कुठल्याही हिवाळी/दिवाळी इत्यादी इत्यादी इ-अंकांसाठी लिहायचं म्हटलं की माझ्या अंगात एकदम प्रचंड उत्साह संचारतो... किती आणि काय लिहू असं होऊन जातं... नवनवीन कल्पना सुचायला लागतात.. नवनवीन विचार मनात घोळायला लागतात.. नवीन लेख, नवीन विषय, नवीन कविता, नवीन कल्पना वगैरे वगैरे माझ्या डोक्यात अक्षरशः फेर धरून का कायसंसं म्हणतात तशा नाचायला लागतात. काय लिहू आणि काय नको असं होऊन जातं अगदी. मी बरंच कायकाय मस्त लिहायचं ठरवायला लागतो. काही लेख, कथा, कविता मनातल्या मनात वगैरे तयारही होऊन जातात, रात्री झोपताना कित्येक कल्पना नव्याने सुचतात. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर त्या सगळ्या कल्पना फक्त कागदावर उतरवल्या की झाला लेख तयार.. अहाहा.. कस्सलं सही.. !!