एरी कॅनॉल ! - भाग ३

नंतर थोडया् उत्तरेला असलेल्या मोहॉक नदीचा विचार पुढे आला. एरी सरवराच्या काठच्या बफेलो शहरापासून कालवा काढून तो पूर्वेला मोहॉक नदीच्या खोर्‍यातून नेऊन, हडसन नदी, जी उत्तर-दक्षिण वाहून न्यूयॉर्कपाशी अटलांटिकला मिळते, तिच्या काठावरील अल्बनी शहरापाशी त्या हडसन नदीला मिळवावा असा महत्वाकांक्षी प्रस्ताव मांडला गेला. या कालव्यांतून एरी वगैरे सरोवरांच्या दक्षिणेच्या सर्व नवीन वस्तीच्या भागांतील शेतीमाल, सरळ न्यूयॉर्कपर्यंत जाऊन पुढे युरोपपर्यंतहि निर्यात करतां येईल अशी आशा निर्माण झाली. मात्र हा लांबलचक कालवा बनवणे सोपे मुळीच नव्हते. हा कालवा बांधण्याची कल्पना जरी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच मांडण्यात येत होती तरी तिला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. एरी सरोवरापासून अल्बनीपर्यंत ६०० फुटांचा उतार होता. मालवाहतुकीचे कालवे उतरते असत नाहीत कारण पाणी वाहून नेणे हा त्यांचा उद्देशच नसतो. त्यामुळे कालवा वाटेत आवश्यक तेथे एकदम उतरवण्यासाठी Locks, (गोद्यांमध्ये असतात तशीं), बनवावी लागतात. त्या काळच्या बांधकाम साहित्याच्या व तांत्रिक प्रगतीच्या मर्यादांमुळे एका lock मध्ये फार तर १२-१३ फूट उतार ठेवता येत होता. त्यामुळे ५०-६० locks बांधावीं लागणार होतीं व खर्च खूप येणार होता, हे कालव्याला विरोधाचे कारण होते.

१७८४ पासून मांडले गेलेल्या या कालव्याचा जोरदार प्रचार जेसे हॉवले नावाच्या एका कर्जबाजारी होऊन तुरुंगात पडलेल्या व्यापार्‍याने दीर्घकाळ चालवला. मग जोसेफ हेलिकॉट नावाच्या जमिनी विकण्याचा व्यापार करणार्‍याने त्याचा पाठपुरावा चालवला कारण पर्वतापलीकडच्या मुलखातील त्याच्या विकाऊ जमिनीना भाव मिळत नव्हता! प्रेसिडेंट जेफरसनने या कालव्याची कल्पना नाकारली होती पण न्यूयॉर्क राज्याचा गव्हर्नर क्लिंटन याला त्यातून न्यूयॉर्क राज्य व बंदर यांच्या विकासाचा मार्ग दिसत होता. त्याने कालव्याचा जोरदार पुरस्कार चालवला. मात्र केंद्र सरकारने कालव्याचा खर्च करण्यास व्हर्जिनिया वगैरे इतर मोठ्या व श्रीमंत राज्यांचा विरोध होता कारण कालव्याचा फायदा मुख्यत्वे न्यूयॉर्क राज्याला मिळणार होता. अखेर न्यूयॉर्कमधील व्यापारी वगैरेंच्या दबावामुळे न्यूयॉर्क राज्याने १८१७ साली ७० लाख डॉलर खर्च करून हा कालवा स्वत:च बांधण्याचे ठरवले. विरोधकांनी उपरोधाने या कालव्याचे नाव क्लिंटनचा खंदक असे ठेवले होते.

३६३ मैल लांबीचा हा कालवा बफेलो पासून अल्बनी पर्यंत जाणार होता. कालव्याला नावापुरताच उतार ठेवावयाचा होता. तरीहि काही थोडे पाणी सारखे वाहून जाणारच होते त्यासाठीच कालवा एरी सरोवरापासूनच सुरू व्हायचा होता म्हणजे पाणी कायम मिळत राहील. एरी सरोवराचे पाणी नायगारा नदीतून वाहत जाऊन नायगारा धबधब्यातून खालीं पडून पुढे त्याच नायगारा नदीतून पुढच्या ऑंटारिओ सरोवराकडे वाहत जाते हे आपणास माहीत असेल. त्यातले फक्त थोडेसेच पाणी या कालव्यातून वाहणार होते.


प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.