आमचे कासव- बंडू - भाग ४

आमच्या घरात धिटुकल्या बंडूचे अजूनही बरेच लाड चालायचे. एकदा काय झालं की माझ्या मुलाने एक द्राक्ष  त्या टाकीत टाकले. बंडूच्या डोक्यापेक्षाही मोठे असलेले ते पाण्यात  तरंगते द्राक्ष खायला बंडूने खूप मेहनत घेतली. पण खाताना बंडूच्या तोंडात द्राक्षाचे साल अडकून बसले.  त्याला ते साल काढता येईना. तो स्वत:शीच झटापट करू लागला. शेवटी लटपट्या बंडू यशस्वी झाला, पण तो उरलेल्या द्राक्षाकडे पुन्हा फिरकला नाही. त्यानंतर आम्ही त्याला सोललेले  द्राक्ष तारेत अडकवून देऊ लागलो. त्यामुळे, ना द्राक्ष  पाण्यात तरंगायचे, ना त्याचे साल बंडूच्या तोंडात अडकायचे. मग काय? मेजवानीच की! आमच्या लाडाने स्वारी खूश  व्हायची.

बंडूला  टाकीत खेळायला खेळणं कुठचं?  तर एक कृत्रिम कमळ. बंडू कमळाखालच्या पानाला धरून लोंबकळे. कधी कमळ उलटं पालटं करून टाकी. कधी त्यावर चढून  समोरचे अर्ध शरीर  पाण्याबाहेर तर लवंगी इतकी इटुकली शेपटी  पाण्यात ठेवून बसून राही. बंडूचं कौतुक करायला टाकीपाशी जावं तर तो सशागत टूण्णकन उडी मारून टाकीच्या तळाशी जाई. एकदा  पाहिलं तर कमळ आणि त्या  खालचे पान विलग झालेले दिसले. मी कमळ काढून  टाकले आणि पान तसेच राहू दिले. काही वेळाने पाहिले तर बंडू राजे त्या पानावर आरामात बसून मजेत  हेलकावे खात पाण्यावर झुलत होते. बंडूने पाण्याबाहेर राहायची युक्ती शोधून काढलेली पाहून त्याच्या  बुद्धिमत्तेला आम्ही सलाम ठोकला.
बंडू आमचा विरंगुळा असला तरी बंडूच्या विरंगुळ्यासाठी आम्ही एक मासा आणून त्या टाकीत सोडला. पण बंडूचे काही जमलेच नाही त्याच्याशी. त्याच्या लाडात वाटेकरी झालेल्या माशाला  चावण्यासाठी बंडू  सारखा त्यावर हल्ला करायचा.  तो मासा  बिचारा आपला जीव मुठीत धरून टाकीत सैरावैरा पोहायचा. दोघांनाही वेगळाले करण्याशिवाय पर्याय उरला नाही.  माशाला पार ठिकाणी लावायची बंडूची घातक  प्रवृत्ती आम्हाला नवीनच होती.
त्यानंतर एकदा एका खेळण्यांच्या दुकानात हालणारा डोलणारा ससा मिळाला. कौतुकाने मी त्याला आणून टाकीत टाकले. ससा पाण्याच्या तळाशी जाऊन डोलत राहिला. बंडूने त्याच्या जवळ जाऊन हुंगून पाहिले. मग मात्र त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलेले पाहून आम्ही चकित झालो.

आमच्या बंडूला  खूप काही समजतते असे आम्हाला वाटायला लागले. नव्हे खात्रीच झाली.  त्याच्या बुद्धीच्या चाचण्या घेऊन त्याला अधिकाधिक तेज बनवण्यासाठी आम्ही नवनवीन शक्कल लढवत होतो.

आमच्या हुश्शार बंडूच्या कसरतींची आम्हाला विलक्षण करमणूक होती. त्याला अधिकाधिक करामती करायला आम्ही भाग पाडू लागलो. त्याचे आवडते सुकट किड्यांचे अन्न आम्ही  कमळाच्या पानावर टाकले की कितीही पराकाष्ठा करून बंडू ते अन्न मिळवायचा आणि चावून चवी चवीने खायचा. आम्हाला कौतुक वाटायचे.
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.