इनटॉलरेबल क्रुएल्टी - भाग २

धमाल तरीही सकस कथा आणि मोठे 'स्टार्स' असलेला कलाकारांचा संच ही या चित्रपटाची प्रमुख जमेची बाजू. मी मागील दोन लेखात म्हटल्याप्रमाणे असले वेगळे सिनेमे आपल्याकडे प्रदर्शित होत नाहीत, आणि समजा झाले तरी कधी आले कधी गेले समजत नाहीत. तसा 'इनटॉलरेबल क्रुएल्टी' आपल्याकडे लागल्याचंही मला समजलं नाही. जॉर्ज क्लूनी हा माझ्या आवडत्या नटांपैकी एक. त्याचा 'बर्न आफ्टर रीडींग' (२००८) हा ब्लॅक कॉमेडी प्रकारात मोडणारा चित्रपट अगोदरच पाहिला असल्याने आधीच आलेल्या 'इनटॉलरेबल क्रुएल्टी' (२००३) बद्दल अधिकच उत्सुकता होती, आणि एक झकास विनोदपट म्हणून लोकप्रिय झालेल्या या चित्रपटाने आणि क्लूनीने त्यांच्याकडून असलेल्या माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या.

माईल्स मॅस्सी (जॉर्ज क्लूनी) या घटस्फोट तज्ञ वकिलाने मॅस्सी प्री-नप म्हणून ओळखल्या जाणारा कराराचा विवाद-प्रूफ मसूदा तयार केलेला असतो. या मेस्सी प्री-नप मध्ये कोणीही एखादी पळवाट किंवा अन्य काही कायदेशीर खुसपट काढू शकलेलं नसतं याचा त्याला सार्थ अभिमान असतो. मॅस्सी प्री-नपमध्ये अशी कलमं असतात की घटस्फोट झाल्यास लग्न करताना तुम्ही जे आणाल आणि लग्न टिकेपर्यंत कमवाल तेच तुम्हाला स्वतःबरोबर नेता येईल, बाकी काहीही नाही - मग घटस्फोट कुठल्याही कारणाने का झाला असेना. त्यामुळे ह्या प्रि-नप करारावर जे जोडपं सही करेल त्यांनी काहीही झालं तरी आपल्या संपत्तीच्या दृष्टीने निश्चिंत रहावं असा त्या मसुद्याचा लैकिक. हाच मॅस्सी प्री-नप नामक लग्नपूर्व करार या चित्रपटात अनेकदा प्रमुख भूमिका बजावताना दिसतो.

तर, माइल्स मॅस्सी हा आपल्या वकिली हुशारीबरोबरच खाजगी गुप्तहेरांच्या मदतीनं तसंच जमेल ते भले-बुरे मार्ग वापरून अशक्यप्राय भासणारे अनेक खटले जिंकून एक यशस्वी आणि अजिंक्य डिव्होर्स लॉयर म्हणून प्रस्थापित झालेला असतो. अशाच एका खटल्यात लफडेबाज बायकोचं वकीलपत्र घेतलेला मॅस्सी तिचे विवाहबाह्य संबंध पुराव्यासकट सिद्ध होण्यासारखे असूनही शिताफीने बाजी उलटवून तिला खटला जिंकून देत तिच्या डोनोवन डोनॅली (जेओफ्री रश) या टि.व्ही. प्रोड्युसर नवर्‍याला या खटल्यातून संपूर्णपणे कफल्लक बनवतो, तर अन्य एका खटल्यात बायकोचं लफडं शोधून काढून तिच्या नवर्‍याला वाचवतो.
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.