आमचे कासव- बंडू - भाग २

कासव विकत घेताना अतिशय  कमी पाण्यात त्याला ठेवले होते. त्यामुळे माझी समजूत झाली होती  की ह्या  प्रकारच्या  कासवांना  कमी पाण्यात ठेवायचे. घरी आल्या आल्या मी  टाकीत चार पाच कप  पाणी ओतताच कासव बावरले.  अधिक सावध होऊन  पाण्यावर  हलकेच तरंगू लागले. नंतर टाकीच्या तळाशी बुडाले. पाणी वाढवण्याची युक्ती कामी आली नसल्यासारखे वाटले.  पण इतक्यातच  कासवाने  चारी पाय जोरदार झटकले आणि काही वेळातच त्याने  टाकीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहायला सुरवात केली. ते कासव हरखून गेले आणि उत्तेजित झाले. टाकीतल्या पाण्यामुळे काचेमध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहून कासवाला आपले सवंगडी  भेटल्यासारखेच वाटले असावे. पाय मारून वर-खाली, आजूबाजूला होत  आपल्या सवंगड्यांबरोबर ते खेळ करते आहे असे आम्हाला  वाटले. त्याची ती चपळ हालचाल पाहून त्याच्या खोड्या काढायला  सर्वांना ऊत आला. ते पाण्यावर आले की त्याच्या पाठीला बारीकसा  धक्का देऊन त्याला आत ढकल, त्याला पोहू न देता तळाशी अलगदपणे पकडून ठेव असले चाळे ते सहजी  सहन करू लागले. इतकंच नाही तर ते उलट प्रतिक्रिया ही द्यायला धिटावले.  कधी टोकदार नखं असलेले पाय मारायचे  तर  कधी अंग पुढे-मागे करून दंगा करत सुटून जायचे. टाकी बाहेरील आमच्या बोटाला टाकीच्या आतून  चावायचा प्रयत्न निष्फळ ठरला तरी ते कधी कंटाळत नसे. लवकरच असे मनोरंजक कासव आमच्या घरचे  आकर्षण बिंदू बनले.  माझ्या यजमानांनी लागलीच त्याचे नामकरण केले – ’बंडू’. ते कासव नर की  मादी याची आम्हाला पर्वा नव्हती.  बंडू हे  नराचे नाव आम्ही सर्वांनी मान्य केले.

येता जाता आम्ही त्याला “बंडू, बंडू” म्हणून हाका  मारू लागलो.  त्याला काय कळत होतं, देव  जाणे! पण काचेच्या पेटीशी जाताच बंडू मुंडी वर करून डोळे मिचकावत बघत असे. कासवाला ऐकू येते, त्याला त्याचे ‘बंडू‘ नाव कळते आणि आवडते असे आम्ही सोयिस्करपणे  स्वत:ला पटवून घेतले.  बंडूला साजेसे ’चळवळ्या’ हे विशेषणही आम्ही कधी कधी वापरत होतो कारण दुकानामध्ये असतानाचा चळवळा स्वभाव  बंडूने आमच्या  घरी आल्यावरही सोडला नव्हता. याचा प्रत्यय आम्हाला नेहमी येत होता.  त्याचं झालं असं की... कासव उभयचर प्राणी. ते पाण्यात आणि जमिनीवर राहते असे मी शाळेत शिकले होते. म्हणून मी एका पसरट  प्लॅस्टिकच्या  टबात एका बाजूला पाणी आणि एका बाजूला मध्यम आकाराचे सपाट दगड लावून रचना केली. माझ्या बुद्धीच्या कुवती नुसार  ही रचना बंडूला सोयिस्कर आणि उपयुक्त  होती, जेणे करून बंडू हवे तेव्हा पाण्यात  पोहेल आणि नको तेव्हा पाण्याबाहेर दगडावर विसावेल  आणि पुन्हा परतून पाण्यात जाईल.   बंडूला पारदर्शक काचेच्या टाकीतून त्या पसरट  टबात ठेवण्यात आले. बंडूने डोळे मिचकावले आणि  टबातल्या पाण्यात बुडी मारून तो तळाशी गेला.
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.