काळरात्र ! - भाग ३

पुलावरच्या सगळ्या गाड्या पाहून झाल्या की निदान सीमाला तरी गाडीत ठेवू पण एकाही गाडीमध्ये जागा नव्हती. शेवटी एका ट्रकखाली पुढच्या आणि मागच्या चाकामध्ये जागा दिसली. दोन्ही टायरला दगड लावलेले होते आणि ट्रकखालून पावसाचं पाणी वाहत होतं. कपडे तर तसेही ओलेच झालेले. सीमाला चाकाशेजारी जिथे पाणी कमी वाहत होतं तिथे बसायला सांगितलं आणि भूषण आणि मी दुस-या चाकाला टेकून बसलो. बाहेरच्या बाजूला दोन्ही छत्र्या लावल्या जेणेकरून थोडंतरी कोरडे राहू. त्या पावसाच्या पाण्यात हात पाय पसरून मोकळे केले. खडूस बॉसच्या त्या चिकण सॅंडविचमुळे मला तशी फार भूक नव्हतीच पण हे दोघे तर उपाशीच होते आणि खायला काहीच नव्हतं. तसंच आम्ही तिघे त्या ट्रकखाली, त्या वाहत्या पाण्यात, ओल्या अंगाने आणि ४-५ तास कमरे एव्हढ्या पाण्यात चालण्याने थकून झोपी गेलो. सकाळी ४ वाजताच भुषणने मला आणि सीमाला उठवलं. आम्ही ट्रकच्या खालून बाहेर आलो. पुलावरून पाहिलं तर खाली पाण्याचा लोंढा अजून वाहतच होता. उजवीकडे एक मुलगी मोठ मोठ्याने रडत होती. तिकडे पाहिल्यावर कळलं की ती काल रात्री तिच्या नव-यासोबत पुलापलीकडे जाण्याकरिता निघालेली पण पाण्याच्या प्रवाहामुळे पुढे जाता येईना. मागे फिरताना त्याचा हात हिच्या हातातून निसटला आणि तो अंधारात गायब झाला. ही कशीबशी पुन्हा पुलावर आली. आम्ही पुलाखाली बघितलं तर तिच्या नव-याच शरीर खाली उभ्या असलेल्या एका टॅक्सीवर अडकलेलं होतं.

त्या पुलाच्या बाजूने एक भिंत होती जी पार केली की कलिनाकडे जाणारा रोड लागत होता. त्या भिंतीवर चढून बरीच माणसे पलीकडे जात होती. आम्हीही तसंच करायचं ठरवलं. पण अडचण हि होती की ती भिंत १२ फूट उंच होती आणि जीन्स घातलेल्या सीमाला त्या भिंतीवर चढवणं म्हणजे दिव्यच होतं. आम्ही दोघांनी हातावर, खांद्यावर चढवून कसंतरी तिला ती भिंत चढवली. भिंतीच्या पलीकडे चिखल होता. बाकीचे लोक उड्या मारत आहेत हे पाहून आम्हीही उड्या घेतल्या. तर पाय गुडघ्यापर्यंत चिखलात.. कसंतरी करून त्या चिखलाच्या बाहेर पडलॊ. तिघांच्याही पॅंट्स खराब झालेल्या. पुढे चालून आम्ही हयात हॉटेलशेजारचा रोड पकडला. तिकडेही गुडघाभर पाणी होतं. मग तिकडे पॅंट धुऊन काढली. तिथून आम्ही अर्धा तास चालत चालत कुर्ला मार्केटच्या आधीच्या रस्त्याला आलो. पुढचा रस्ताही गळ्यापर्यंत पाण्यात भरलेला होता. आम्ही तिथेच थोडावेळ थांबण्याचा निर्णय घेतला. जवळच एक रिक्षा रिकामी उभी होती. तिथे तिघेही जाऊन बसलॊ. रस्त्याच्या कोपर्‍यावर कुणीतरी चहा बनवत होतं. म्हटलं चला थोडा चहा पिऊन घेऊ. तो माणूस फुकटमध्ये चहा आणि पारले-जीचे पुडे देत होता. अश्या प्रसंगी सकाळी ५ वाजता उठून सगळ्यांसाठी फुकट चहा आणि पारले-जी बिस्किट तो वाटत होता. त्याने केलेली ती मदत खुपच मोठी होती. मी मनापासून अजूनही त्या अज्ञात इसमाचे आभार मानतो. थोडंसं खाल्ल्यावर आम्हा तिघांनाही हायसं वाटलं.
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.