आम्ही चीनमध्ये राहत होतो तेव्हा आमच्या डोक्यावर फेंग शुई(चिनी वास्तू शास्त्र)चे भूत स्वार होते. आम्ही बरीच पुस्तके वाचली. आंतरजालावरूनही माहिती गोळा करून अभ्यास केला. तेव्हा ब-याच ठिकाणी असे वाचण्यात आले की नोकरी/ धंदा/ व्यवसायाच्या भरभराटीसाठी घराच्या उत्तरेला पाणी किंवा त्याशी निगडित वस्तू ठेवावी. उदा: छोटे कारंजे, मत्स्यालय, कमळ, वगैरे किंवा त्यांची प्रतिकात्मक चित्रे.
मी बाजारातून एक (फिश टॅंक) काचेची टाकी आणली. छोट्टीशी. मला कुणाच्याही मदतीविना त्याची निगा राखता येईल अशी. लांबी X रुंदी X खोली पाहता ती असेल २० X १० X १५ इंच. ती छानश्या टेबलावर ठेवली. फेंग शुईने सांगितल्याप्रमाणे आठ केशरी गोल्ड फिश व एक काळा गोल्ड फिशची खरेदी ही झाली आणि आमच्या घरातल्या टेबलावरच्या त्या काचेच्या पेटीत ते नऊ मासे विहरू लागले.
आमच्या तिघांच्या घरातले ते पहिले वहिले पाळीव प्राणी (पेट) होते. आम्ही सर्व कुटुंबीय एखाद्या खुळ्यासारखे माश्यांच्या हालचाली एकटक पाहतं बसू लागलो. माश्यांसाठी सुकलेल्या किड्यांचा खाऊ, पाणी निर्जंतुक राहावे म्हणून औषधे, हवेचे बुडबुडे सोडणारे पंप वगैरे लाड पुरवून सुद्धा माश्यांनी आमच्या घरी तग धरला नाही. एकेक जण आम्हाला सोडून गेले. आता फेंग शुई विषय सोडून आम्ही माश्यांची निगा या विषयावर अभ्यास सुरू केला. पुन्हा नव्या जोमाने नवीन नऊ गोल्ड फिशचा समूह घरात शिरला. त्यांना नाजूकपणे सांभाळत, जिवापाड काळजी घेऊनही मी अपयशी ठरले. पुन्हा एका मागून एकांनी आमचा निरोप घेतला. निराश होऊन मी माश्यांचा नाद सोडून पुन्हा मासे न पाळण्याच्या निग्रहापर्यंत पोचले.
आता एखादे छोटे कासव आणण्याबद्दल घरात विचार विनिमय झाला आणि तो तत्काळ अमलात ही आणला गेला. बाजारातल्या दुकानातून सर्वात लटपटे / खेळकर असे दिसणारे तळ हातावर मावेल एवढे इवलुसे कासव निवडून खरेदी झाली आणि त्याचे आमच्या घरात आनंदाने स्वागत झाले. आता आम्ही आम्हाला कासवाचा नाद लावून घेतला. येता जाता काचेच्या पेटीशी रेंगाळणे, टाकीच्या काचेवर हाताच्या बोटांच्या नखांनी टक टक करणे, त्याच्या ढालीसारख्या पाठीवरून अलगद बोट फिरवणे वगैरे खोड्या करायला सुरवात केली. पण ते ढिम्म! काही प्रतिक्रियाच दाखवायचे नाही. ना फारशी हालचाल, ना खाणे पिणे.
मी त्याला गरम पोळीचा बारीकसा तुकडा, भाताची दोन चार शितं, केळ्याचे/ केकचे कण ही घालून पाहिले. पण सर्व अन्न जिथल्या तिथे राहत होते. त्याची पाठ कडक असली तरी पोट तेवढे कणखर नसेल. त्याला टाकीच्या तळाचे रंगीत बारीक दगड टोचतील म्हणून ते काढून टाकले. टाकीतली कृत्रिम झाडे/फुले ही त्याच्या दृष्टीआड केली. पण कासवात काही फरक पडला नाही. ते अजूनही गुमसुम होते. माश्यांसारखे हे कासव ही आपल्याला सोडून जाणार या भितीने मी त्रासले. पुन्हा जाऊन त्या कासव विकत घेतलेल्या दुकानामध्ये चौकशी केली. त्यांनी काचेची पेटी पाण्याने अर्धी अधिक भरण्याचे सुचवले.
१ | २ | ३ | ४ | ५ |
---|
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.