मावशीचें घर ! - भाग ४

हेमा, मावशीचें शेंडेफळ. बाळादादा सर्वांत मोठा. बाळादादा, लल्लु, विदू तिघे भाऊ आणि माई, बेबी, पपी, सरू आणि हेमा या पांच बहिणी अशी मावशीला आठ अपत्यें. सर्वांत मोठी मुलगी माई. माई जवळजवळ आईच्याच वयाची. ती आली की आई फुलून जात असे. माई, बेबी, पपी आणि सरू यांचे व आईचे काहीतरी नेहमीच गुपित चाले. त्या आल्या की त्या सगळ्या फुलून जात असत. फुलांचा, गजर्‍यांचा, वेण्यांचा सुगंध आणि त्यांच्या हास्याच्या लकेरी आसमंतात दरवळत. १९९८ सालीं मे महिन्यांत मला अचानक हेमाचा फोन आला. काय रे मावशीची पंचाहत्तरी कुठें करणार आहांत? मला खरें तर आईचा वाढदिवस ठाऊकच नव्हता. त्या काळांत तशी पद्धतच नव्हती. लाजच वाटते मला याची. मग दोनतीन दिवसांत मी, माझे धाकटे भाऊ दीपक आणि प्रशांत तसेंच बहीण बबली यांनीं छोटेखानी घरगुती समारंभ आयोजित केला. तो छान रंगला. पण त्याचें श्रेय हेमालाच. त्यानंतर दोन वर्षांतच हेमा कसल्याशा ऍलर्जीमुळें दगावली. ती या जगांत नाहीं यावर माझा अजूनहि विश्वास बसत नाहीं. पण माझ्या मनांतली छोट्टी, दोन लालचुटुक रिबिनी बांधलेली हेमा, ‘वाण्याच्या दू, कानांत ऊ, त्तम चिवडा मिळतो’ म्हणजे काय? असें कोडे घालते आणि हृदयाचा एक ठोका चुकतोच.

लल्लु पैलवान होता. १९६६ मध्येंच मेंदूतील रक्तस्त्रावानें अकालीं वारला. विदू कधीं भेटे, प्रेमानें बोले, गेल्या वर्षींच हृद्रोगानें परलोकवासी झाला. वहिनी पण चांगली बोलते. माईचे मुलगे विजय आणि दिलीप आणि मुलगी नीला छान प्रेमानें बोलतात. बेबी पण कधींमधीं भेटते. तसें तिचें घर मामीच्या, मावशीच्या घराच्या वाटेवरच. पण तिथें इतका वेळ जायचा कीं हिच्याकडे जाणें होत नसे. पूर्वीं खूप रागवायची. तिच्याकडे मात्र जातयेत नाहीं म्हणून. आतां मात्र हटकून जातों. तीहि समजून घेते. तिचा मुलगा संजय तसा अबोल. शुभा आणि गीता तिच्या मुली. शुभा रुपारेलला होती. ती व माझी मामेबहीण भारती रुपारेलच्या प्रशस्त, रम्य आवारांत जोडीनेंच फिरत. त्यांना खास जवळच्या अशा इतर मित्रमैत्रिणी नव्हत्याच. शुभा आणि तिचे यजमान कधीं कुणाच्या लग्नकार्यांत भेटतात. गीता बरीच उंच. पण आमची फारशी ओळख नाहीं. पपीचा मुलगा मिलिंद माझ्यापेक्षां खूप लहान. पण मस्त मनमोकळ्या गप्पा मारतो. त्यांची क्लिअरिंग एजन्सी आहे. मी नोकरी करतों त्या कंपनीचे क्लिअरिंगचें, एक्सपोर्टचें कांहीं काम मीं त्याच्याकडे दिलें होतें. तें त्यानें सचोटीनें केलें. त्याच्या चोख व्यावसायिक वृत्तीमुळें त्याच्याबरोबर काम करतांना घालवलेले बरेच क्षण खूप आनंद देऊन गेले. वेळोवेळीं त्यानें आयातनिर्यातीच्या कामांतल्या खाचाखोचा समजावून अमूल्य मार्गदर्शन केलें. त्याला जुळीं मुलें आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. त्याचा भाऊ प्रसाद. हाहि कधीं फोनवर वा ई-मेलवर भेटतो. सरू गोरेगांवला राहाते. अधूनमधून फोन करते.नाना गेल्यावर मावशी खचली. तिच्या शेवटच्या काळांत तिला माईनें चांगलें सांभाळलें. आयुष्यांत कांहीं कांहीं गोष्टी करायच्या राहून जातात. गोरेगांवला माईकडे जाऊन मावशीला बघायचें मात्र राहूनच गेलें.


लेखक: सुधीर कांदळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: