे असे दुसर्‍या स्तूपाचे नुतनीकरण केले गेले आहे, पण हा मुख्य स्तूप म्हणजे कलाकारीचा अप्रतिम नमुना समजला जातो . स्तूपाच्या वरून एक प्रदक्षिणा घालण्याची सोय केलेली आहे, चारही दिशांना सातपुड्याच्या रांगा , आणि उन्हामुळे वैराण झालेली जमीन दिसत होती. समोर बनवलेली बाग मात्र अगदी व्यवस्थितरित्या राखली असल्याने डोळ्याला आल्हाददायक वाटत होते. एक उत्कृष्ट आणि महत्त्वाची पौराणिक वास्तु म्हणून अवश्य भेट द्यायला हवी. बौद्ध धर्मीयांच्या मते देखिल गौतम बुद्धाशी संबंधीत नसल्याने ह्या वास्तुला फारसे धार्मिक महत्त्व दिले जात नसावे, आणि म्हणूनच फारशी वर्दळ पण इथे नसते.तरीही एकदा आवर्जून भेट द्यावी असे हे एक ठिकाण आहे.





लेखक: महेंद्र कुलकर्णी

३ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

वाह..मस्त माहिती काका

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

छान. आवडले वर्णन. फारशा लोकप्रिय नसलेल्या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेण्याची इच्छा होणे हीच एक विरळा गोष्ट आहे.

एक उत्कृष्ट आणि महत्त्वाची पौराणिक वास्तु म्हणून अवश्य भेट द्यायला हवी.

पौराणिक हा शब्द इथें बरोबर वाटतो का?

सुधीर कांदळकर

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

सुरेख लेख दादा :)