नशीब!

सावधान ! ! !

हा प्रसंग दोन दिवसापूर्वी घडला. मागच्याच आठवड्यात मला आयडियाचा नवीन भ्रमणध्वनी क्रमांक मिळाला. अर्जातील रकान्यात जाहिराती नको असे मी स्पष्ट लिहिले होते तरीही जाहिरात संदेश रोज चालूच आहेत. मी मदत केंद्राला तक्रार केली. जाहिरात सेवा बंद होण्या करता ४५ दिवस हा त्रास मला सहन करावा लागेल कारण प्रत्येक जाहिरातदाराला तसे कळवावे लागते मग हा प्रकार बंद होतो. एका जाहिरातीने मला दोनदा झोपेतून उठवले. [ माझ्या भ्रमणध्वनी क्रमांकाची ब्रिटिश टेलिकॉम कंपनीच्या स्पर्धेत ५००,००० पौंड बक्षिसाकरता निवड झाली आहे, ते बक्षीस घेण्याकरता तुमचा ईमेल पत्ता मला ह्या पत्त्यावर कळवा - ड्रेक, टेलीकॉमनोटीस @ हॉटमेल.कॉम. ]

ब्रिटिश टेलिकॉमला माझ्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा काय फायदा? कंपनीने तसे रीतसर पत्र मला पाठवणे आवश्यक आहे. असो थोडक्यात काय की माझ्या विषयी माहिती मिळवून ती माहिती दुसर्‍याला विकायची ज्याचा उपयोग घोळ घालण्यात केला जातो  व त्यात मी छान अडकू शकतो.

मी तक्रार केंद्राच्या १९८ क्रमांकाला हे कळवले. त्यांनी मला मदत करणे शक्य नसल्याचे सांगितले. मुळात माझा भ्रमण ध्वनी क्रमांक अशा टेलीसेवा कंपनीला विकण्याची चूक आयडियाने केली त्या सेवा कंपनीने ड्रेक नामधारकाला दिली पण चूक कबूल न करता वरून तुम्ही तक्रार पोलिसात करा असे सांगण्यात आले. पैसे लुटण्याचे हे प्रकार ह्या कंपन्या कायद्यातील त्रुटींचा फायदा घेत रोज करीत आहेत.

टी आर ए आय ह्या संस्थेला नको असलेली सेवा व ग्राहकाला कायमचा बंद करण्याची सोय (ईमेल स्पॅम व्यवस्थेप्रमाणे) आवश्यक सेवा कायदा म्हणून भ्रमण ध्वनी सेवेत लागू करणे सहज शक्य आहे. पण सर्व सामान्य ग्राहकाच्या हिताचे कायदे ही संस्था करेल अशी अपेक्षा बाळगणे हा माझा दोष ठरेल हे मात्र निश्चित आहे.

असाच प्रकार माझ्या याहू मेल पत्त्यावर २००४ ला घडला होता. याहूच्या स्पर्धेत मला ५० लाख पौंड बक्षीस आहे व ते एका दुबईतील वकिलामार्फत मिळेल असे सांगून मला मेल आले होते. मी खात्री करण्याकरता त्या कंपनीचा पत्ता व इतर रीतसर कागद पत्रे मागवली होती. मेल द्वारे तशी कागदपत्रे मला पाठवण्यात आली. त्यातील अधिकार्‍यांचे फोटो मला ओळखीचे होते. त्या मंडळींना मी ओमानमध्ये असताना व्यवसायानिमित्ताने भेटलो होतो. पण त्या व्यक्ती पेट्रोलियम व्यवसायातील होत्या, म्हणून मला शंका आली. मी त्यांच्या महाजालावरील दुव्यांचा तपास केला तेव्हा सगळा प्रकार लक्षात आला.

बक्षीस देण्याचे आश्वासन देणार्‍या व्यक्तीने कागदपत्रांतील व्यक्तींचे महाजालावरील फोटो वापरले होते. त्याला पकडण्याच्या हेतूने मी त्याला माझी माहिती पुरवण्याचे एका अटीवर मान्य केले, त्याने त्याच्या पासपोर्ट व वाहन चालक परवान्याची प्रत पाठवणे आवश्यक होते. त्याने तेही केले व महाजालावरील ते फोटो वापरले; पण वेड्याने चूक केली. पाकिस्तानी पासपोर्टच्या पानावर एका अमेरिकनाचा महाजालावरील फोटो वापरला होता व त्याची फोटो कॉपी काढली होती. तसेच चालक परवान्याचे केले होते. मला पाकिस्तानी पासपोर्ट चांगल्या प्रकारे माहीत होता. ओमानमध्ये माझे शेजारी असणार्‍या दोन पाकिस्तानी मित्रांचे पासपोर्टमधील फोटो नीट करताना त्यांच्या स्कॅन केलेल्या प्रती माझ्या जवळ होत्या.

