मध्यंतरी लता काही दिवसांसाठी तिच्या घरी आई-बाबांना भेटून येण्यासाठी गेली होती.
आज आठ दिवस झाले. मला अगदी खूप कंटाळा आला होता. गॅस संपला होता. ऑर्डर द्यायची तर मला गॅस कंपनीचा फोन नंबर माहीत नाही. टीव्ही लावायचा तर कोणत्या चॅनलवर माझी आवडती सिरियल किती वाजता हे माहीत नाही. जयचे क्रिकेटचे कपडे असे धुवायचे हे माहीत नाही. कोलंबी नीट करता येत नाही म्हणून पापलेट, सुरमई किती दिवस खायची? शी बाई, पालेभाजी आणि भाकरी किती दिवसात केलीच नाही. लता कधी एकदा येतेय अशा विचारात मी हरवून गेले होते. एव्हढ्यात फोनची बेल वाजली व डोअरबेलही वाजली. मी फोन हातात घेतला आणि भांडी घासणार्या मामीने दार उघडले व मोठ्ठ्याने ओरडली, " अगं, इला, इला! चेडवां इला! "
मामीचे हाय लेव्हल मालवणी क्षणभर कळलंच नाही... अगं लता आली गं आपली! मी आपला गुडघा दुखतोय हे विसरून तिथल्या तिथेच उडी मारली. कोपर्यात शेपटी गुंडाळून बसलेलं मांजरही आळस देत उठलं व लताच्या पायात घोटाळू लागलं. मी उठले आणि चहा ठेवला व चक्क गाणं गुणगुणू लागले. अशी रिलॅक्स झाले म्हणून सांगू!
हातपाय धुऊन लता बाथरूममधून बाहेर आली आणि म्हणाली, "मी करते गं आई चहा. तू बस बाहेर. आणि काय काय करायचंय? कोणते फोन करायचेत? गॅस संपला असेल ना? भाजी काय आणू? त्यापेक्षा, आज बुधवार आहे ना, मी कोलंबी आणते. मस्तपैकी कोलंबीची रसाची आमटी करूया. बटाट्याची तळसवलेली भाजी असा मस्त मेनू करते. सॅलडही करते आणि उद्यासाठी पालेभाजी आणते. उद्या भाकरी, भाजी , दही आणि मिरचीचा ठेचा बनवते. कित्ती दिवसात तुझ्या हातचे पण खाल्लं नाही आई, मला माझ्याच घरचं आवडेनासं झालंय इतकी तुझ्या हातच्या चवीची सवय झालेय. "... लता बोलतच होती.
मी मनाशी विचार करतेय... ही तर पार्ट अॅंड पार्सल ऑफ माय लाईफ झालेय. तिचं घरातलं अस्तित्व, तिचं रागावणं. भांडणं, हसणं, पैंजणांची रुणझुण, बांगड्यांची किणकीण या सगळ्यांची मलाच काय सार्या घरालाच सवय झाली होती.
"आई, अगं लक्ष कुठंय तुझं? जेवण झालं तयार! अगं, आज बंदीनीमध्ये धर्मराज हिर्यांच्या प्रदर्शनात जातो आणि त्याच्या खिशात कोणीतरी अंगठी टाकतो आणि त्याच्यावर चोरीचा आळ येतो.. त्याच्यापुढचे इंटरेस्टिंग पाहायचे आहे ना? एनडीटीव्ही लाव १२ नंबरवर. मी हॉलमध्येच जेवण आणते. आपण जेवता जेवता बघूया. "
घरात खूप प्रकाश येऊन घरादाराच्या भिंती हसू लागाव्या, संगीताचा, सुगंधाचा छानसा शिडकावा व्हावा असं झालं. मन प्रसन्न झालं.
हे नातं असं कसं जे शब्दांविण संवादिते!
लेखिका: जयबाला परूळेकर
१ | २ |
---|