एरी कॅनॉल !

अमेरिकेत असताना एरी कॅनाल बद्दल एक पुस्तक माझ्या वाचनात आले. त्याचा विषय अगदीच अपरिचित पण कुतूहल चाळवणारा होता. नंतर कॉम्प्यूटर वर शोध घेतला तेव्हा दिसले कीं या विषयावर शेकडो पुस्तके लिहिलीं गेलीं आहेत! तेव्हाच माझ्या मनात आले कीं हा विषय भारतीय मित्रांनाहि आवडेल. त्या हेतूने मग कांही टिपण्या तयार केल्या व माहिती जमा केली. त्या आधारावर हा लेख लिहिला आहे.

एरी कॅनाल हा उत्तर अमेरिकेतील एक मानवनिर्मित जलप्रवाह आहे. तो बांधण्याचा हेतु माल आणि प्रवासी वाहतूक हा होता. थोडाथोडका नव्हे तर तब्बल ३६३ मैल लांबीचा हा कालवा एरी सरोवराच्या काठावरील बफेलो शहरापासून निघून हडसन नदीच्या काठावरील अल्बनी शहरापर्यंत जातो. १८१७ पासून १८३२ पर्यंत याचे काम चालले पण १८२५ पासून टप्प्याटप्प्याने हा वाहतुकीस खुला झाला. म्हणजे पेशवाई बुडाल्याचा हा काळ आहे!
हे सर्व वाचताना मला प्रथमच जाणवले कीं आपल्याला हे सर्व नवीन आहे. आपल्या माहितीत म्हणजे, कालवे हे नदी वा सरोवराचे पाणी शेतीला वा पिण्यासाठी पुरवण्यासाठी असतात! ते आपल्याकडेहि फार जुन्या काळापासून होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर मोठीं धरणे व कालवे आपल्या समोरच बनले. काही थोडेच कालवे वीज निर्मितीसाठी पाणी वाहून नेण्यासाठीहि बनलेले आपल्याला माहितीत असतात उदा. लोणावळ्यातील, वलवंड धरणापासून खोपोलीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी घाटाच्या कड्यापर्यंत पाणी वाहून नेणारा कालवा. पण माल वा प्रवासी वाहतुकीसाठी मानवाने बनवलेला कालवा भारतात एकहि मला माहीत नाही. चूकभूल माफ.

पण मग अमेरिकेत असा कालवा बनवण्याची कल्पना कोणाला व अचानक कशी सुचली? असे अचानक काही क्वचितच होते, बहुधा काहीतरी पूर्वपीठिका असतेच. पनामा किंवा कील कालवा बांधताना सुएझ कालव्याची पीठिका होती कीं! हे तीनही कालवे दोन समुद्र जोडणारे आहेत व खूप मोठे असून त्यातून मोठाल्या बोटी जाऊं शकतात हे आपल्याला माहीत आहे. मग मला प्रश्न पडला कीं प्रथम सुएझ कालवा बांधताना कोणती पीठिका होती? आपण शाळेत वाचले कीं फर्डिनंड लेसेप्स या फ्रेन्च इंजिनिअरने सुएझ कालवा बांधला. त्याला अचानक कसे सुचले कीं येथे एक कालवा खणून भूमध्य व तांबडा समुद्र जोडावे? त्याची पीठिका थोड्या शोधण्यानंतर दिसली ती अशी कीं फार जुन्या काळी एका इजिप्शियन राजाने दक्षिणउत्तर वाहणारी व भूमध्य समुद्राला मिळणारी नाइल नदी तांबड्या समुद्राला जोडणारा एक पूर्व-पश्चिम कालवा खोदला होता व तो बराच काळ वापरात होता. कालांतराने तो गाळाने भरून गेला, तांबड्या समुद्राची लांबीहि कमी झाली व त्याचे उत्तरेकडील टोक गाळाने भरून जाऊ लागले. परिणामी कालव्यातून जहाज तांबड्या समुद्रात उतरू शकत नाहीसे झाले व कालवा बंद पडला. मात्र कालव्याचे तुकडे खंदक स्वरूपात शिल्लक होतेच.


प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.