एरी कॅनॉल ! - भाग २

पुढे नेपोलिअनने इजिप्तवर स्वारी केली तेव्हां त्याला या जुन्या कालव्याची गोष्ट कानावर आली. त्याच्या बरोबर इंजिनिअर व सर्व्हेअर होते. नाइल ऐवजीं भूमध्य समुद्राकाठच्या अलेक्झांड्रिआ बंदरापासून तांबड्या समुद्रापर्यंत उत्तर दक्षिण कालवा बनवावा अशी कल्पना पुढे आली. सर्व्हे करताना काहीतरी चुका झाल्या व असा गैरसमज झाला कीं दोन्ही समुद्रांच्या पाणीपातळीत ४०-५० फुटांचा फरक आहे! त्यामुळे कालव्याची कल्पना सोडून दिली गेली. पण काही वर्षांनंतर दिसून आले कीं पातळीतील फरक अगदींच थोडा आहे. मग एक कंपनी स्थापन करून व इजिप्तच्या राजाकडून कालव्याची जागा १०० वर्षांच्या कराराने मिळवून कालवा बनवला गेला. त्यांत इजिप्तच्या राजाची ४०टक्के मालकी होती. इंग्रजांचा अजिबात भाग नव्हता. मात्र लवकरच चैनीसाठी पैसे मिळवण्यासाठी राजाने आपला हिस्सा त्याने ब्रिटिशांना विकला. कालवा आजतागायत वापरात आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, नासरच्या काळात, तो इजिप्तने ताब्यात घेतला हा आपल्याला परिचित इतिहास आहे. आतां सुएझ कालव्याकडून पुन्हा एरी कॅनालकडे वळूं.
इंग्लंड व युरोपांत इतरत्रहि माल व प्रवासीवाहतुकीसाठी लहान-मोठे कालवे बनवण्याची पीठिका होती. कालव्यांतून सपाटतळाच्या रुंद बोटी किंवा तराफ्यांतून मालवाहतूक फार स्वस्त पडते कारण कालव्याच्या काठावर बनवलेल्या निरुंद पायवाटेवरून घोड्याच्या सहाय्याने वा माणसांकडून असा पडाव वा तराफा ओढून नेणे सोपे जाते. त्या काळात रस्ते फारसे चांगले नसल्यामुळे घोड्यांनी वा बैलांनी ओढण्याच्या गाड्यांतून वा त्यांच्या पाठीवर लादून किंवा डोईओझ्याने होणारी मालवाहतूक महाग व वेळखाऊ होत असे. इंग्लंडात एका कोळशाच्या खाणीपासून शहरापर्यंत कोळसा वाहून नेण्यासाठी खाण मालकाने १७६१साली बांधलेला खासगी मालकीचा कालवा (bridgewater canal) उपयुक्त व फार फायदेशीर ठरला होता व त्यानंतर असे अनेक कालवे इंग्लंडात व युरोपांत बनले होते. त्याच धर्तीवर एरी कॅनाल बनवण्याची कल्पना पुढे आली. मात्र एवढा लांब कालवा कोठेच बनलेला नव्हता.

अमेरिकेतील सुरवातीच्या सर्व वसाहती अटलांटिकच्या किनार्‍याच्या आसपासच्या भागांत झाल्या व हळूहळू वस्ती आणि शेती पश्चिमेकडे वाढत गेली. पण उत्तर-दक्षिण पसरलेल्या अपेलेशियन पर्वताची रांग ही नैसर्गिक मर्यादा ठरली होती. ही पर्वताची ओळ ओलांडून पश्चिमेला जाण्यासाठी सुलभ मार्ग नव्हते त्यामुळे कालांतराने हळूहळू पर्वतापलीकडे नवीन वसणार्‍या पण अतिशय सुपीक भागांतील शेतीमालाला बाजारपेठ नव्हती. उत्तरेकडील सरोवरांतून हा माल कॅनडाकडे बोटींतून जाई. त्या व्यापाराचा फायदा कॅनडाला मिळत होता! यावर उपाय म्हणून अपेलेशिअन पर्वतांतून पूर्वेला वाहणार्‍या  पोटोमॅक नदीच्या खोर्‍यातून कालवा बनवावा अशी कल्पना पहिल्याने पुढे आली व खुद्द जॉर्ज वॉशिंग्टनने ती उचलून धरली. मात्र पुष्कळ खर्च झाल्यावर असे दिसून आले कीं या खोर्‍यात फार जास्त उतार आहे त्यामुळे कालवा सोयिस्कर होणार नाही. त्यामुळे वॉशिंग्टनच्या पश्चात हा कालवा बारगळला.


प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.