कडू गुपित - भाग २

एस्माकडे सर्टिफिकेट तर नाहीये ती साराला सांगते की ती सर्टिफिकेट मिळवायचा प्रयत्न करेल आणि प्रत्यक्षात ती ट्रीपचा खर्च उचलण्याची तयारी सुरू करते. सगळ्या ओळखीच्यांकडून उधार मिळवण्याचेही प्रयत्न अपुरे ठरतात. ती एका नाईटक्लबमध्ये वेट्रेसचं कामही सुरू करते. इकडे सारा सर्टिफिकेटसाठी जसजशी मागे लागत राहते, माय-लेकींमधला तणाव वाढत जातो. आणि जेव्हा शाळेत हुतात्म्यांच्या मुलांची यादी लागते, तेव्हा त्यात स्वतःचं नाव पाहून सारा हादरते. एका वर्गमित्राच्या खोचक टोमण्यावर कुणा दुसर्‍याच्या तोंडून ऐकलेली बापाच्या हौतात्म्याची कहाणी स्वतःच्या बापाची म्हणून सांगते. घरी येऊन ती आईला खूप टोचते तेव्हा शेवटी एस्मा पूर्ण कोलमडून जाते आणि साराच्या वडलांबाबतचं कडू गुपित ती सांगते.
बोस्नियाक-सर्ब युद्धांमध्ये चेटनिक्स अर्थात सर्ब सैनिकांनी बोस्नियन स्त्रियांचे 'मास रेप' केले होते. ही एका पद्धतीची अमानवी युद्धनीती आहे, ज्यात स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करून पूर्ण समाजाचा पायाच हालवून टाकला जातो. नुकताच आफ्रिकेतील वांशिक युद्धांमध्येदेखील ह्या पाशवी नीतीचा वापर केल्याचं बातम्यांमध्ये ऐकलं होतं. तर एस्मा ह्याच पाशवी प्रकाराचा एक बळी असते. आणि ह्याचाच अर्थ सारा ही एका हुतात्म्याची नाही, तर एका चेटनिकची म्हणजे शत्रूची मुलगी असते.
हे कडू गुपित ऐकल्यावर साहजिकच सारा सुन्न होते आणि आपल्या खोलीत जाऊन बसते. दुसर्‍या दिवशी एस्मा साराला घेऊन ट्रीपच्या बसपर्यंत सोडायला जाते. सारा अजूनही बोलत नाहीये. पण बस जशी पुढे जायला लागते, तशी मागच्या खिडकीतून सारा आपल्या हतबल आईकडे पाहत राहते. आणि अगदी शेवटी ती तिला हात करते. आणि मग बसमध्ये गाणार्‍या इतर मुलांसमवेत आवाजात आवाज मिसळून गायला सुरुवात करते.
हा सिनेमा माय-लेकींचं तरल नातं तितक्याच हळुवारपणे रेखाटत जातो. एस्माची व्यक्तिरेखा कधी हतबल तर कधी निग्रही तर कधी कमालीची कोसळलेली इतक्या टोकांपर्यंत हेलकावे खाते आणि अभिनेत्री मिरयाना करानोविचनं ती तितक्याच तपशिलासकट उभी केलीय. सारा (लुना मिओविच) सकट सर्वच प्रमुख पात्रांचं काम पूरक आहे. मुलीसाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची आहुती देणारी आई वैश्विक आहे हेच हा सिनेमा पुन्हा अधोरेखित करतो.
सिनेमा बर्‍यापैकी संथ आहे. काही काही ठिकाणी, एस्पेशली सपोर्ट ग्रुप्सच्या सीन्समध्ये तर सिनेमा चक्क थांबल्यागत वाटतो. पण तीच ह्या सिनेमाची प्रकृती आहे. एखादं विकल करणारं संथसं शोकगीत असावं, तद्वत हा सिनेमा आपलं अंतःकरण विदीर्ण करत जातो. एस्माच्या गुपिताची आपल्याला तिनं सांगायच्या आधीच थोडी कल्पना येते. पण रहस्य हे सिनेमाचं सार नसल्याने, फारसा फरक पडत नाही. आपले वडील कोण, ह्याची जाणीव झाल्यानंतर सारा जेव्हा स्वतःच्या खोलीत जाते. आणि पूर्वी एकदा सारानं आईला विचारलेलं असतं की माझे केस तुझ्यासारखे नाहीत, म्हणजे माझ्या वडलांसारखे असणार, तो प्रसंग आठवून सारा स्वतःच्या केसांकडे पाहते आणि हेअर ट्रीमरनं आपले सगळे केस काढून टाकते. हा प्रसंग अक्षरशः अंगावर काटा आणतो.हा, तसेच साराचं आपल्या वर्गमित्रावर रागावणं किंवा एस्माचे काही प्रसंग सिनेमाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात
सिनेमाला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळालेली आहेच. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलचा प्रतिष्ठेचा गोल्डन बेअर पासून अनेक सन्मान मिळालेत. पण दिग्दर्शिकेचा हा सिनेमा हृदयाची जी तार छेडून जातो, त्यावरचा कुठलाही पुरस्कार अस्तित्वातच नाही.
 (पोस्टरचं छायाचित्र विकिपीडियावरून साभार. बोस्नियाक-सर्ब युद्धाबद्दल अधिक माहिती इथे.)







लेखक: विद्याधर भिसे

२ टिप्पण्या:

मंदार जोशी म्हणाले...

नेमक्या शब्दात मांडलंय चित्रपटाबद्दल. आवडला लेख. चित्रपट बघायला हवा.

Suhas Diwakar Zele म्हणाले...

वाह भाई..नक्की बघेन मी हा शिनेमा...खूप छान परीक्षण केल आहेस..