आमचे कासव- बंडू - भाग ३

मी  त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून होते. बंडू आपला जिथल्या तिथे! बंडू जागचा हाललाही नाही.  शेवटी  स्टूलावरची काचेची पेटी बाजूला काढून ठेवली  आणि तिथे तो  प्लॅस्टिक टब ठेवून मी माझ्या कामाला गेले.  काम आटपून परतले तेव्हा पाहते तर काय? प्लॅस्टिकच्या टबात बंडू नव्हता. मी इकडे तिकडे पाहिले.  बंडू खाली जमिनीवर  उताणा पडला होता. बंडोपंतांची ही कामगिरी  माझ्या लागलीच लक्षात आली.  पाण्यातून बाहेर येऊन  टबाच्या कडेला लावलेल्या  दगडावरून धाडसी  बंडोपंत पुढे चालत राहिले आणि टबाची कडा ओलांडून खाली जमिनीवर आदळले. स्टूलावरच्या उंचीवरून खाली पडल्यावर  घाबरगुंडी उडाली  असेल किंवा काही  दुखापत झाली असेल  त्यामुळे सुलट होऊन  चालता आले नसेल हे स्वाभाविक होते.

त्याच्या इतकी मीही घाबरले होते. तरीही काळजीने बंडूवर खेकसले. “कशाला धडपड करतोस इतका?  जोरात लागून रक्त आलं असतं म्हणजे मग?”

माझा ओरडा खाताच बंडूने अंग आत चोरून घेतल्याचे मला जाणवले. मला अपराधी वाटू लागले. बंडूच्या दुखापतीला मीच कारणीभूत होते. मलाच धडा मिळाल्यासारखी आता मी शहाणी झाले. प्लॅस्टिकचा टब काढून टाकला. स्टूलावर ती काचेची टाकी ठेवली. त्यात पाणी  घालून बंडूला अगदी हळुवार आत सोडले. माझ्याकडे पाठ करून काहीच न झाल्यासारखे बंडू पाण्यात बुडी मारून चारी पाय गोलाकार फिरवत मजेत पोहू लागला.  तो उंचावरून पडूनही धडधाकट असल्याचे पाहून मी हुश्श केले. त्यानंतर प्लॅस्टिक टबाच्या फसलेल्या माझ्या योजनेची  किती टिंगल  झाली  असावी याचा अंदाज तुम्ही करू शकालच. मी मात्र बंडूसाठी काचेच्या पेटीव्यतिरिक्त कुठलीही सुरक्षित जागा नाही याची मनाला गाठ मारली.

माझ्या यजमानांचा मात्र चळवळ्या बंडू अधिकच लाडका झाला. रोज सकाळी देवपूजेनंतर जप, श्लोक म्हणताना ते बंडूला टाकी बाहेर काढून  त्याच्या जाडसर पोटावरून बोट फिरवून “बंडू, बंडू” करत बाहेर ठेवू लागले.  तोही त्या वेळी फारशी  धावपळ(?) न  करता निवांत असायचा.  एकदा सुट्टीच्या दिवशी दुपारी कामं आटपून मी बंडूला हाका मारायला गेले तर  बंडू टाकीत नव्हता. बाहेर टी.व्ही पाहत असलेल्या  माझ्या यजमानांना विचारले तर ते म्हणाले  “बंडूला इथे सोडला होता खेळायला. कुठे गेला काय माहीत?”

मला हसावं का  रडावं ते कळेना. “बंडू म्हणजे काय कुत्रा आहे की कुणी बाळ, खेळायला सोडायला?” हे माझे शब्द मी ओठातच थोपवून बंडूच्या शोधात निघाले.  टि.व्ही कॅबिनेट खाली,  शोकेस खाली, भिंती लगत सर्व  ठिकाणी पाहिले. बंडू दिसलाच नाही. शेवटी  गॅलरीच्या काचेच्या बंद दरवाज्याला लावलेल्या घोळदार पडद्याच्या मागे धुळीने बरबटलेला बंडू सापडला. त्याला स्वच्छ करण्याशिवाय आता उपायच नव्हता.  माझ्या यजमानांनी  एवढे काम सुट्टीच्या दिवशीही अगदी आवडीने स्वीकारले.
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.