इनटॉलरेबल क्रुएल्टी - भाग ३

एके दिवशी त्याच्याकडे एक 'पकडला गेलेला' नवरोबा येतो. एका टवळी बरोबर मोटेलमध्ये मजा करताना अचानक त्याच्या बायकोने, म्हणजेच मॅरिलिन रेक्सरॉथने (कॅथरिन झेटा-जोन्स) नेमलेला खाजगी गुप्तहेर त्या जागी येऊन त्या दोघांच्या चाळ्यांचं चक्क व्हिडीओ चित्रिकरण करतो. ही खरं तर एक आपण ज्याला ओपन-अ‍ॅन्ड-शट केस म्हणू तशी असते. त्यामुळे खटला सुरू होण्यापूर्वी झालेल्या भेटीत समेटाचे आणि समेट मान्य नसल्यास दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा दाखवावा अशा अर्थाचे प्रस्ताव मॅस्सी मांडतो. मॅरिलिन आणि तिच्या वकिलाने आडमुठेपणा दाखवल्यामुळे मिटींगमधून काही फलित निघत नाही. यामुळे वैतागलेला मॅस्सी त्याच खाजगी गुप्तहेरामार्फत मॅरिलिनच्या पत्त्यांच्या वहीचे फोटो काढून घेतो, आणि त्यात त्याला संशय असलेल्या अशा एका माणसाला साक्षीदार म्हणून उभं करतो की ज्यानं मॅरिलिनची तिनेच केलेल्या विनंतीवरून तूफान पैसा असलेल्या पण इतर बाबतीत मूर्तीमंत बावळट असणार्‍या माणसाशी (अर्थातच लग्न करण्याच्या इराद्याने) ओळख करुन दिलेली असते. या साक्षीदाराने ही गोष्ट न्यायालयात उघड करताच नवरोबा रेक्स रेक्सरॉथ (एडवर्ड हर्रमन) ऐवजी मॅरिलिन कपर्दिकही न मिळता हा खटला हरते.

आयुष्यातली पाच वर्ष ज्या वैभवाच्या लालसेने फुकट घालवली त्या श्रीमंतीचा आणि पर्यायाने स्वयंपूर्णतेचा असा हातातोंडाशी आलेला घास मॅस्सीमुळे हिरावून घेतला गेल्याने मॅरिलिन सुडाने पेटून उठते. यापुढची कथा सांगण्यात मजा नाही. एखाद्या गूढपटाची कथा फार सांगू नये म्हणतात, पण तोच न्याय या सिनेमालाही लागू आहे.

कॅथरिन झेटा-जोन्सचे जे काही मोजके चित्रपट मी या आधी बघितले होते, त्यावरून तिच्या अभिनयकौशल्याबाबत माझं मत फारसं चांगलं झालं नव्हतं, मात्र या चित्रपटातल्या तिच्या अभिनयाने हे माझं मत संपूर्णपणे बदलून टाकलं. वर उल्लेख केलेल्या मॅरिलिन आणि तिचा वकील यांच्याबरोबरच्या भेटीत मॅस्सीच्या मनात मॅरिलिनविषयी प्रथमदर्शनीच प्रेम वाटू लागतं. त्या मिटिंग मधला जॉर्ज क्लूनी आणि झेटा-जोन्स या दोघांनीही अप्रतिम मुद्राभिनय केला आहे. विशेषतः झेटा-जोन्सचा अभिनय संयत तरीही प्रसंगाला साजेसा परिणामकारक झाला आहे. झेटा-जोन्सने असाच अभिनय कोर्टात मॅस्सीच्या उलटतपासणीला उत्तर देताना केला आहे. क्रूर कारस्थानी संपत्तीलोलूप स्त्री ते तिच्याही नकळत मॅस्सीच्या प्रेमात पडून त्याच्याबाबतीत हळवे होणे हा मॅरिलिनच्या व्यक्तिरेखेचा प्रवास तिने फार समर्थपणे सादर केला आहे.

चित्रपटातल्या जॉर्ज क्लूनीच्या अभिनयाचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सुपारी घेऊन खून करणार्‍या दमेकरी गुंडाला भेटायला गेल्यावर त्याच्या तब्येतीकडे पाहून गोंधळून जाऊन क्षणाक्षणाला झपाट्याने बदलणार्‍या भावमुद्रा सादर करताना क्लूनीने कळस गाठला आहे. मॅरिलिन आणि तिचा वकिल फ्रेडी बेंडर यांच्या बरोबरच्या भेटीत मॅस्सी जेव्हा फ्रेडीचं मानसिक खच्चीकरण करतो तेव्हाचा त्याचा अभिनय निव्वळ अप्रतिम.
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.