एरी कॅनॉल ! - भाग ४

कालवा ४० फूट रुंद व फक्त चार फूट खोल करावयाचा होता. खोदलेली माती एकाच काठावर रचून बनणार्‍या बंधार्‍यावर रुंदशी पायवाट बनवायची होती. पाण्याखाली फक्त साडेतीन फूट जाणारी सपाट तळाची तराफ्यासारखी मोठी होडी घोड्यांच्या सहाय्याने या वाटेवरून कालव्यातून ओढली जाणार होती. कालव्याच्या एकाच बाजूस अशी वाट असल्यामुळे दोन बोटी समोरासमोर आल्या तर एकमेकांना ओलांडून जाणे हे एक दिव्यच असे. कालव्याच्या बाजू दगडात बांधून काढल्या व तळाला मात्र घट्ट चिखलाचेच आवरण होते. दगडी बांधकामावर शेकडो जर्मन गवंड्यांनी काम केले आणि नंतर त्यानीच न्यूयॉर्कमधील अनेक प्रसिद्ध इमारती बांधल्या.

१८१७ मध्ये काम सुरू झाले पण दोन वर्षात फक्त १५ मैल काम झाले. या वेगाने काम पुरे होण्यास ३० वर्षे लागली असती! मुख्य अडचण वाटेत येणारी अनंत मोठी झाडे काढणे ही होती. मात्र कारागिरांनी नवनवीन युक्त्या योजल्या व झाडाचे बुंधे उपटण्यासाठी घोड्यांनी ओढण्याचीं साधी पण उपयुक्त यंत्रे बनवलीं. मग कामाचा वेग वाढला पण मजुरांचा तुटवडा, मार्गावरील बर्‍याच भागांतील रोगट हवामान या अडचणी होत्याच. मुख्य अडचण तज्ञ व्यक्तींची होती. कोणाही थोडेफार शिकलेल्या माणसाला मुकादम, सर्व्हेअर बनवावे लागे. अमेरिकेत तेव्हां तांत्रिक शिक्षणाची कोणतीहि सोय सुरू झालेली नव्हती त्यामुळे इंग्लंड वा युरोपमध्ये थोडाफार अनुभव घेतलेल्या माणसांवरच विसंबून रहावें लागे. याची मुख्य अडचण locks बांधण्यामध्ये येत होती. मात्र अनुभवातून शिकत, अनेकांनी या सर्व अडचणींवर मात करीत, प्रावीण्य मिळवले आणि पुढे बांधकाम क्षेत्रात मोठे नावहि कमावले.

या सर्व अवघड कामांत दोन मुख्य गोष्टींचा उल्लेख करणार आहें. एक म्हणजे, अनेक ठिकाणी कालवा, नद्या, ओढे ओलांडून पलीकडे नेण्यासाठी मोठे पूल बांधावे लागले. अशा पुलावरून वाहने नव्हे तर पाणी जावयाचे होते. पूर्वानुभव नसूनहि असे अनेक लहान मोठे पूल बांधले गेले. आपल्याकडे असे पूलहि दुर्मिळ आहेत. माझ्या माहितीत भीमेवरील उजनी धरणाच्या जलाशयापासून डाव्या बाजूने सुरू होणारा एक मोठा कालवा भीमा नदी अशा खूप मोट्या पुलाच्या सहाय्याने ओलांडून उजव्या बाजूला नेलेला आहे. सोलापुराहून रस्त्याने पंढरपुरास जाताना डाव्या बाजूला तो पूल दिसतो.

दुसरी गोष्ट म्हणजे कालव्यावर एकेरी लॉक्स अनेक ठिकाणी झालीं पण बफेलोपासून जवळच, ज्या कड्यावरून नायगारा धबधबा उडी मारतो त्याच कड्याच्या पूर्वेकडील दूरच्या भागावरून, कालवा अल्बनीकडे नेण्यासाठी खाली उतरवावयाचा होता. त्यासाठी एकापुढे एक चिकटून अशीं ५-६ Locks बांधणे आवश्यक होते. मोठ्या कष्टाने सुरुंगानी कडा फोडून काढून व अतिशय कौशल्याने दगडी बांधकाम करून तीं बांधलीं गेलीं. तेथे या कालव्यावरच्या मालवाहतुकीचे एक जमिनीवरचे बंदरच बनले व त्याचे नावच Lockport झाले. अजूनहि ते शहर त्याच नावाने अस्तित्वात आहे व त्याचे जवळच ती पहिलीं जुनी व मागाहून नव्याने बांधलेली लॉक्सहि आहेत.

प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.