शिल्पकथा

आपल्या देशात देशभर शिल्पकला कमी अधिक प्रमाणात पाहावयास मिळते. चौसष्ट कलांची महती आपल्याला नेहमीच सांगितली जाते. शिल्पकलेमधे राजकीय,सांस्कृतिक,पौराणिक असे संदर्भ डोकावताना दिसतात. शिल्पकलेची सुरुवात धर्मप्रसारासाठी झालेली दिसते. कारागिरांनी  निर्जीव कातळांमध्ये जीव ओतलेला असतो आणि त्या दगडांमधून कथा-कल्पना पाहताना आपण हरखून जातो. शिल्पकलेत बौद्ध, जैन,हिंदू अशा धर्मांची धर्ममूल्य या शैलशिल्पातून समाजापुढे मांडली जातात. आपापल्या ठिकाणी सर्वच कला सुंदर असतील पण, चित्र, शिल्प, नृत्य या कलांचे आपले एक वेगळे स्थान आहे.

जगप्रसिद्ध अशा, आमच्या औरंगाबादपासून जवळ असलेल्या वेरूळ येथील शिल्पांबद्दल   कितीतरी लिहिले गेले आहे. वाचलेही गेले असेल. मीही अनेकदा तिथे गेलो आहे. कधीतरी नवीनच काही माहिती मिळते. पुन्हा ती माहिती जगरहाटीच्या धांदलीत विसरूनही जातो. असे असले तरी पुन:प्रत्ययाचा जो काही आनंद असतो तो वेगळाच असतो.

मी काही लेण्यांमधील सर्वच शिल्पांचा परिचय करून देणार नाही. वेरूळच्या लेण्यांमधे भगवान शिव शंकराचा सुळसुळाट आहे. पाहावे तिथे शंकर भगवान दिसतात. 'रामेश्वर लेणे’  नावाची एक लेणी आहे. [लेणी क्रमांक २१] इथे शिवपार्वती चौसरचा खेळ खेळताना दिसतात  शिवपार्वतींचा खेळ पाहण्यासाठी त्यांचा नेहमीचा लवाजमा दिसतो आहे. एका हातात सोंगट्या धरलेल्या असाव्यात तर दुस-या हाताने त्यांनी पार्वतीची ओढणी [ओढ्णीला काय म्हणावं बॉ] पकडलेली आहे. एक हात उंच करून तो पार्वतीला म्हणतो आहे, अजून एक डाव खेळू या. इथे पार्वती वैतागलेली दिसते. वैतागण्याचे कारण शिव तिला काही जिंकू देत नाही. एक तर चलाखी करून शिव डाव जिंकत असावे. अर्थात आम्हाला मार्गदर्शन करणारी एक कामचलाऊ महिला मार्गदर्शक म्हणते की, इथे पार्वती जिंकलेली आहे. आणि हा पराभव सहन न झाल्यामुळे शिव पार्वतीला एक डाव खेळ म्हणून हट्ट करत आहेत.  आणि त्या डावात शिव 'नंदी’ हरला आहे. डावात जिंकलेल्या नंदीला पार्वतीकडचे गण ओढत आहे. कोणी शिंगे ओढत आहे. कोणी शेपटीला चावत आहे. असा त्या बिचा-या नंदीचा छळ चालू आहे. बाकी, पार्वतीच्या शिल्पात कारागिराने कलाकारी सौंदर्य दाखवायची काही कसर सोडलेली नाही. उन्नत उरोज, नाजूक कंबर, प्रमाणबद्ध हात-पाय. लोडावर हात टेकून बसलेली पार्वती. खेळ चाललेला असताना पंच म्हणून भासावा असा कोणीतरी मध्यभागी बसलेला दिसतोय. बाजूला उभे असलेले द्वारपाल. असे सर्व पौराणिक वर्णन जर कोणी करत  असेल तर अशा शिल्पांचा फोटो काढण्याचा मोह कोणाला होणार नाही. असो, अशा अजून काही शिल्पांचा परिचय करून द्यायचा आहे पण तो पुढील अंकात. :)





लेखक: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

३ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

बिरुटे सर..खूप मस्त समजावून सांगितलीत ही कथा...प्रत्येक शिल्प हे काही ना काही प्रेरणा किवा कथा शिल्परूपी सांगण्यासाठीच असतात.
पुढल्या कथेची वाट बघतोय :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

सुहास, लिहिण्याचा उत्साह वाढवणार्‍या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभारी.

अनामित म्हणाले...

सर, लेख आवडला!

सहज