दैव - भाग ४

प्रिय निख्या,

आता तुला निख्या म्हणायला कसंतरीच वाटतं मित्रा, तुझ्या सारख्या आय. पी. एस. असलेल्या माणसाला असं हाक मारणं, तेही माझ्यासारख्यानं.......

हो परवाच्या टाईम्समध्ये आलेली तुझी मुलाखत वाचली मी. खरेतर त्यामुळेच मला तुझा पत्ता मिळाला. खरंच खूप आनंद झाला रे तुझं यश बघून. निदान तू तरी यशस्वी झालास..............

आई....! खरंच रे, तिला मी कधीच सुख दिलं नाही. सावत्र असली तरी आईच होती आणि तिने कधीच सावत्रपणा दाखवला नव्हता. उलट नेहापेक्षाही जास्त जीव लावायची ती मला. पण मी कधी तिला आई मानलंच नाही की कधी एकही संधी सोडली नाही तिचा पाणउतारा करायची. पण तिने कधीही त्याचा राग मानला नाही. खरं सांगायचं तर माझं मला कधीच कळलं नाही तो राग तिच्यावरचा होता, देवावरचा होता, बाबांवरचा की माझ्या दैवावरचा होता. माझी खरी आई आजारपणात गेली त्यानंतर बाबांनी दुसरे लग्न केले. तिने मला माझ्या आईइतकेच प्रेम दिले पण मी कधीच तिचा मुलगा नाही होऊ शकलो.

जोपर्यंत होती तो पर्यंत माझं सगळं केलं रे तिने.

हो..गेली ती....माझ्या बापाने तिला पण सोडलं नाही रे? तो तरी काय करणार म्हणा, ही भूकच फार विचित्र असते? एक सांगू निख्या, नेहा पण सध्या इथेच आहे रे! तिच्या कडे तर बघवत नाही सध्या, आधीच ती लहानपणापासूनच नाजुक आणि त्यात.....हे......! मला खूप आवडायची नेहा, त्या आईवर जरी राग असला ना, तरी एखाद्या जपानी बाहुलीसारखी दिसणारी नेहा, माझा जीव की प्राण होती. तुला आठवतं मी तुला नेहमी म्हणायचो सुद्धा, तू जर अजून ६-७ वर्षांनी लहान असतास तर नेहाचं लग्न मी तुझ्याच बरोबर लावून दिलं असतं.

ह्म्म्म्म....रेश्मा......? स्वप्न....कधीही पूर्णं होऊ न शकणारं स्वप्न ! जाऊदे, लिहीन कधीतरी....... !

चल, थांबवतो, बोटं खूप दुखताहेत आता....! मला खात्री आहे, तू नक्की येशील. हातात असलेली सगळी कामे सोडून पळत येशील या मूर्ख चेत्यासाठी. पण आत्ता नको. तशीच गरज पडली तर मी कळवेनच तुला. आणि त्यांच्याबद्दल म्हणशील तर 'ते' आहेत म्हणून मी अजूनही आहे...निदान अजूनतरी आहे. काळजी करू नकोस.

तुझाच,
चेत्या.
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.