ग्राहकाची ही अशी मिळवलेली माहिती निरनिराळ्या संस्था भल्या वाईट कारणाकरता उपयोगात आणतात. घोळकर, फसव्या व्यक्ती, आतंकी ओळखपत्रे बनवताना उपयोगात आणतात. ओळख दाखवणार्‍या आपल्या मालकीच्या वस्तू हरवल्याबरोबर लगेच जवळच्या पोलीस ठाण्यात त्याची नोंद करा व एक प्रत जपून ठेवा. मालेगाव, सुरत बॉंबस्फोटात अशाच हरवलेल्या दुचाकी वापरल्या गेल्या होत्या, म्हणूनच मालेगाव ब्लास्टच्या प्रज्ञासिंगच्या इंदौरला हरवलेल्या दुचाकीला पुरावा म्हणून वापरल्याचे मी दूरचित्रवाहीनीवर बघितलेले मला अजून आठवते आहे. (हा माझा दोष असावा)

मी सावध झालो होतो. ही माहिती जिथे, जसे जमेल तसे पाठवण्याचा मी प्रयत्न केला. काही उपयोग झाला नाही. मात्र कसे काय झाले हे अजून कळले नाही, पण माझा हा सगळा मेल व्यवहार vapvk@yahoo.co.in ह्या पत्त्यावर होता तो एक दिवस बंद पडला. खूप प्रयत्न झाले पण हा पत्ता मला आजही वापरता येत नाही. ह्याचे वाईट वाटते. आता मी असले काही महत्त्वाचे माझ्या संगणकावर देखील प्रत म्हणून साठवून ठेवतो.

बघा ह्या असल्या नवीन तयार होणार्‍या धोक्या पासून सावध व्हा. हे समजूनही खड्ड्यात पडणार्‍या वर आपण माती टाकली पाहिजे असेच माझे मत झाले आहे.




लेखक: विनायक रानडे

५ टिप्पण्या:

Meenal Gadre. म्हणाले...

जिकडे तिकडे फसवणूकींचा सुळसुळाट झाला आहे. आपण त्यांना आवरू शकत नाही. पण त्यापासून सावध राहू शकतो.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

उपयुक्त माहिती. मला पण अशी कित्येक मिलीयन डॉलर व पौंडांची बक्षिसें लागलीं आहेत. आमचे चि. म्हणतात कीं चुकूनही दिलेल्या वेबसाईटला भेट देऊं नका. नाहींतर संगणकांत व्हायरस शिरेलच. प्रथम तुमचे सगळे संकेतशब्दांक - पासवर्ड वगैरे चोरले जातील आणि नंतर संगणकाचे बारा वाजतील.

सुधीर कांदळकर

Suhas Diwakar Zele म्हणाले...

असे मेसेजेस येतच रहातात..त्यासाठीच मी माझा एक ईमेल अकाउंट कायमच बंद केल...
ती सगळी बक्षीस लागली असती तर म्या लैई श्रीमंत असतो ;-)

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis म्हणाले...

संगणक व मोबाइल या दोन्हीवरही हा एक कायमचा त्रास आहे. आपुलाच ई-मेल पत्ता आपुलाच वैरी असा प्रकार होतो. मात्र लॉटरी, वारसाहक्काचे पैसे असल्या प्रकाराना आपण भुललो तर आपलाच मूर्खपणा! सदैव सावध!

प्रमोद लक्ष्मण तांबे म्हणाले...

विनायक रानडे,
संगणक व मोबाइल या दोन्हीवरही हा एक कायमचा त्रासच होऊन बसला आहे. आपुलाच ई-मेल पत्ता आपुलाच वैरी असा प्रकार होतो.पण वरमोबाईलवर जाहिराती व नको असलेले एस.एम.एस बंद करण्यासाठी काय करावे ह्याचे मार्गदरशन करा अशी विनंती.