घरच्यानीच घरी जा म्हटल्यावर
समजेना कोणत्या घरी
एकदा तर माप ओलांडून आले होते या घरी
विचार केला न शेवटी केली देवाला प्रार्थना
म्हटले तुझी आज्ञा झाली तर येईन मी त्या घरी
म्हणाला, इतक्यात कुठे, अजून बरीच कामे आहेत
कर ती पूरी.. मग पाहू
म्हटले खूप उबग आलाय, थकले मी..
केला त्याने विचार, म्हणाला लेखी मसुदा पाठव
मसुद्यात लिहिले, " मला इथे खूप असह्य झालंय
मन लागत नाही, कलह माजलाय, शांती जराही नाही
तुझ्या संगतीत दिवस घालवावे वाटते "
देवाने विनंती - मसुदा वाचला मात्र,
लगेच स्वतःच सही केली
मसुद्याचे रुपांतर झाले एका विनंतीत
त्या जगनिर्मात्या देवाची एका पामर भक्ताला..
आला तो माझ्या घरी, बसला जाऊन देव्हार्यात
हात पुढे करून- माझ्याकडेच-
मागितली फुले अन मोदक
आणि माझ्या या घराचे झाले खरेच नंदनवन
उबग माझा गेला पळून, आली तेथे भक्ती
मीही आनंदात, तो ही आनंदात !
कारण ह्याचे, त्याला माहित..
तो आला होता ठेवून मागे
त्याची उबग आणि जड झालेले ओझे
स्पर्धा भाऊ बंदकीची, चिंता उद्याची
कुणाला वरती आणायचे, कुणाला कुठे पाठवायचे,
अविरत नजर ठेऊनही चुका करणार्यांचे काय करायचे
कुणाला शाप द्यायचे, कुणा कुणावर कृपादृष्टी करायची
थोडीतरी विश्रांती हवी की नाही ?
कवयित्री:अलका काटदरे
४ टिप्पण्या:
व्वा. मस्त कविता.
"एकदा तर माप ओलांडून आले होते या घरी"
एका ओळीतच खूप काही साठलंय.
अलकाताई खूप आवडली ही कविता
खूप आवडली...
खुप आवडली.
टिप्पणी पोस्ट करा